Saturday, June 22, 2024
Homeएनसर्कलपंतप्रधानांच्या हस्ते बोईंग...

पंतप्रधानांच्या हस्ते बोईंग इंडिया अभियांत्रिकी संकुलाचे उद्‌घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकातील बेंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्‌घाटन केले. 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बांधण्यात आलेले हे 43 एकर क्षेत्राचे संकुल बोईंगची अमेरिकेबाहेरची अशी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पंतप्रधानांनी बोईंग सुकन्या कार्यक्रमाचादेखील प्रारंभ केला ज्याचा उद्देश देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील जास्तीतजास्त मुलींच्या प्रवेशाला पाठबळ देणे हा आहे.

पंतप्रधानांनी एक्स्पिरिअन्स सेंटरची पाहणी केली आणि सुकन्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

बोईंग कंपनीच्या मुख्य परिचालन अधिकारी स्टेफनी पोप यांनी भारतातील विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीकडे पंतप्रधानांचे असलेले लक्ष आणि बोईंग सुकन्या कार्यक्रम आज प्रत्यक्षात साकारण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली. सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि एरोस्पेसच्या भविष्याला आकार देण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे नमूद केले. स्टेफनी म्हणाल्या की, हे नवीन संकुल बोईंगच्या अभियांत्रिकी वारशाचा दाखला आहे आणि ते भारतात अस्तित्वात असलेल्या उपलब्धता, अमाप प्रतिभा आणि क्षमतेवरील विश्वास अधोरेखित करते.

नवीन संकुलाची व्याप्ती आणि भारताला एरोस्पेस उद्योगात आघाडीवर नेणारी परिसंस्था उभारण्याच्या बोईंगच्या योजनेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. नवीन बोईंग संकुल हे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या सर्वात प्रगत उदाहरणांपैकी एक बनेल असा विश्वास स्टेफनी यांनी व्यक्त केला. त्यांनी सुकन्या कार्यक्रमाच्या कल्पनेचे श्रेय पंतप्रधानांना दिले आणि भारतीय महिलांसाठी विमान वाहतूक क्षेत्रात संधी निर्माण करण्यासाठी आणि आणखी गती देण्यासाठी बोईंगच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

हा कार्यक्रम सर्व अडथळे दूर करेल आणि जास्तीत जास्त महिलांना एरोस्पेसमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करेल असे त्या म्हणल्या. आगामी काळात माध्यमिक शाळांमध्ये एसटीईएम-स्टेम लॅब उपलब्ध करून देण्याच्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली. बोईंग आणि भारताची भागीदारी विमानवाहतुकीच्या भविष्याला आकार देईल तसेच भारत आणि जगभरातील लोकांसाठी सकारात्मक बदल घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, बेंगळुरू हे शहर आकांक्षांना नवोन्मेष आणि यशाशी तसेच भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेला जागतिक मागणीशी जोडते. बोईंगचे नवीन तंत्रज्ञान संकुल  हा विश्वास अधिक दृढ करणार आहे. नव्याने उद्घाटन झालेले हे संकुल बोईंगचे अमेरिकेबाहेरचे सर्वात मोठे केंद्र आहे असे पंतप्रधान म्हणाले. याची भव्यता आणि आकार केवळ भारतच नव्हे तर जागतिक विमान वाहतूक बाजारपेठ बळकट करेल असे त्यांनी अधोरेखित केले.

