शेतकऱ्यांच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत योग्य भाव मिळण्यासाठी त्याला विपणन तंत्राची योग्य माहिती देणे आवश्यक आहे. केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापनद्वारे आयोजित कापूस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन प्रशिक्षणाच्या सहाय्याने पिकाची गुणवत्ता, उत्पादन आणि विपणन याविषयी कृषी अधिकारी चांगल्या रीतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतील असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण आणि संग्रहण संचालनालय, फरीदाबादचे सल्लागार डॉ. जे. पी. सिंग यांनी काल नागपुरात व्यक्त केला.
केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसेच मध्य प्रदेश येथील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापूस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याच्या दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी एकीकृत किड व्यवस्थापन केंद्र नागपूरचे संयुक्त संचालक डॉ. ए.के.बोहरिया, महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नागपूर विभागाच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू प्रामुख्याने उपस्थित होत्या.
विविध देशांमध्ये पिकांच्या निर्यातीबद्दल त्याचप्रमाणे कीटकनाशकांच्या वापराबद्दल काय आंतरराष्ट्रीय संकेत आणि करार आहेत याबद्दल डॉ. जे. पी. सिंग यांनी विस्तृत माहिती कृषी अधिकाऱ्यांना दिली. केंद्रीयिकृत कीड व्यवस्थापन केंद्राद्वारे आयोजित महिनाभर चाललेल्या प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थींचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढेही आयोजित प्रशिक्षणासाठी काही सुधारणा. या प्रशिक्षणार्थींच्या तुकडीने सुचवाव्यात असे आवाहन डॉ. ए.के.बोहरिया यांनी यावेळी केले.
कीटकनाशकाचा कमीत कमी वापर करून पीकाच्या ‘एन्ड प्रॉडक्ट’ मध्ये या कीटकनाशकाचा अंश नसावा याकरिता शेतक-यांना सेंद्रिय शेतीकडे वळवून त्यांची शेती शाश्वत करावी असा सल्ला प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी कृषी अधिका-यांना दिला. याप्रसंगी कृषी अधिका-यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्हाचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
27 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या एक महिना अवधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचावे याचे प्रात्यक्षिक अभ्यास त्याचप्रमाणे व्याख्यानयांच्या द्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
नागपुरातील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्रांच्या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश गोवा, गुजरात या पाच राज्यातील राज्यशासनाला कीड व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दिले जात असून शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन करिता यांत्रिक पद्धतीमध्ये सापळ्यांची रचना,रासायनिक नियंत्रणासाठी निंबोळी अर्कासारख्या कीटनाशकाची निवड त्याचप्रमाणे जैविक नियंत्रणासाठी मित्र कीटकांच्या व्यवस्थापनात बाबत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती या केंद्रामार्फत दिली जात असून शेतकऱ्यांना कीटकनाशकांची निवड कशी करावी याबाबत देखील मार्गदर्शन केले जाते.