Friday, February 14, 2025
Homeमाय व्हॉईसशहरी आदिवासींनाही मिळणार...

शहरी आदिवासींनाही मिळणार ‘शबरी’चा लाभ!

आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने शबरी आवास घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागातील आदिवासींना मिळत असल्याने शहरी भागातील आदिवासी घरकुलापासून वंचित होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी शहरी भागातील आदिवासींनाही हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून आता शहरी भागात वास्तव्यास असलेल्या राज्यभरातील आदिवासी कुटुंबानाही या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येते. ही योजना शासन निर्णयानुसार ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते. मात्र ग्रामविकास विभागाच्या 10 फेब्रुवारी 2016च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) स्थापन करण्यात आला.

या कक्षाद्वारे ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणा-या सर्व ग्रामीण घरकुल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. त्यामुळे शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा नसल्याने शहरी भागातील आदिवासी कुटुंब घरकुलापासून वंचित राहत आहे. ही बाब सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी शहरी भागात संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्यामार्फत आदिवासी कुटुंबासाठी शबरी घरकुल योजना राबवावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच नगर विकास विभागाला आदिवासी विकास विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. अखेर या प्रस्तावास नगर विकास विभागाने सहमती दर्शवली असल्याने आता शहरी भागातील पात्र आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत 11 जानेवारी 2024 रोजी शासननिर्णय निर्गमित झाला आहे.

शबरी

शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थी पात्रता: लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. त्याचे स्वत:च्या नावे पक्के घर नसावे. महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षांपासून रहिवासी असावा. घराचे बांधकाम करण्यासाठी स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी. यापुर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वय पूर्ण 18 वर्षे असावे. स्वत:च्या नावे बँक खाते असावे.

अनुदान रक्कम: या योजनेंतर्गत घरकुल बांधकामाचे चटई क्षेत्र 269 चौरस फूट असून घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही 2 लक्ष 50 हजार राहील. सदर अनुदान रक्कम चार टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. यात घरकुल मंजूरी मिळाल्यानंतर 40 हजार रुपये, प्लिंथ लेवल 80 हजार, लिंटल लेवल 80 हजार आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर 50 हजार असे एकूण 2 लक्ष 50 हजार रुपये अनुदान आहे.

आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. रहिवासी प्रमाणपत्र. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा). शिधापत्रिका. आधारकार्ड. एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिला पानाची छायांकित प्रत (फोटो व खाते क्रमांक असलेली).

Continue reading

मोदींचा मास्टरस्ट्रोक: 26/11चा मास्टरमाईंड राणाच्या प्रत्यार्पणास ट्रम्पची मंजुरी

26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 14 फेब्रुवारीला पहाटे या प्रत्यार्पणास मान्यता दिली. 26/11...

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...
Skip to content