सतत मुसळधार पावसात मुंबईत पाणी तुंबणे ही गेले कित्येक दशकांची परंपरा आहे आणि मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने मेघालयातील चेरापुंजीला कधीच मागे टाकले आहे. रस्ते, रेल्वे आणि बरोबरीने हवाई वाहतूक ठप्प होणे अशा प्रकारामुळे भारतातच नव्हे तर भारताबाहेरदेखील “मुंबई की बारीश”ची एक वेगळी ओळख आहे. समुद्राजवळ असल्यामुळे दमटपणा, भरतीच्या वेळी पाणी शहरात फेकले जाणे अशा बाबींना मुंबई गेली कित्येक वर्षे तोंड देत आली आहे. यात 1976, 1992 आणि 2001 या वर्षांचा उल्लेख करतां येईल. या वर्षांत झालेल्या अतिवृष्टीची तीव्रता एवढी होती की सकाळी भरलेले पाणी रात्री उशिरापर्यंत कमी झाले नव्हते. रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होतीच, शिवाय रुळावर पाणी भरल्यामुळे रेल्वेवाहतूकही बंद पडली होती. 26 जुलै 2005ने तर सर्व उच्चांक पार केले होते.
यावर्षी साधारणपणे 24-25 जानेवारीला सुरु झालेल्या पावसाने मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर भागांनाही झोडपले. लवकर आलेला पाऊस हा अवकाळी श्रेणीतच मोडतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनला खरी सुरुवात 05 जूननंतरच होईल. साधारणपणे 11 जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होते. पुढे पाऊस काय प्रताप किंवा प्रकोप दाखवितो हा कुतूहलाचा विषय आहे. मात्र राजकीय पक्षांच्या मदतीने फोफावलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या, कचऱ्याची वेळीच विल्हेवाट न लागणे, ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेची प्रलंबित कामे आणि नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे पाऊस मुंबईची दाणादाण उडवतो हीदेखील वस्तुस्थिती आहे. “नेमेचि येतो मग पावसाळा, कौतुक हे सृष्टीचे जाण बाळा”, या उक्तीप्रमाणे यावर्षी पाऊस लवकर येऊन, मुंबईला तुंबवून, रस्ते आणि रेल्वेवाहतूक विस्कळीत करुन गेला. गेल्या सोमवारी मंत्रालय, प्रभादेवी, वरळी मेट्रो स्टेशनपासून दहिसरपर्यंत जवळजवळ सर्व भाग जलमय झाले.
नालेसफाई-
मुंबई महानगरपालिकेच्या (मुंबई मनपा) नियोजित कार्यक्रमानुसार यंदा पावसाळ्यापूर्वी 80 टक्के, पावसाळ्यात 10 टक्के आणि पावसानंतर 10 टक्के नालेसफाईचे काम 395 कोटी रुपयांत करणे अपेक्षित होते. यात दादर, एल्फिन्स्टन, परळ, माटुंगा या भागांसाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. या रक्कमेपैकी जवळजवळ 200 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाल्याचे म्हटले जाते. महत्त्वाची बाब म्बणजे 2019-2020 ते 2023-2024 या पाच वर्षांत नाल्यांतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेने 962 कोटी रुपये खर्च केले. यावर्षी कामात पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रिकरणदेखील बंधनकारक केले होते. पण पावसानेच कामातील दिरंगाई चव्हाट्यावर आणली आणि मिठी नदीसह, इतरत्र नालेसफाई पूर्ण न झाल्याचे सिद्ध केले.
कचरा-
मुंबईत दरदिवशी 9000 मेट्रिक टनाहून अधिक कचरा जमा होतो, त्याची वेळीच विल्हेवाट लावली जात नाही. डंपिंग ग्राऊंड्स कुठे असावीत यावरही वाद उद्भवत असतात. रेल्वेलगत असलेल्या झोपड्यांमुळे कचरा रेल्वे रुळांवर येतो आणि पाण्याची पातळी वाढली की रुळ पाण्याखाली बुडतात. याबाबत वांद्रे-माहीममधील झोपड्यांचे उदाहरण देता येईल. याशिवाय लोक भरपूर प्रमाणात घनकचरा वाटेल तिथे टाकतात. याचं उदाहऱण म्हणजे रविवारी रात्री अंधेरी पूर्वेतील मोगरा नाल्यातून, अंधेरी पश्चिमेपर्यंत प्लॅस्टिकच्या बाटल्यांसह भरपूर प्रमाणात वाहून आलेला कचरा. गेल्यावर्षी याच मोगरा नाल्यातून जुन्या खुर्च्या, सोफा यासारखा घनकचरा रस्त्यावर वाहून आला होता. कचऱ्याचे वर्गीकरण वगैरे बाबी पुढे सरकलेल्या दिसत नाही. संरक्षक भिंत बांधूनही गेली 50 वर्षे सांताक्रूज पश्चिमेकडील मिलन सबवेची स्थिती जशीच्या तशीच आहे. याचबरोबर मुंबई मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांच्या निर्बंधामुळे कचरा जाळताही येत नाही. यावर्षी सांताक्रूज येथील मिलन सबवेतही परंपरेनुसार भरपूर पाणी साचले होते.

ढगफुटी-
107 वर्षांतील मे महिन्यातला सर्वांत जास्त पाऊस असे वर्णन केलेल्या यावर्षी झालेल्या पर्जन्यवृष्टीत मुंबईमध्ये काही ठिकाणी 104 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. म्हणजेच ढगफुटी झाली. रविवारी रात्री ते सोमवारपर्यंत (26 मे) 135 मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. काही ठिकाणची पर्जन्यवृष्टी पुढीलप्रमाणे: नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र- 252 मिलिमीटर, ए विभाग कार्यालय- 216 मिलिमीटर, महानगरपालिका मुख्यालय- 214 मिलिमीटर, कुलाबा उदंचन केंद्र- 207 मिलिमीटर, नेत्र रुग्णालय (दोन टाकी) (जे जे हॉस्पिटल जवळ)- 202 मिलिमीटर, सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाईन्स)- 180 मिलिमीटर, मेमनवाडा अग्निशमन केंद्र- 183 मिलीमीटर, ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी- 171 मिलीमीटर, नारियलवाडी स्कूल, सांताक्रूझ- 103 मिलिमीटर आणि सुपारी टँक, वांद्रे पश्चिम- 101 मिलिमीटर. त्यामानाने चेंबूर (82 मिलिमीटर) आणि कुर्ला एल विभाग (76 मिलिमीटर) इथे मर्यादित पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाचा परिणाम मुंबई, ठाण्यासह, पूर्ण मुंबई महानगर प्रदेश, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि राज्याच्या इतर भागांतही आढळून आला. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 24 तासात 944 मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे हाःहाकार माजून शहरातील जलव्यवस्थापनावर ताण पडला होता.
उदंचन केंद्रे-
मुंबईतील 100 वर्षांहून अधिक जुन्या आणि कमी क्षमतेच्या 58 पर्जन्यवाहिन्यांपैकी काही बदलण्यात आल्या आहेत आणि 08 उदंचन केंद्रांपैकी (पम्पिंग स्टेशन्स), 06 पम्पिंग स्टेशन्सचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. दोन पम्पिंग स्टेशनचे काम प्रलंबित आहे.
कमी दाबाचा पट्टा-
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्यामुळे हिंदी महासागराच्या तुलनेत अरबी समुद्रातील पाण्याच्या तापमानात सतत वाढ होते असे म्हटले जाते. शिवाय समुद्रात उभारण्यात येणारे कोस्टल रोड, सी लिंक अशा बांधकामांमुळेदेखील शहरातल्या पाण्याचा समुद्रात जाणारा प्रवाह कमी होतो. जर भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस कोसळला तर पाणी समुद्रातून शहरात उलटे फेकले जाते.
पर्यावरण-
सात बेटांचे मुंबई बेट एक सखल मैदान असून त्याचा एक चतुर्थांश भाग समुद्रसपाटीपासून खाली आहे. ते तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले असून समुद्र, खाडी ते जमीन यांच्यामध्ये असलेल्या खारफुटी जंगलांमुळे मुंबईचा किनारा सुरक्षित राहतो. मात्र 70 टक्के खारफुटीचे जंगल आपण नष्ट केलं आहे. उदाहरणार्थ वांद्रे येथील बीकेसी, तिवराचं जंगल तोडून उभारण्यात आलं आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांचे म्हणणे आहे. शिवाय टोलेजंग इमारती उभारताना रस्ते, मलनि:सारण, पाण्याचा निचरा या गोष्टींचा नियोजनबद्ध विचार होत नाही.
इतिहास-
पावसाळ्यात मुंबई किमान दोन ते तीन वेळा तुंबणे ही वर्ष 2000पर्यंत जवळजवळ स्थापित प्रकिया होती. नंतरच्या काही वर्षांत पावसाने उसंत घेतली होती. मात्र 26 जुलै 2005च्या महाप्रलयानंतर ढगफुटीचे प्रमाण वाढले. हवामानातील बदल पाहता यापुढे असे प्रसंग येणारच नाहीत असे ठामपणे सांगता येत नाही.