गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्री काही वाचन व गाणी ऐकल्यानंतर इंस्टाग्राम सर्फीग करत होतो. एक दोन रिल्सनंतर एकदम कान टवकारले. आगापिछा नसलेल्या एका क्लिपमधून मुंबईतील टोळीयुद्धाची माहिती देण्याच्या (?) उद्देशाने काही कुख्यात गुंडांची जंत्रीवजा नामावली दाखवत होते. मागे बॅकग्राऊंड संगीत होते. एका गाण्याची धूनही वाजत होती.. ‘सबका भाई दाऊद भाई..’ एकदम मी ८०/९०च्या दशकात गेलो. करीमलाला, युसूफ पटेल, वरदाभाई, छोटा राजन, अरुण गवळी, मन्या सुर्वे, माया डोळस आदींच्या सुरस कथा सांगण्याचा प्रयत्न होता. मधूनच एक-दोन पत्रकार वस्तूनिष्ठ माहिती देत होते. या सर्व पत्रकारांनी गुन्हेगारी वृत्तांचे वार्तांकन केलेले होते. या पत्रकारांमधील अनेक पत्रकार उत्तरेतील होते. राज्यातील एकच पत्रकार यात दिसला तोही हिंदी भाषिक. यातही काही वावगे नाही. परंतु वास्तुनिष्ठ माहिती दिल्यानंतरच्या अनेक क्लिप्समध्ये अप्रत्यक्षरित्या टोळीयुद्धाच्या उदात्तीकरणाचा हेतू लपून राहत नव्हता. त्यात भरीसभर म्हणून पुण्याच्या गजा मारणेचेही कौतुक केले जात होते. (आठवले म्हणून.. गजा मारणेच्या त्या गाजलेल्या मिरवणुकीला वर्ष झाले की हो!) बॅकग्राऊंडला ‘एकच दादा मारणे दादा’ होते हे काय सांगायला हवे!

हे सर्व इंटरनेटचे चाळे पाहिल्यावर “Crime to many, is not crime but simply a way of life. If laws are inconvenient ignore them, they do not apply to you” या वचनाची आठवण झाली. टोळीयुद्धाचे उदात्तीकरणाच्या नादात कथाकार इतका रंगून गेला की, तो कधी बाबा सिद्दीकीच्या हत्त्येपर्यंत आला हे त्यालाच कदाचित कळले नसेल. आणि बाबाचा हा एपिसोड सुरु असतानाच कुर्लाभाई नदीम खान हे पात्र मध्येच उपटले. त्याने तर सलमान खान, लॉरेन्स बिष्णोई, शाहरुख खान यांचे कथानक मध्येच घुसडले. त्यात मीही आत जाऊन आलेलो आहे हे पदवीदानही सांगितले. आणि शेवटी हा माथेफिरू सांगतो की ‘कलसे मै इंस्टापर नही आऊंगा..’ म्हणजे कमाल आहे की नाही?
आणि हे सर्व रात्री साडेदहा वाजल्यानंतर खुलेआम सुरु असताना पोलिसांचा सायबर विभाग चक्क झोपा काढतोय? आणि गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री सांगत आहेत की ‘सायबर विभागासाठी आम्ही AI ची मदत घेणार.’ मुख्यमंत्रीसाहेब AI सुरु करण्यासाठीतरी सायबर विभाग जागा असला पाहिजे की नाही? तो चक्क झोपला आहे असं तुम्हाला वाटतं नाही? माफ करा. मला

अशावेळी भाजपच्या आयटी सेलची आठवण झाली. पक्षविरोधी काही लोड केले की क्षणार्धात त्याचा रीच कमी करण्यासाठी तो धडपडतो. अशी यंत्रणा असताना इंस्टावर हे गेले आठवडाभर येऊच कसे शकते? माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक मंत्र्यांनी याचा शोध घेणे गरजेचे आहे.
गुन्हेगारी जगताची माहिती दिली असती तर आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते. या क्लिप्समधील काही ठिकाणी आव्हाने / प्रतिआव्हानांची भाषा आहे. ती खटकणारीच आहे. बरे हे जे काही कथन ऐकवण्यात आले ते कुठल्या पुस्तकाचा भाग आहे किंवा कसे हेही स्पष्ट नाही. अलाहाबादिया याच्या काही क्लिप्स व प्रोग्रामवरून काही वाद सुरु आहेत. तशीच एक क्लिप अजूनही अधूनमधून दिसते ती ‘योनीला सेन्सेशन नाही का?’! हिच्यावर अजून बंदी कशी नाही? मराठीतही त्याच वाटेने जाणारी ‘फाटक्या खिशातून काय हाताला लागले? ते छोटे असेल? अशी क्लिप आहेच. (आम्ही मराठी मागे नाही!!)

इन्स्टावरील या अशा अनेक क्लिप्सवर बरेच लिहिता येण्यासारखे आहे. पण तो काळाकुट्ट इतिहास अनेक पुस्तकांतून शब्दबद्ध करण्यात आलेला आहे. परंतु या क्लिप्स आताच प्रसारित करण्यामागे ‘काडी’ लावण्याचा प्रकार आहे का याची पोलिसांनी कसून चौकशी करणे गरजेचे आहे. सायबर विभागाला केंद्रीय यंत्रणाशी संपर्क साधून त्याच्या मुळाशी जाणे जरुरीचे आहे. पोलीसठाणे वा उपायुक्ताच्या कार्यालयात जशी कामाची आखणी असते तशी करून सायबर गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई व्हायला हवी. “Nothing is more devasting to a community than out of control crimes” हे कुणीही विसरता कामा नये!
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर