बोरींबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हे रेल्वेस्थानक छप्पर असलेलं स्थानक असल्याने तेथे भरपावसातही तुलनेने स्वच्छता असते, फलाटावर चिखलयुक्त काळे पाणी नसते, उलट ठाणे रेल्वेस्थनकावर छप्परच नसल्याने हजारो प्रवाशांच्या पायाने जी घाण येते तीच असते, असा बचावात्मक पवित्रा रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.
काही दिवसांपूर्वीच किरण हेगडे लाईव्हमध्येच एकूणच ठाणे शहर व रेल्वेस्थानक परिसराबाबत लिहिले होते. त्याची पडताळणी व माहिती घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पुन्हा स्थानक परिसरात मोठा फेरफटका मारला असता काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर वरील बचाव केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर छप्पर असले तरी आजुबाजूच्या परिसरात छप्पर नाही असे निदर्शनास आणले असता हे अधिकारी म्हणाले की, तेथे आजूबाजूच्या परिसरात मुळीच घाण नसते म्हणून ती स्थानकात ही येत नाही. याउलट ठाणे रेल्वेस्थानक परिसरात घाणच घाण असते, तसेच उघड्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थ व इतर वस्तूंमुळे हजारो प्रवासी त्या घाणीसकटच स्थानकात येत असतात व त्यामुळेच सर्व फलटांवर घाण दिसते. चिखलयुक्त पाणी दिसते.
पावसाळ्यात सीएसटीएम (बोरींबंदर) स्थानकातही पावसातूनच प्रवासी येत असतात. परंतु तेथे कुठल्याही फलटावर काळे पाणी कधीच दिसत नाही, असे कसे हा प्रश्न करताच अधिकारी थोडेसे उचकलेच! आवाज चढवून ते म्हणाले की, साहेब ठाणे स्थनकात अगदी पहिल्या गाडीपासूनच इतकी गर्दी सुरु होते की फलाट साफ करायला घेतले की, प्रवाशांना बाजूला व्हा असे सांगणेही आमच्या जीवावर येते. कारण, प्रवासी काही एकटादुकटा नसतो. शेकडोच्या संख्येत ते असतात. याचा अर्थ आम्ही फलाट साफ करतच नाही असा नाही. दररोज फलाटाला ‘आंघोळ’ घातली जाते. यंत्रांनी साफसफाईही केली जाते. याचे उदाहरण म्हणून त्यांनी आदल्या रात्री काढलेले फोटोही दाखवले. अगदी तारीख व वेळेसकट!! यावर मी म्हणालो अशी सफाई प्रवाशांना दिसली पाहिजे ना? त्यावर ती मंडळी म्हणाली- दिवसा हे शक्यच होणार नाही.

या ठाणे रेल्वेस्थानकाच्या एकूण दहा फलाटांवरून दररोज सुमारे पाच लाख प्रवासी ये-जा करत असतात. तुमच्या-माझ्या मनातील सफाई येथे अशक्यच असल्याचा भाव व्यक्त करून हा अधिकारी म्हणाला की, जोवर प्रवाशांच्या मनात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होत नाही तोवर हे अशक्यच दिसते. अहो, आमच्या सफाई कर्मचाऱ्यांनी जनतेने टाकलेल्या गुटखा आणि पानाच्या पिचकाऱ्या का म्हणून साफ करायच्या? सफाई कामगार आहोत म्हणून आम्ही त्यांची थुक का म्हणून साफ करायची असे काहीशा संतापाने एका कामगाराने विचारले. तसेच स्थानक परिसरात बाईक्स, स्कुटर्स व मोटारगाड्या लाखाच्या घरात येत असल्याने त्यांच्याबरोबर येणारी धूळ पावसाळ्यात ऑटोमेटिक चिखलात रूपांतरीत होते. तसेच दररोज शेवटची लोकल गाडी गेली की आम्ही सुमारे एक हजार बेवारस व भिकाऱ्यांना