Friday, March 28, 2025
Homeटॉप स्टोरीराज्यात ‘लेक लाडकी’...

राज्यात ‘लेक लाडकी’ होणार ‘लखपती’!

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना ‘लखपती’ करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. माझी कन्या भाग्यश्री, ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. १ एप्रिल २०२३नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. मात्र, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

जलविद्युत क्षेत्रात लवकरच मोठी खासगी गुंतवणूक

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी (Pumped Storage Projects) स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणुकीला जलविद्युत क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५पर्यंत ही ऊर्जाक्षमता  २५ हजार मेगावॅटपर्यंत गाठण्याचे उद्दीष्ट आहे. सौर तसेच वाऱ्याच्या वेगाद्धारे निर्माण होणारी ऊर्जा पुरेशी नाही. त्यामुळे अशाश्वत नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये तफावत येऊन एकूणच ग्रीडला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एनर्जी स्टोरेज सिस्टिमला महत्त्व आहे. यामध्ये अन्य पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना एनर्जी स्टोरेज सिस्टिममधून ऊर्जा देऊन ग्रीडचे संतुलन ठेवता येऊ शकते. वीज निर्मितीत खंड पडल्यास अथवा तुडवडा पडल्यास या सिस्टिममधून ऊर्जा उपलब्ध होऊ शकते. केंद्रीय विद्युत मंत्रालयानेदेखील देशात उदचंन जलविद्युत प्रकल्पांना उत्तेजन देण्याचे ठरविले आहे.

या धोरणाद्धारे उदचंन जलविद्युत प्रकल्पातून (पीएसपी) मेगावॅट लेव्हल एनर्जी स्टोरेज क्षमता विकसित करणे सद्य:स्थितीतील पंप हायड्रो सोलर हायब्रील पॉवर प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, आंतरखोरे हस्तांतरणासाठी प्रोत्साहन देणे तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यात येईल. या संदर्भातील विकासकाची निवड सामजंस्य कराराद्धारे सरळ वाटप किंवा स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून करण्यात येईल. उदचंन प्रकल्पाच्या माध्यमातून एनर्जी स्टोरेज सिस्टिमद्वारे क्षमता वाढविता येऊ शकते. शिवाय ते पर्यावरणस्नेही आणि स्वस्त आहे. सध्या घाटघर येथे उदचंन प्रकल्प २००८पासून कार्यान्वित आहे.

सांगली, अहमदनगर जिल्ह्यांत जिल्हा व अति. सत्र न्यायालये

सांगली, अहमदनगर जिल्ह्यात  जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सांगली जिल्ह्यातील विटा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करून १९ नियमित पदे व ५ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण १ कोटी ५० लाख ६८ हजार २५६ इतका खर्च येईल. या नव्या न्यायालयात पलूस, विटा, कडेगाव, आटपाडी या तालुक्यातील १ हजार ९१३ प्रकरणे वर्ग होतील. सध्या विटा येथे २ दिवाणी न्यायालये (वरिष्ठ स्तर) व ३ दिवाणी न्यायालये (कनिष्ठ स्तर) कार्यरत आहेत.

लेक लाडकी

अहमदनगर जिल्ह्यात राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्यात येईल. १९ नियमित पदे व ६ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण २ कोटी १३ लाख ७६ हजार ४२४ इतका खर्च येईल. कोपरगाव न्यायालयाकडून या न्यायालयात एकूण १३३६ प्रकरणे वर्ग होणार आहेत.  राहाता न्यायालयाच्या क्षेत्रात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग करणार रेल्वे

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १८४२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. यामध्ये राज्य शासनाचा सहभाग ९२१ कोटी इतका असून हा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्रकल्प महारेलऐवजी रेल्वे विभागातर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोसला मिलिटरी स्कूलला नागपूरमध्ये जमीन

नाशिक येथेील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नागपूर येथे मौजा चक्कीखापा येथील स.क्र. ६४/१, आराजी २१.१९ हे.आर. ही जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्टयाने देण्यात येईल. भोसला मिलिटरी स्कूल हे नाशिक येथील सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीमार्फत चालविण्यात येत असून अतिविशिष्ट गुणवत्ताधारक आणि ख्यातनाम संस्था म्हणून या संस्थेस जागा देण्याचा निर्णय झाला आहे. या ठिकाणी भारतीय प्रशासनीक पूर्व सेवा तयारी प्रशिक्षण वर्ग निवासी सुविधा व वरिष्ठ महाविद्यालयासह सुरू करण्यात येईल.

आता औरंगाबाद विद्यापीठही होणार छ. संभाजीनगर विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे या विद्यापीठाचे नाव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर असे होईल. या विद्यापीठासमोर नमूद जिल्ह्यांच्या सूचित देखिल औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादऐवजी धाराशिव असा बदल करण्यात येईल. नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय, नवीन महाविद्यालये, अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यासाठी आता पूर्वीच्या तारखेत बदल करण्यात येऊन १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे विहित नमुन्यात अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली.

Continue reading

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या...
Skip to content