बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्यांना बुधवार, दि. १ नोव्हेंबरपासून नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक (iNCOVACC) कोविड प्रतिबंधक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन / बूस्टर डोस) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई महानगरातील प्रत्येक प्रशासकीय विभागात एक यानुसार २४ लसीकरण केंद्रांवर २८ एप्रिल २०२३पासून ६० वर्षांवरील नागरिकांना तसेच २३ जून २०२३पासून आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक (iNCOVACC) कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात प्रिकॉशन / बूस्टर डोस देण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, पालिकेतर्फे १ नोव्हेंबर २०२३पासून इन्कोव्हॅक (iNCOVACC) ही लस १८ ते ५९ वर्षं वयोगटातील लाभार्थ्यांना प्रिकॉशन / बूस्टर डोस म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक (iNCOVACC) लसीचा हा प्रिकॉशन / बूस्टर डोस घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रिकॉशन डोस म्हणून इन्कोव्हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्याचेदेखील पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पात्र मुंबईकरांनी इन्कोव्हॅक लसीचा बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.