फलाटाबाहेर घालवतो. त्यात पाऊस असला की त्यांना बाहेरही काढू शकत नाही, हेही सर्वांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. आता बेवारस व भिकारी किती घाण करतात हे सर्वांनाच माहित आहें. ठाणे रेल्वेस्थानकातून रोजचा सुमारे पाच ते सहा टन कचरा जमा करतो व डम्पिंग ग्राउंडला पाठवून देतो ते काही कचरा न काढल्याशिवाय होते का? असा प्रश्न विचारून त्यांनी मला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला. दररोजच्या हजारो लोकल्स तसेच बाहेरगावांहून येणाऱ्या शेकडो गाड्या सतत या स्थानकात माणसे टाकत असतात व तीही लाखोंच्या हिशेबात. या सर्वांचे व्यवस्थापन करणे म्हणजे दमछाक आहे.आणि अशी दमछाक रोजचीच आहे, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
ठाणे शहर व आसपासच्या लोकप्रतिनिधींचे या रेल्वेस्थानकाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेले आहे. कुठलाही राजकीय पक्ष हे मान्य करणार नाही. केवळ लोकल गाडयांची संख्या वाढवणे म्हणजे स्थानकाची काळजी घेणे नव्हे, हे आपल्या लोकप्रतिनिधींना कळेल तो सुदिन. गाड्या वाढवल्यात, चांगले झाले. पण प्रवाशांच्या सोयीचे काय? रिक्षा थांबा आहे, बस थांबेही आहेत. पण बसेस तर किमान पाऊण तासाआधी कधीच येत नाही. रिक्षा थांबा असूनही जुन्या सिनेमागृहात जसे ब्लॅकवाले असत अगदी त्याचप्रमाणे स्थानकाच्या दरवाज्यापासून घोडबंदर, गायमुख, चेक नाका, भिवंडी, काल्हेर अशा हाळ्या देत रिक्शावाले प्रवाशांची वाट अडवताना दिसतात. खासदार साहेब नेहमीच सांगत असतात की, स्थानकाची कामे सुरु आहेत. पण स्थानकाची काय दशा झाली आहे ते पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ येणार म्हणजे बरोवर कार्यकर्तेही असणार… म्हणजे संध्याकाळचे ‘चालणेच’ होणार. त्यापेक्षा रात्री दीड वाजल्यानंतर खासदार व उपमुख्यमंत्र्यांनी लवाजमा न घेता स्थानक तसेच स्थानक परिसराची पाहणी करणे आवश्यक ठरले आहे. पश्चिमेला काही सोयी तरी आहेत. पूर्व बाजू जणू पोरकीच असल्यासारखी वागणूक मिळत आहे. “A Rail station is something that can generates a city” असं म्हणतात, हे या लोकांच्या गावीच नसावे! शहर म्हणून ओळख मिळाली आहे. पण बस्स इतकेच. “An active and vibrant railway system confers many benefits on the Society” हे यांना अजून माहित नसावे. दरम्यान, अधिक चौकशी करता व अनेक फलाटावर संबंधितांशी बोलताना या स्थानकात सुमारे 50 सफाई कामगार तैनात असल्याचे समजले. या 50पैकी जेमतेम 20जण हजर असतात, तेही त्यांच्या मार्जीनुसार. सफाईचे काम कंत्राटाने दिलेले आहे. यापैकी काही कामगार केवळ कागदावरच आहेत अशीही कुजबूज ऐकू आली. रात्री मात्र या कामगारांची उपस्थिती जाणवते, असे अनेकांनी सांगितले. आता हे कामगार स्थानक स्वच्छ करणार त्यावरच ठाणे रेल्वेस्थानकाची भिस्त आहे.
ह्याला जबाबदार गेंड्याची कातडी असलेले लोकप्रतिनिधीच..अगदी 100%. त्यांच्या दुर्लक्षामुळे, अकार्यक्षमतेमुळे अधिकारी आणि त्यांच्या खालचा वर्ग नुसत्या पाट्या टाकतात.