उत्तराखंडात सिलक्यारा येथे सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याबाबत खळबळजनक वृत्तांकन करण्यापासून दूरचित्रवाणी वाहिन्यांना परावृत्त करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल एक सूचना जारी केली आहे.
या सूचनेनुसार, वाहिन्यांनी बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणच्या बोगद्याच्या आजूबाजूची परिस्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही थेट पोस्ट्स अथवा व्हिडिओ प्रसारित करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी अथवा लगतच्या परिसरात कॅमेरामन, पत्रकार किंवा त्यांची साधने यांच्या उपस्थितीमुळे विविध संस्थांतर्फे माणसांचे जीव वाचवण्यासाठी तेथे सुरु असलेल्या कामात अडथळा निर्माण होणार नाही अथवा हे कार्य करणाऱ्यांना त्रास होणार नाही याची सुनिश्चिती करून घेण्याच्यादेखील सूचना केंद्रीय मंत्रालयाने दिल्या आहेत.
बोगद्याचे बांधकाम पूर्ण झालेल्या 2 किलोमीटरच्या भागात अडकलेल्या कामगारांशी सरकार सातत्याने संपर्क करत असून त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेथे अडकलेल्या 41 कामगारांची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी विविध सरकारी संस्था अथक प्रयत्न करत आहेत. बोगद्याच्या ठिकाणी सुरु असलेले बचावकार्य अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असून त्यामध्ये अनेक जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी तेथे सुरु असलेल्या कामाचे व्हिडीओ आणि संबंधित छायाचित्रे प्रसारित करण्यामुळे विशेषतः बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणाच्या जवळ कॅमेरे तसेच इतर साधने बसवल्यामुळे सध्या तेथे सुरु असलेल्या बचावकार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
या दुर्घटनेचे वृत्तांकन करताना विशेषतः ठळक बातम्या, व्हिडीओ आणि तेथील परिस्थिती दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करताना दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सतर्क राहावे तसेच संवेदनशीलता बाळगावी अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. तसेच या बचाव कार्याचे संवेदनशील स्वरूप, तेथे अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांची मनस्थिती तसेच एकंदर, सर्वसामान्य प्रेक्षकांची परिस्थिती यासंदर्भात योग्य ती काळजी घेऊन वृत्तांकन करावे असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वाहिन्यांना दिला आहे.