ही सुविधा जागतिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्य, डिझाइन आणि मागणीची पूर्तता करण्याची भारताची वचनबद्धता दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले. हे ‘मेक इन इंडिया-मेक फॉर द वर्ल्ड’ ही संकल्पना मजबूत करते, असेही ते म्हणाले. हा परिसर जगाचा भारताच्या प्रतिभेवरील विश्वास वाढवणारा आहे, असे त्यांनी सांगितले. या परिसरात एक दिवस भारत भविष्यातील विमाने तयार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याच्या उद्घाटनाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, ही बोईंगची नवीन सुविधा कर्नाटकला नवीन हवाई केंद्र म्हणून उदयास आणेल याचा स्पष्ट संकेत आहे. त्यांनी भारतातील तरुणांचे विशेष अभिनंदन केले. या युवकांना आता विमान उद्योगात नवीन कौशल्ये आत्मसात करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी भर दिला आणि भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला. एरोस्पेस क्षेत्रात महिलांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लढाऊ वैमानिक असो किंवा नागरी विमान वाहतूक, महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार काढत पंतप्रधान म्हणाले की, भारतातील 15 टक्के वैमानिक महिला आहेत. हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा 3 पट अधिक आहे. बोईंग सुकन्या उपक्रमाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात महिलांच्या सहभागाला चालना मिळेल आणि दूर्गम भागात राहणाऱ्या गरिबांना आपले वैमानिक  बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होईल. या उपक्रमात वैमानिक म्हणून कारकिर्द घडवण्यासाठी सरकारी शाळांमध्ये करिअर कोचिंग आणि विकास सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

चांद्रयानच्या ऐतिहासिक यशामुळे भारतातील तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एसटीईएम (स्टेम- विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) शिक्षणाचे केंद्र म्हणून भारताची स्थिती अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की मुलींनी मोठ्या प्रमाणावर स्टेम  विषयात रस घेतला आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ बनला आहे, असेही त्यांनी सांगितले. एका दशकात देशांतर्गत प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. यामध्ये उडान सारख्या योजनांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. ही संख्या आणखी वाढणार आहे ज्यामुळे मागणी देखील वाढेल. याचेच फलित म्हणून भारताच्या हवाई कंपन्यांच्या ताफ्यांच्या नवीन मागणीमुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्राला नवी चालना मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. भारत आपल्या नागरिकांच्या आकांक्षा आणि गरजा सर्वोपरि ठेवून काम करत आहे म्हणूनच हे घडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या कार्यक्षमतेला रोखणाऱ्या खराब संपर्क सुविधांच्या पूर्वीच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी संपर्क सुविधांच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीवर सरकारचे लक्ष केंद्रित करण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. भारत ही सर्वात चांगली संपर्क व्यवस्था असलेली बाजारपेठ बनत आहे, असे त्यांनी सांगितले. आज भारतात सुमारे 150 कार्यरत विमानतळ आहेत, जेव्हा की 2014 मध्ये केवळ 70 विमानतळ कार्यरत होते, यांचा उल्लेख त्यांनी केला. विमानतळांची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.  त्यांनी वाढलेल्या हवाई मालवाहू क्षमतेचा देखील उल्लेख केला आणि याच कारणाने अर्थव्यवस्था तसेच रोजगार निर्मितीची एकूण वाढ होत असल्याचे सांगितले.

भारताच्या विमानतळ क्षमतेच्या वाढीमुळे हवाई मालवाहतूक क्षेत्राच्या झालेल्या जलद वाढीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. यामुळे भारतातील दुर्गम भागातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनांची वाहतूक सुलभ झाली आहे, असे ते म्हणाले. जलद गतीने वाढणारे विमान वाहतूक क्षेत्र देखील भारताच्या एकूण विकासाला आणि रोजगार निर्मितीला चालना देत आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

आपल्या विमान वाहतूक क्षेत्राचा विकास सुरूच राहावा आणि त्याला गती मिळावी यासाठी सरकार धोरणात्मक स्तरावर सातत्याने पावले उचलत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. केंद्र सरकार, राज्य सरकारांना विमान इंधनाशी संबंधित कर कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे आणि विमान भाडेतत्वावर देणे सुलभ करण्यासाठीही काम करत आहे असे त्यांनी सांगितले. विमान भाडेतत्वावर देणे  आणि वित्तपुरवठ्याबाबतचे भारताचे परदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी गिफ्ट सिटी येथे स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचा उल्लेखही त्यांनी केला. संपूर्ण देशातील विमान वाहतूक क्षेत्रालाही याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. लाल किल्ल्यावरून त्यांनी केलेल्या ‘यही समय है, सही समय है’ या घोषणेची आठवण करुन देत पंतप्रधान म्हणाले की, बोईंग आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या विकासाला भारताच्या वेगवान वाढीशी जोडण्याची ही योग्य वेळ आहे. पुढील 25 वर्षांत विकसित भारताची उभारणी करणे हा आता 140 कोटी भारतीयांचा संकल्प झाला आहे, यावर त्यांनी भर दिला. गेल्या 9 वर्षांत आम्ही अंदाजे 25 कोटी भारतीयांना दारिद्र्यातून बाहेर काढले आहे आणि हे कोट्यवधी भारतीय आता नव-मध्यमवर्ग निर्माण करत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. भारतातील प्रत्येक उत्पन्न गटामधील चढत्या गतीशीलतेकडे कल म्हणून पाहिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या विस्ताराबद्दल बोलताना, सर्व भागधारकांनी  निर्माण होत असलेल्या सर्व नवीन संधि शक्यतांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारतात विमान निर्मिती परिसंस्था तयार करण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. भारताच्या एमएसएमईचे मजबूत जाळे, प्रतिभावंतांची प्रचंड संख्या आणि भारतातील स्थिर सरकारची क्षमता पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

‘मेक इन इंडिया’ ला प्रोत्साहन देण्यासाठीचा भारताचा धोरणात्मक दृष्टीकोन हा प्रत्येक गुंतवणूकदारासाठी फायद्याचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतात बोईंगच्या पहिल्या पूर्णपणे स्वदेशी संरचना केलेल्या आणि उत्पादित विमानासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. मला विश्वास आहे की भारताच्या आकांक्षा आणि बोईंगचा विस्तार ही एक मजबूत भागीदारी म्हणून उदयास येईल, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बोईंग कंपनीचे सीओओ स्टेफनी पोप आणि बोईंग इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष सलिल गुप्ते आदी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी बेंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे (बी. आय. ई. टी. सी.) उद्घाटन केले. 43 एकर परिसरात 1,600 कोटींच्या गुंतवणुकीसह याचे बांधकाम केले असून ही अमेरिकेबाहेरील बोईंगची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

भारतातील बोईंगचा नवीन उपक्रम  भारतातील चैतन्यशील स्टार्टअप, खाजगी आणि सरकारी परिसंस्थेशी भागीदारीसाठी एक आधारस्तंभ बनेल आणि जागतिक अंतराळ आणि संरक्षण उद्योगासाठी पुढील पिढीची उत्पादने आणि सेवा विकसित करण्यास मदत करेल.

पंतप्रधानांनी बोईंग सुकन्या कार्यक्रमाचाही शुभारंभ केल, ज्याचा उद्देश देशाच्या वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात देशभरातील अधिकाधिक मुलींच्या प्रवेशाला पाठबळ देणे हा आहे. हा कार्यक्रम भारतभरातील मुली आणि महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कौशल्ये शिकण्याची आणि विमान वाहतूक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्याची संधी प्रदान करेल. तरुण मुलींसाठी, हा कार्यक्रम एसटीईएम कारकिर्दीत रुची निर्माण करण्यासाठी 150 नियोजित ठिकाणी एसटीईएम प्रयोगशाळा तयार करेल. वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना हा कार्यक्रम शिष्यवृत्तीदेखील प्रदान करेल.

Continue reading

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे शहर म्हणजे मुंबई

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक...

देशातल्या 8 लोकसभा मतदारसंघांच्या काही मतांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे 8 आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे: लोकसभा आम चुनाव 2024ईवीएम जांच...

कायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी...
error: Content is protected !!