किशोरवयीन मुले आणि तरुणांना तंबाखूपासून दूर राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची काल तंबाखू नियंत्रणासाठीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांची ही नियुक्ती केली. त्यानंतर एका प्रभावी व्हिडिओ संदेशाद्वारे सिंधूने तंबाखूच्या वापराविरुद्धच्या मोहिमेत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत लोकांना तंबाखूमुक्त जीवन जगण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काल यंदाचा जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. “तंबाखू उद्योगापासून मुलांचे संरक्षण”, ही या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना होती. तरुणांना तंबाखूच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवण्याची तातडीची गरज यामुळे अधोरेखित होते.
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्र यांनी तंबाखूच्या वापराच्या घातक परिणामांवर लक्ष केंद्रित करून एका व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केले. तंबाखूचा प्रसार आणि तंबाखूच्या धुराचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर विविध उपाययोजना राबवून, त्याद्वारे निरोगी समाज निर्माणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या सक्रिय भूमिकेवर चंद्रा यांनी आपल्या संदेशात भर दिला.
यावेळी बोलताना चंद्रा यांनी तंबाखूच्या वापराशी संबंधित प्रमुख आरोग्य, सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक हानींपासून वर्तमान आणि भावी पिढ्यांचे रक्षण करण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तंबाखू नियंत्रणावरील जागतिक आरोग्य संघटना कराराच्या भारत करत असलेल्या कडक अंमलबजावणीमुळे, तंबाखूच्या वापरावर नजर आणि देखरेख करण्याच्या यंत्रणेद्वारे सिद्ध झालेल्या मूर्त परिणामांचा दाखला देऊन, मिळालेल्या लक्षणीय परिणामांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
केंद्र सरकारने 2023मध्ये अधिकृत राजपत्रावर ओटीटी व्यासपीठासाठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट नियम लागू केले आणि स्ट्रीमिंग किंवा ओटीटी व्यासपीठावर तंबाखूविरोधी इशारा नियमन करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव व्ही. हेकाली झिमोमी यांनी या कार्यक्रमात दिली.
जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रॉडेरिको ऑफ्रिन यांनी ओटीटी व्यासपीठावर तंबाखूच्या चित्रणाचे नियमन करण्यात आणि ई-सिगारेट्सच्या प्रतिबंधावरील धोरणावर प्रकाश टाकून तंबाखू नियंत्रणातील भारताच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली. वैद्यकीय संस्थांमध्ये तंबाखू मुक्ती केंद्रे स्थापन करण्यासाठी कार्यान्वयीन मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना तंबाखू व्यसन मुक्तीबाबत शिक्षित आणि संवेदनशील बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक तंबाखूविरोधी दिन 2024 पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले.