जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे आमदार आणि उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या विकासकामांमुळे प्रभावित झालेल्या या परिसरातील तृतीयपंथियांनी आता वायकर यांच्या प्रचारातही उडी घेतली आहे. रविवारी शंभरपेक्षा जास्त तृतीयपंथियांनी दिंडोशी परिसरात घरोघरी जाऊन वायकर यांच्याकरीता मतांचा जोगवा मागितला.
आपल्या कार्यकुशलतेने जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून जोगेश्वरीला एक वेगळी ओळख निर्माण करून वायकर यांनी जोगेश्वरीकरांच्या मनामध्ये स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांनी प्रभावित झालेल्या तृतीयपंथियांनीही त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत १००पेक्षा जास्त तृतीयपंथियांनी दिंडोशी परिसरात वायकरांटा प्रचार केला.

तृतीयपंथियांनी आमदार वायकरांची भेट घेऊन समाजात त्यांना भेडसवणार्या समस्यासंदर्भात चर्चा केली होती. यात तृतीयपंथियांसाठी कुठेच शौचालयाची व्यवस्था नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते. तृतीयपंथियांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन वायकर यांनी तातडीने गोरेगाव (पूर्व) आरे चेकनाका येथे उभारलेल्या उद्यानामध्ये तृतीयपंथीसाठी शौचालय उभारले. वायकर यांच्या या व अन्य कामाने प्रभावित झालेले तृतीयपंथी त्यांच्या प्रत्येक कार्यात ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे ठरवले आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच तृतीयपंथियांनी वायकर यांची भेट घेतली होती. नुसती भेट न घेता त्यांच्यासमवेत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यानुसारच द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून १००पेक्षा जास्त तृतीयपंथियांनी दिंडोशी, गोरेगाव (पूर्व) येथील क्रांतीनगर, रामलीला मैदान, पाणबुडी, पिंपरीपाडा ते इंदिरानगरपर्यंत वायकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला.