सुजन फाऊंडेशन, सातारा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने ज्येष्ठ कवी, लेखक व पत्रकार गजानन तुपे यांना पारगाव, खंडाळा, जि. सातारा येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.

विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांना “सुजन” फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी गौरविण्यात येते. जिजाऊ – सावित्री जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. सुजन फाऊंडेशन, ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था आणि जनसेवा मंच, खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्त्ववान महिलांना जिजाऊ आणि सावित्री पुरस्कारांनी याठिकाणी सन्मानित करण्यात आले. तर स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार-२०२१ हा पुरस्कार कवी, लेखक आणि पत्रकार गजानन तुपे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष संपतराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील, अभिनेत्री मेघना झुंजम, सामाजिक कार्यकर्त्या अमृता पठारे, सीमा लोकरे आणि दीपक शिर्के उपस्थित होते. या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन जनार्दन गाडे यांनी केले. सुजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजितकुमार जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात महिलांचा फार मोठा सहभाग होता.