मुंबईपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाला सापडला आहे. एवढं ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे मंदिर अनेक वर्षं दुर्लक्षितच होतं.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला येऊ शकता. स्टेशनवरून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. इकडे आल्यावर आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.
या मंदिराचं भारतीय इतिहासात किती महत्त्वाचं स्थान आहे, याची माहिती मुंबईतील ‘जय हिंद कॉलेज’च्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. कुमुद कानिटकर या सतत देत असतात. डॉ. कुमुद कानिटकर यांनी या मंदिरावर संशोधन करून ‘अंबरनाथ शिवालय’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. डॉ. कुमुद कानिटकर यांना या मंदिरातील शिल्पांबाबत खडा न खडा माहिती आहे. या मंदिराचे विविध पैलू उलगडताना त्या सांगतात, “अंबरनाथशी माझी कुठेतरी नशिबाने गाठ पडली. ही साधारण 1995ची गोष्ट असेल. मी प्राध्यापिका होते. त्यावेळी कॉलेजला सुट्ट्या होत्या. पण माझ्या मुलीची परीक्षा जूनपर्यंत चालणार होती. त्यामुळे मला कुठेच जाता येत नव्हतं. “त्यावेळी योगायोगाने रिझर्व्ह बँकेचं कॅलेंडर हे राज्यातील मंदिरांवर होतं आणि त्यामध्ये अंबरनाथचं मंदिरही होतं. मी ते पाहून लगेचच मुंबईतल्या एशियाटिक लायब्ररीमध्ये जाऊन त्याबद्दलची माहिती गोळा केली. “अंबरनाथ शिवालय’ पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे. त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये “हे देऊळ पूर्ण झाले”, असा उल्लेख आहे.
डॉ. कुमुद कानिटकर सांगतात, “अंबरनाथचे शिवमंदिर हे सामाजिक, राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या, एका मध्य ठिकाणी आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा त्यावर प्रभाव पडला आहे. त्या सगळ्या राजांचा यावर प्रभाव पडला आहे.”
त्या सांगतात की, धारच्या भोज राजाच्या काळातील ‘समरांगणसूत्रोध्दार’ या शिल्पशास्त्रावरील ग्रंथात भूमीज मंदिर प्रकाराचा उल्लेख आहे. “काही लोक या मंदिराला हेमाडपंथी म्हणतात. पण हे चुकीचं आहे. भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू. हे असं एकच भूमिज मंदिर, ज्याचं द्राविडीकरण केलं गेलेलं आहे.”
गेल्या काही वर्षांपासून या मंदिराकडे लक्ष दिलं जात आहे. हे स्थळ पूर्वीच पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलं असतं तर आजचं चित्र फार वेगळं असतं. आता रस्ते, मंदिरातील लाद्या बसवल्यामुळे भाविकांची सोय झाली आहे. या प्राचीन शिवमंदिराचा अनेक दिग्गजांनी अभ्यास केला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नेहमी सांगत असतात की, हे मंदिर उभारण्यात आले त्या काळात अशी अनेक शिल्पं, वास्तू उभारल्याची नोंद इतिहासात आहे. मात्र त्यातील बहुतेक वास्तू या नैसर्गिक अथवा मानवी आक्रमणात नष्ट झाल्या आहेत. सुदैवाने अंबरनाथ इथलं शिवमंदिर बऱ्यापैकी उभे आहे. हे मंदिर आणि त्याची कला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे.
प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांनीसुद्धा अनेक वेळा येऊन या मंदिराचा आणि शिल्पांचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे पदमश्री सदाशिव गोरक्षकर यांनीसुद्धा या मंदिराचा अभ्यास केला आहे. ते केंद्र सरकारच्या समितीवर सदस्य असताना त्यांनी या मंदिराविषयी पाठपुरावा केला होता. अंबरनाथ येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव कुलकर्णी हे तर सेवानिवृत्तीनंतर सतत या मंदिरात जाऊन अभ्यास करीत असत आणि आपल्याला असलेली माहिती ते शिवमंदिराच्या अभ्यासकांना देत असत.
एक विशेष बाब म्हणजे येथील भगिनी मंडळाच्या विद्यार्थ्यांना या शिवमंदिराची बऱ्यापैकी माहिती आहे. ते या मंदिरात येणाऱ्या अभ्यासकांना आपल्याकडे असलेली माहिती मंदिरात जाऊन सांगत असतात. त्यामुळे भावी पिढीलाही या मंदिराची माहिती आणि महती कळू शकते. येथील खासदार या शिवमंदिराकडे लक्ष देत आले आहेत. मग प्रा. रामभाऊ कापसे असो, खासदार प्रकाश परांजपे असो. खासदार आनंद परांजपे असो की विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असो, सर्वच आपापल्या परीने या मंदिराकडे लक्ष देऊन विकासकामे करू इच्छित आहेत. किसन कथोरे अंबरनाथचे आमदार असतांना त्यांनी जिल्हा नियोजन मंडळातून या मंदिर परिसराचा विकास करण्याचा आरखडा मंजूर करवून घेऊन काम सुरूही केले होते. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निवडून आल्यावर या मंदिराकडे विशेष लक्ष दिले गेले असल्याचे जाणवते. गेल्या काही वर्षांपासून डॉ. शिंदे, फाउंडेशनच्या माध्यमातून शिवमंदिर कला महोत्सव आयोजित करीत असतात. त्या माध्यमातून या शिवमंदिराची महती जगभर पसरू लागली आहे. अलीकडेच त्यांनी या शिवमंदिर परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला असून त्याला बऱ्यापैकी यश मिळत आहे. पहिल्या टप्प्यात ४३ कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, इतिहासप्रेमी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेही मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे.
अतिशय दुर्मिळ माहिती. अभ्यासपूर्ण लेख.