शैक्षणिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता बी.एड/एम.एड अभ्यासक्रम फक्त एक वर्षाचाच असणार आहे. मात्र, काही निवडक पात्र विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळू शकेल. तब्बल एका दशकानंतर B.Ed/M.Ed अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. शैक्षणिक सत्र 2025-26पासून बी.एड/एम.एड अभ्यासक्रम एक वर्षाचा करण्यात आल्याची माहिती, एनसीटीईचे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी दिली आहे. अर्थात, दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रमही आधीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
अरोरा यांनी सांगितले की, एक वर्षाचा बी.एड/एम.एड अभ्यासक्रम पुन्हा सुरू केल्यामुळे दोन वर्षाचा अभ्यासक्रम रद्द केला जात आहे, असा अर्थ कुणी काढू नये. मात्र, एक वर्षाच्या बी.एड. कार्यक्रमासाठी ज्यांनी चार वर्षांचा पदवी किंवा पदव्युत्तर कोर्स पूर्ण केला आहे, तेच विद्यार्थी पात्र असतील. तीन वर्षांचा पदवीधर कोर्स पूर्ण केलेल्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध राहणार नाही. याशिवाय, एक वर्षाचा पूर्णवेळ एम.एड. अभ्यासक्रमही असेल. मात्र, शिक्षक आणि शिक्षण प्रशासकांसारख्या काम करणाऱ्यांना दोन वर्षांचा अर्धवेळ अभ्यासक्रमाचा पर्याय दिला जाईल.
अनेक दशकांपासून एक वर्ष चालणाऱ्या बी.एड. आणि एम.एड कार्यक्रमांना 2014मध्ये एनसीटीईने दोन वर्षांपर्यंत वाढवले होते. 2014च्या नियमावली अंतर्गत बी.एड अभ्यासक्रमात 20 आठवड्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात आली होती. त्याची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने, बी.एड कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आला होता. मात्र, आता एनसीटीईच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नियमावली 2025चा मसुदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार बी.एड/एम.एड अभ्यासक्रम एक वर्षाचा करण्यात आला आहे. 2023-24 शैक्षणिक सत्रापासून 57 संस्थांमध्ये पायलट पद्धतीने आयटीईपी हा चार वर्षांचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात बीए बी.एड, बी.एससी बी.एड, बी.कॉम बी.एड असे कोर्स आहेत.
हा कार्यक्रम 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. 2025-26 सत्रापासून, आयटीईपी आता पायलट पद्धतीने सुरू राहणार नाही आणि तो नियमित कार्यक्रम असेल. म्हणजेच या शैक्षणिक वर्षापासून संस्था हा अभ्यासक्रम देण्यासाठी मान्यता मिळवू शकतात. 2025-26 सत्रापासून आयटीईपी योग, शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण आणि कला शिक्षण हे चार विशेष अभ्यासक्रमदेखील सुरू केले जातील. नव्या अभ्यासक्रमांबाबत अरोरा यांनी सांगितले की, बारावीनंतर, जर कोणी शाळेत शिक्षक व्हायचे ठरवले तर आयटीईपी आहे. जर त्यांनी तीन वर्षांच्या पदवीनंतर निर्णय घेतला, तर दोन वर्षांचा बी. एड. करण्याचा पर्याय आहे. पदव्युत्तर पदवी किंवा चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर, एक वर्षाचा बी.एड. दिला जात आहे. हे तीनही कार्यक्रम वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.