रॉयल नेव्हीचे एचएमएस स्पाई हे ऑफशोअर गस्ती जहाज 17 ते 27 जानेवारी 2024दरम्यान कोचीच्या सदिच्छा भेटीवर आहे. आगमनानंतर भारतीय नौदल बँडने या जहाजाचे जल्लोषात स्वागत केले.
कोची येथे पोर्ट कॉल दरम्यान, भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही यांच्यात व्यावसायिक आणि सामाजिक संवाद तसेच क्रीडा संबंधी उपक्रम आयोजित करण्यात आले. रॉयल नेव्हीच्या कर्मचार्यांनी आयएनएस सुनयनाला भेट दिली आणि दोन्ही नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढविण्याच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक केल्या. कमोडोर पॉल कॅडी, कमांडिंग ऑफिसर, एचएमएस स्पाई यांनी कमोडोर सर्वप्रीत सिंग, चीफ स्टाफ ऑफिसर (परिचालन), दक्षिणी नौदल कमांड यांची भेट घेतली आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
या भेटीदरम्यान, मुख्यालय सी ट्रेनिंग (एचक्यूएसटी) च्या पथकाने एचएमएस स्पाई जहाजावर दलासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना, नुकसानावर नियंत्रण आणि अग्निरोधक प्रशिक्षण मॉड्यूलचे आयोजन केले. या सरावामुळे दोन्ही नौदलांद्वारे अवलंबण्यात येत असलेल्या प्रक्रिया आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी एचक्यूएसटी आणि जहाजाच्या पथकांना मदत झाली. व्यावसायिक देवाणघेवाणीमुळे सागरी सुरक्षा आणि प्रशिक्षणामध्ये परस्पर सहकार्याच्या महत्त्वावर भर देत मजबूत नौदल भागीदारीला चालना देण्याच्या दोन्ही नौदलाच्या वचनबद्धतेचा आदर्श समोर ठेवला.