Friday, December 13, 2024
Homeडेली पल्सनौदलातर्फे कमांडर अभिलाष...

नौदलातर्फे कमांडर अभिलाष टॉमी (नि.) यांचा सत्कार!

गोल्डन ग्लोब रेस (जीजीआर) 2022 ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय नागरिक, कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी त्यांचा गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

29 एप्रिल 2023 रोजी कमांडर अभिलाष टॉमी यांनी इतिहास रचत जीजीआर 2022 ही शर्यत दुसऱ्या क्रमांकासह जिंकली. तसेच ही शर्यत पूर्ण करणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले. 04 सप्टेंबर 2022 रोजी किनाऱ्यावरून प्रयाण केल्यापासून 236 दिवस, 14 तास आणि 46 मिनिटांचा जलप्रवास पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेच्या कस्टर्न न्यूशॉफर पाठोपाठ फ्रान्सच्या लेस सेबल्स-डी’ओलोनच्या किनाऱ्यावर परतत कमांडर अभिलाष टॉमी यांनी दुसऱ्या क्रमांकाने ही शर्यत पूर्ण केली.

यापूर्वी, वर्ष 2013मध्ये, कमांडर टॉमी आयएनएसव्ही म्हादेई या बोटीवरून एकटे, विना थांबा, जग प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांनी जीजीआर 18 मध्ये देखील भाग घेतला होता मात्र, जलप्रवासादरम्यान त्यांची बोट वादळामध्ये अडकली आणि त्यावेळी पाठीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना या स्पर्धेतून माघार घावी लागली होती.

पाच वर्षानंतर, कण्यातील टायटॅनियम रॉड आणि पाच एकमेकांशी जोडले गेलेले मणके यांच्यासह त्यांनी मानवी विजीगिषु वृत्तीची परीक्षा घेतली आणि जीजीआर 22 मध्ये दुर्मिळ सहनशक्ती धैर्य आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. वर्ष 1968 मध्ये एकट्याने बोटीने जगप्रदक्षिणा करणारे पहिले नाविक, सर रॉबिन नॉक्स जॉन्सन यांच्या सन्मानार्थ जीजीआर या शर्यतीचे आयोजन करण्यात येते.

जीजीआर 22 मध्ये भाग घेण्यासाठी 16 जणांनी नोंदणी केली आणि स्पर्धेच्या नियमानुसार त्या सर्वांनी वर्ष 1968 मध्ये उपलब्ध असलेली साधने तसेच तंत्रज्ञान वापरुन एकट्याने जगप्रदक्षिणा पूर्ण करणे अपेक्षित होते. कमांडर टॉमी यांच्यासह केवळ तीन जण ही शर्यत पूर्ण करू शकले. उर्वरित स्पर्धकांना तांत्रिक अडचणी किंवा अपघातामुळे ही शर्यत अर्धवट सोडून द्यावी लागली.

भारतीय नौदलातर्फे आयोजित सागर परिक्रमेच्या पुढील शर्यतीत एकट्याने जगप्रदक्षिणा करण्यासाठी तयारी करत असलेल्या दोन महिला नौदल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य कमांडर अभिलाष टॉमी यांनी नुकतेच स्वीकारले आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content