Saturday, June 22, 2024
Homeहेल्थ इज वेल्थआजपासून मुंबईत क्षयरोग...

आजपासून मुंबईत क्षयरोग आणि कुष्ठरोग शोधमोहीम

केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सन २०२५पर्यंत क्षयरोग दूरीकरणाचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०३०पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आजपासून ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत सक्रिय संयुक्त क्षयरोग शोधमोहीम (ACF) आणि कुष्ठरोग शोध अभियान (LCDC) राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत जनजागृतीसाठी घरोघरी आरोग्य तपासणी करुन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या नवीन रुग्णांची शोधमोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान १० लाख ८८ हजार घरांमधील अंदाजित ४९ लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी एक महिला आरोग्य स्वयंसेविका आणि एक स्वयंसेवक यांचा एक चमू अशा ३ हजार ११७ चमूंद्वारे केली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल. तसेच या रुग्णांना महानगरपालिकेचे नजीकचे आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर पुढील आरोग्य तपासणी आणि उपचार विनामूल्य दिले जातील.

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे मुंबईतील सर्व २४ विभागांमधील २८ CBNAAT वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत ४२ CBNAAT यंत्रांद्वारे क्षयरुग्णांकरीता विविध निदान सेवा पुरविण्यात येत आहेत. मुंबईतील क्षयरुग्णांना सेवा देण्याकरीता २११ आरोग्य केंद्रे आणि १८६ महानगरपालिका दवाखाने, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ५ वैद्यकीय महाविद्यालये आणि २०० आपला दवाखाना मुंबईत कार्यरत आहेत. बहुआयामी प्रतिरोध (मल्टी ड्रग रेझिस्टंट) क्षयरोग रुग्णांसाठी संपूर्ण मुंबईत २७ डीआर टीबी उपचार केंद्रे कार्यरत आहेत. त्यातील ७ डीआर टीबी उपचार केंद्रे ही खासगी आहेत. सर्व क्षयरुग्णांना पौष्टिक आहार सहाय्यासाठी उपचारादरम्यान रुपये ५०० दरमहा त्यांच्या बँक खात्यात केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत जमा केले जातात, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

क्षयरोगाची लक्षणे: १४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, सायंकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे.

कुष्ठरोगाची लक्षणे: रुग्णांच्या त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा/चट्टे येणे. जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तसेच तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

कुष्ठरोगाचे असांसर्गिक कुष्ठरोग व सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार आहेत. बहुविध औषध उपचार पद्धतीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रकाराप्रमाणे एम.डी.टी.चे औषध असांसर्गिक रुग्णास ६ महिने व सांसर्गिक रुग्णास १ वर्ष एवढ्या कालावधीसाठी देण्यात येते. बहुविध औषध उपचाराची पाकिटे पालिकेचे सर्व आरोग्य केंद्र, दवाखाने तसेच अॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.

घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. तसेच क्षयरोग व कुष्ठरोग बरा होतो. त्यामुळे लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता रुग्णांनी महानगरपालिका / शासकीय रुग्णालयात लवकरात लवकर संपर्क साधावा व उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. क्षयरोगासाठी थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी मोफत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे शहर म्हणजे मुंबई

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक...

देशातल्या 8 लोकसभा मतदारसंघांच्या काही मतांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे 8 आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे: लोकसभा आम चुनाव 2024ईवीएम जांच...

कायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी...
error: Content is protected !!