विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्याच्या द अकॅडमी स्कूलने (TAS) आणखी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनाची कवाडं उघडली. द अकॅडमी स्कूलचे विद्यार्थी संगमनेरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत गेले आणि त्यांनी तेथील विद्यार्थ्यांशी अनुभवाची, माहितीची देवाणघेवाण केली. संस्कारक्षम वयात हा असा अनुभव मिळाल्याने या मुलांमध्ये इतरांना समजून घेण्याची भावना वाढीला लागली आणि अनेक विद्यार्थ्यांनी आपण भारावून गेल्याची भावनाही बोलून दाखवली. या विद्यार्थ्यांनी संगमनेरच्या साखर कारखाना आणि स्थानिक डेअरी उद्योगालाही भेट दिली.
द अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल संगमनेर येथे आयोजित करण्यात आली होती. या सहलीदरम्यान त्यांनी संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयाला भेट दिली. हा अनुभव हेलावून टाकणारा होता. शारीरिकदृष्ट्या आपल्यापेक्षा विकल असलेली मुलं आपल्याएवढीच मेहनत करतात आणि चांगले गुण मिळवतात, हे TASच्या विद्यार्थ्यांनी अनुभवलं. तसंच या दिव्यांग शाळेतील मुलांनी आपले कलागुणही यावेळी दाखवले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून TASच्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. TASच्या विद्यार्थ्यांनीही या विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती, सर्वसमावेशकता आणि सामाजिक जागरूकता वाढवणे हा या भेटीमागचा उद्देश होता.
या सहलीदरम्यान या विद्यार्थ्यांनी अमृत उद्योग समूहाच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यालाही भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऊस गाळप, रस काढणे, रस गाळणे, साखर तयार करणे यापासून पॅकेजिंगपर्यंत संपूर्ण साखर उत्पादन प्रक्रिया पाहिली. या कारखान्यात विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचे ज्ञानही मिळाले. विद्यार्थ्यांनी डेअरी उद्योगाविषयीदेखील जाणून घेतले, ज्यामध्ये त्यांनी पाश्चरायझेशनपासून पॅकेजिंगपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची साखळी पाहिली. त्यांना विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधीदेखील मिळाली.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींसमोरील आव्हाने अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येतात आणि त्यांच्या सामर्थ्य आणि क्षमतांची प्रशंसा होते. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना सर्वसमावेशकता, विविधता आणि आदर या महत्त्वाच्या गोष्टींची, भावनांची जाणीव होईल. अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, विद्यार्थ्यांना पुस्तकातील शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होते, अशी भावना द अकॅडमी स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांनी व्यक्त केली.