Saturday, June 22, 2024
Homeडेली पल्सबालसाहित्यकार एकनाथ आव्हाड...

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार, मराठी भाषेसाठी ‘छंद देई आनंद’ या कवितासंग्रहास काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे कवी व बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी स्वीकारला.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023चा प्रदान समारंभ त्रिवेणी कला संगम, मंडी हाऊस, नवी दिल्ली येथे गुरुवारी सांयकाळी झाला. यावेळी इंग्रजी लेखक आणि अभ्यासक हरीश त्रिवेदी, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते सन्माननीय साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्य अकादमीच्या वर्ष 2023च्या बालसाहित्य पुरस्कारासाठी 23 प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती. यामध्ये रविंद्रनाथ गोस्वामी (आसामी), श्यामलकांती दाश (बंगाली), प्रतिमा नंदी नार्जारी (बोडो), बलवान सिंग जमोडिया (डोगरी), सुधा मूर्ती (इंग्रजी), रक्षाबेन पी. दवे (गुजराती), सूर्यनाथ सिंग (हिंदी), विजयश्री हालाडी (कन्नड), तुकाराम रामा शेट (कोंकणी), अक्षय आनंद ‘सनी’ (मैथिली), प्रिया ए. एस. (मल्याळम), दिलीप नाडमथन (मणिपुरी), एकनाथ आव्हाड (मराठी), मधुसूदन बिष्ट (नेपाळी), जुगल किशोर षडंगी (ओडिया), गुरमित कडिआलवी (पंजाबी), किरण बादल (राजस्थानी), राधावल्लभ त्रिपाठी (संस्कृत), मानसिंग माझी (संताली), ढोलन राही (सिंधी), के. उदयशंकर (तमिळ), डी. के. चादुवुल बाबू (तेलुगु) आणि दिवंगत मतीन अचलपुरी (उर्दू) यांचा समावेश होता.

पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे आहे. मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षयकुमार काळे, बाबा भांड आणि प्रो (डॉ.) विलास पाटील यांचा समावेश होता.

‘छंद देई आनंद’ या काव्यसंग्रहाविषयी…

‘छंद देई आनंद’ मराठी बालकविता संग्रहात इतिहास, विज्ञान, पर्यावरण आणि संस्कृतीबद्दलची माहिती सोप्या भाषेत मांडली गेली आहे. हा संग्रह वाचकांना समाज, वनस्पती आणि प्राण्यांबद्दल शिक्षित व जागरूक करतो, मुलांचे मनोरंजन करतो आणि त्यांना जीवनातील विविध उपयुक्त गोष्टींचे महत्त्व समजण्यास आणि चांगल्या सवयी विकसित करण्यास मदत करतो. कवितांची लय मंत्रमुग्ध करणारी आहे आणि हे कार्य पालक, शिक्षक आणि निसर्गाबद्दल प्रेम, आपुलकी आणि आदर आकर्षित करते.

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्याविषयी…

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली 30 वर्षे ते शिक्षक म्हणून एकनाथ आव्हाड कार्यरत आहेत. गेली 30 वर्षे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन ते करतात.

सानेगुरुजींची कथाकथन परंपरा पुढे नेण्यासाठी ते नेहमी प्रयत्नरत असतात. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक सानेगुरुजी पुरस्काराचे ते मानकरी आहेत. बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची फुले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद, पाऊस पाणी हिरवी गाणी हे बालकवितासंग्रह, आनंदाची बाग, एकदा काय झालं!, खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा, प्रकाशाचा उत्सव हे बालकथासंग्रह, मजेदार कोडी, आलं का ध्यानात?, खेळ आला रंगात हे काव्यकोडी संग्रह, मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह, मिसाईल मॅन हे चरित्र… आदि त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत.  त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये आणि ब्रेल लिपीमध्येदेखील अनुवाद झालेले आहेत. त्यांची जवळपास 30 पुस्तके प्रसिद्ध असून, त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा वा. गो. मायदेव पुरस्कार, बालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

Continue reading

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे शहर म्हणजे मुंबई

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक...

देशातल्या 8 लोकसभा मतदारसंघांच्या काही मतांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे 8 आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे: लोकसभा आम चुनाव 2024ईवीएम जांच...

कायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी...
error: Content is protected !!