Saturday, July 27, 2024
Homeपब्लिक फिगरविधान परिषदेच्या कामकाजात...

विधान परिषदेच्या कामकाजात माजी सदस्यांचेही योगदान महत्त्वाचे!

विधान परिषदेतील सदस्यांनी भाषणांद्वारे व्यक्त केलेली व्यापक लोकहिताची भूमिका आजही सर्वांना मार्गदर्शन करणारी आहे. सदस्यांनी लोकहितासाठी वेळोवेळी सभागृहात आपली मते अभिव्यक्त केली आणि त्यातूनच लोकहिताचे अनेक क्रांतिकारी कायदे तयार झाले. त्यामुळे विधान परिषदेतील कामकाजात आजी व माजी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल केले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि माजी विधान परिषद सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,  माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे आजी-माजी सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, विधिमंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

विधान परिषदेतील सदस्य चळवळीतून, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात. समाजमनाचा अचूक मागोवा घेऊन ते सभागृहात बोलत असतात. त्यांच्या योगदानामुळेच रोजगार हमी कायदा, स्त्रीभ्रूणहत्या कायदा, प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन कायदा, डान्सबार बंदी कायदा, माहितीचा अधिकार यासारखे समाजाचे जीवनमान उंचाविणारे कायदे करण्यात विधान परिषदेचे मोठे योगदान राहिले आहे. सदस्याचा कालावधी संपला म्हणजे काम संपत नाही. अनेक समित्यांवर सदस्य काम करत असतात. विधानसभा आणि विधान परिषदेतील नियम वेगळे असले तरी दोन्ही सभागृहाचे कामकाज सारखेपणाने सुरू असते. सद्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून कामकाज चालवले जात आहे. अधिवेशन काळात समाजाचे लक्ष कसे कामकाजावर असते याबाबतचा आपला अनुभव उपसभापती डॉ गोऱ्हे यांनी यावेळी सांगितला.

शतक महोत्सवानिमित्त विधान परिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्त्व आणि वैशिष्ट्यं, गत शंभर वर्षांतील महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव, विधान परिषदेमध्ये लोकहिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे – शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबलबुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित असून यासंदर्भातील संपादन कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र विधानमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राहुल नार्वेकर

लोकशाहीमधील उणिवा भरून काढणे आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीतील या सार्वभौम सभागृहाचे आतापर्यतचे कामकाज प्रेरणादायी राहिले आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये “BOMBAY LEGISLATIVE COUNCIL”ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी मुंबईच्या टाऊन हॉल येथे झाली. सन १८६२ ते सन १९२०पर्यंत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे कामकाज चालत होते. सन १९२१मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात व्दिसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे, असे नार्वेकर म्हणाले.

यामुळे दिवंगत सदस्यांच्या आठवणींना उजाळा – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सभागृहात अनेक ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, समाजसेवक, कलावंत इ. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सभासद म्हणून सहभाग असतो. खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचे जतन करणे व लोकशाही बळकट करणे ही दोन्ही उद्दिष्टे या सभागृहामुळे साध्य होतात. अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते, नवीन कायदे होतात आणि समाजाला न्याय मिळतो. सभागृहात सदस्यांना आपले विचार मांडायला संधी मिळते. या शताब्दी वर्षप्रित्यर्थ आयोजित परिसंवादाचे विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे असून त्यातून आपल्या सर्वांच्या मनातील जुन्या आठवणी व प्रसंग तसेच दिवंगत सदस्यांच्या आठवणी उभ्या राहतील.

प्रतिवर्षी असे मेळावे व्हावेत – वडेट्टीवार

विधान परिषद ही व्यवस्था लोकशाहीला बळकट करणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. पुरोगामी विचार रुजविण्याचे काम सभागृहाने केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून जास्तीतजास्त सदस्य विधान परिषदेवर आले पाहिजेत, त्यांच्यासाठी असलेली सदस्यांची संख्या वाढवली पाहिजे. प्रतिवर्षी आजी-माजी सदस्यांचा मेळावा घेण्यात यावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केल्या.

ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, अजय वैद्य, विजय वैद्य, राही भिडे, योगेश त्रिवेदी, विलास मुकादम, शीतल करदेकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

Continue reading

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत रमेश खरेंना सुवर्णपदक

मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. पेणच्या हनुमान व्यायामशाळेत सराव करणाऱ्या रमेश उर्फ आप्पा खरे यांची निवड 66 किलो वजनी...

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...
error: Content is protected !!