Homeहेल्थ इज वेल्थजेमतेम सव्वा किलोच्या...

जेमतेम सव्वा किलोच्या बाळावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एका दुर्मिळ आणि गंभीर प्रकरणात शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता व्यवस्थापनाद्वारे ३० आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या १.३ किलोग्रॅम वजनाच्या आणि टाईप सी ट्रॅकिओ-इसोफॅजियल फिस्टुला (TEF) या दुर्मिळ जन्मजात समस्येने ग्रस्त असलेल्या बाळावर यशस्वी उपचार केले. या जन्मजात समस्येमुळे श्वासनलिका आणि अन्ननलिकेमध्ये असामान्य जोड निर्माण होते, ज्यामुळे जास्त लाळ येणे, गुदमरणे तसेच फुफ्फुसांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. वैद्यकीय टीमने एकाच टप्प्यातील शस्त्रक्रिया आणि नंतर इसोफॅजियल डायलटेशन केली. ही प्रक्रिया अशा नाजूक प्रकरणात प्रथमच यशस्वी झाली आहे. बहुविशेषज्ञ टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बाळ आता स्थिर असून फक्त आईचे दूध घेत आहे. बाळाचे वजन १.८ किलो झाले आहे आणि लवकरच त्याला घरी पाठवण्यात येईल.

वापी, गुजरात येथे जन्मलेल्या या बाळाला या समस्येमुळे जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागले. पालकांनी जसलोक हॉस्पिटलचे बालरोग विभागप्रमुख डॉ. फजल नबी यांच्याशी उच्चस्तरीय उपचारांसाठी संपर्क साधला. प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करून डॉ. नबी स्वतः वापीला गेले आणि बाळाला कृत्रिम श्वसनासह त्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे जसलोक हॉस्पिटलमध्ये आणले. बाळाला तत्काळ बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, जिथे डॉ. फजल नबी यांनी उपचारांची जबाबदारी घेतली. त्यावेळी बाळ व्हेंटिलेटरवर होते. इनोट्रोप्ससह हेमोडायनामिक स्टॅबिलायझेशन करण्यात आले आणि सेप्सिसवरील उपचार सुरू करण्यात आले. यानंतर प्रसिद्ध बालशल्यचिकित्सक डॉ. नार्गिश बारसीवाला यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. त्यांनी बाळ स्थिर झाल्यावर एकाच टप्प्यातील शस्त्रक्रिया करणे उचित असल्याचे सांगितले. तिसऱ्या दिवशी, डॉ. बारसीवाला यांनी फिस्टुला लिगेशन आणि इसोफॅजियल अ‍ॅनास्टोमोसिससह वन-स्टेज करेक्टिव्ह सर्जरी केली. त्यानंतर बाळाला पुन्हा अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतरच्या काळात टीमला आतड्यांच्या  हालचालींबाबत आणखी एक समस्याला सामोरे जावे लागले. प्रिमॅच्युरिटी आणि कमी वजनामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित होत नव्हती. बाळाला एनजी ट्यूबद्वारे दूध देण्यात आले आणि काही प्रमाणात टोटल पॅरेन्टेरल न्यूट्रिशन दिले गेले. त्याला गिळण्यासही अडचण होत होती. साधारणतः एक महिना एनजी ट्यूबद्वारे फीड देण्यात आले आणि नंतर फीडिंग गॅस्ट्रोस्टोमीचा निर्णय घेण्यात आला व एनजी ट्यूब काढण्यात आली. तथापि, एका महिन्यानंतरही बाळाला गिळण्यास अडचण येत होती. ही अडचण दूर करण्यासाठी गॅस्ट्रोस्टोमी प्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या टीमने सर्वात छोटा उपलब्ध डायलटेर वापरून उच्च-जोखमीची इसोफॅजियल डायलटेशन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही नाजूक प्रक्रिया जसलोक हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सल्लागार डॉ. पंकज धवन यांनी पार पाडली. या प्रक्रियेमध्ये बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. फजल नबी, डॉ. बारसीवाला आणि भूलतज्ज्ञ टीमचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. हळूहळू बाळ स्वतः गिळू लागले आणि अखेरीस एनजी ट्यूब काढण्यात आली.

डॉ. फजल नबी, संचालक, बालरोग विभाग, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर म्हणाले की, जेव्हा बाळ आले तेव्हा ते अत्यंत नाजूक आणि कमकुवत होते. त्याला तातडीच्या उपचारांची गरज होती. स्थिरीकरणापासून शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतींच्या व्यवस्थापनापर्यंत, प्रत्येक पायरी काळजीपूर्वक नियोजित करावी लागली. इसोफॅजियल डायलटेशन हे विशेषतः आव्हानात्मक होते, पण आमच्या टीमने उत्तम समन्वयाने हे साध्य केले. आता बाळ स्वतः फीड घेत आहे आणि घरी जाण्यास सज्ज आहे.

डॉ. नार्गिश बारसीवाला, सल्लागार, बालशल्यचिकित्सा, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर म्हणाल्या की, १ किलोपेक्षा थोडे जास्त वजन असलेल्या अकाली बाळावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण असते. ऊती अत्यंत नाजूक असतात आणि चूक झाली तर जीव धोक्यात येऊ शकतो. मात्र परिस्थिती अशी होती की प्रतीक्षा शक्य नव्हती. आम्ही सिंगल-स्‍टेज करेक्टिव सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. जोखीम माहिती असूनही दीर्घकालीन फायद्यांचा विचार केला. यशस्वी निकाल अचूक शस्त्रकौशल्यामुळे, भूलतज्ज्ञ डॉ. रजनी प्रजीश, डॉ. कोटवाला आणि शस्त्रक्रिया निवासी डॉक्टरांच्या सहाय्यामुळे शक्य झाल्या.

कृतज्ञता व्यक्त करताना बाळाची आई तृप्ती म्हणाल्या की, माझं बाळ लग्नानंतर ८ वर्षांच्या अंतराने आयव्हीएफद्वारे झालं आणि आमच्यासाठी खूपच अनमोल आहे. अकाली आणि इतकं नाजूक बाळ जन्मल्यावर मी खूप घाबरले होते. पण जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उपचारांनी आणि सहवेदनेने आम्हाला आशा मिळाली. मला विश्वास आहे की, त्यांच्या कौशल्याशिवाय आणि सेवाभावाशिवाय माझं बाळ आज इथे नसतं. सध्या हे कुटूंब घरी बाळाची काळजी घेण्यासाठी सर्व मार्गदर्शन घेत आहे, ज्यामध्ये सुरक्षित फीडिंग पद्धती, औषधांचे वेळापत्रक आणि महत्त्वाची धोक्याची चिन्हे यांचा समावेश आहे.

Continue reading

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...
Skip to content