एक महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील एकक आणि उर्जा मंत्रालया अंतर्गत एक अग्रगण्य बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आरईसी लिमिटेडला आर्थिक वर्ष 2022-23साठी ‘आर्थिक सेवा क्षेत्र (बँकिंग आणि विमा व्यतिरिक्त)’ श्रेणी अंतर्गत आर्थिक अहवाल उत्कृष्टतेचा आयसीएआय अर्थात भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या श्रेणी अंतर्गत आयसीएआय द्वारे प्रदान केलेला हा एकमेव पुरस्कार आहे आणि कंपनीच्या लेखा पद्धती, प्रकटीकरण धोरणे, वित्तीय विवरणांचे सादरीकरण, वार्षिक अहवालात समाविष्ट असलेली इतर माहिती आणि भारतीय लेखा मानके, वैधानिकतेच्या अनुपालनाचे प्रमाण, मार्गदर्शक तत्वे आणि नियम यावर आधारित ही निवड करण्यात आली.
आरईसीचे संचालक (वित्त) अजॉय चौधरी; आरईसीचे कार्यकारी संचालक (वित्त) संजय कुमार आणि आरईसीचे विभाग प्रमुख (वित्त) जतिन कुमार नायक यांनी रायपूर येथे आयोजित समारंभात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. आयसीएआयचे अध्यक्ष सनदी लेखापाल अनिकेत सुनील तलाटी, उपाध्यक्ष सीए रणजीत कुमार अग्रवाल, संशोधन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि आयसीएआय परिषदेचे सदस्यदेखील यावेळी उपस्थित होते.
हा मान मिळाल्याबद्दल अजॉय चौधरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आरईसी लिमिटेडच्या चमूच्या आर्थिक लेखाजोखा दर्जात्मक राखण्याच्या समर्पणावर प्रकाश टाकला.
आरईसी लिमिटेडविषयी थोडेसे..
आरईसी लिमिटेड ही एक बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे जी संपूर्ण भारतातील ऊर्जा क्षेत्रातील वित्त पुरवठा आणि विकासावर लक्ष केंद्रित करते. ती राज्य विद्युत पुरवठा मंडळे, राज्य सरकारे, केंद्र आणि राज्य वीज उपयुक्तता, स्वतंत्र वीज उत्पादक, ग्रामीण विद्युत सहकारी संस्था आणि खासगी क्षेत्रातील उपयुक्तता यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. तिच्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये संपूर्ण ऊर्जा क्षेत्रातील मूल्य साखळीतील प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे समाविष्ट आहे. आरईसीने अलीकडेच पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक क्षेत्रातही वित्तपुरवठा केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अखेर आरईसीच्या कर्ज खाते वहीत 4.74 लाख कोटी रुपयांची नोंद आहे.