ती तिच्या लहानग्या बाळाला घेऊन केबिनमध्ये आली. त्याच्या चेहऱ्याची विशिष्ट ठेवण, सपाट चेहरा, दोन डोळ्यांमध्ये अजून एक डोळा मावेल एवढे अंतर, नाकाचा सपाट पूल, वरच्या पापणीजवळ असेलेली त्वचेची घडी, छोटी मान आणि हातापायांच्या बोटांची विशिष्ट ठेवण, हे सर्व बघून काळजाचा ठोका चुकला. अरे बापरे डाउन सिंड्रोम! म्हणजेच रंग माझा वेगळा!!
तपासणी करताना माझ्या लक्षात आले की, बाळाचा बौद्धिक आणि शारीरिक विकास त्याच्या वयाच्या मानाने कमी आहे. जी गोष्ट मला एका क्षणात हलवून गेली ती गोष्ट त्या बाळाची आई गेली ३ वर्षांपासून सतत अनुभवत होती. लग्नानंतर बऱ्याच प्रयत्नांनी, नवससायासाने झालेलं आपलं बाळ इतर मुलांपेक्षा वेगळं आहे आणि त्याची बौद्धिक वाढही त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा कमी आहे ही चिंता तिचा चेहरा बोलून जात होता. आयुर्वेदिक उपायांनी त्यामध्ये काही फरक पडेल का हे जाणून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली होती.
डाऊन सिंड्रोम हा गुणसुत्रांमधील दोषांमुळे निर्माण होणारा जन्मजात आजार आहे. आपल्या शरीरामध्ये २३ गुणसुत्रांच्या जोड्या असतात. हा आजार २१व्या गुणसुत्रावर जोडीऐवजी ३ गुणसूत्रे आल्याने निर्माण होतो. यामुळे याला ‘ट्रायसोमी’ असेही म्हणतात. सामान्य मुलांपेक्षा या मुलांची वाढ सर्वच बाबतीत उशिरा होते.
गर्भारपणात आईचे वय ३५पेक्षा अधिक असणे, अनुवंशिक कारणं, नात्यातील लग्न, मागील गर्भपात, औषधे आणि रसायनांचा पालकांशी संपर्क, तंबाखू आणि वडिलांकडून अल्कोहोलचा वापर हे डाऊन सिंड्रोमसाठी धोकादायक घटक असल्याचे दिसून आले.
सामान्य मुलांपेक्षा या मुलांची वाढ सर्वच बाबतीत उशिरा होते. बाळाची वाढ खुंटणे, मतिमंदत्व हे या आजाराचे सर्वात जास्त प्रमुख लक्षण आहेत. अशा बहुतांशी मुलांमध्ये बौद्धिक विकासाबरोबरच स्नायुंचा विकासही कमी होतो. बोलणे उशिराने सुरू होते. स्मरणशक्ती कमी असते. जन्मजात हृदयविकार, दृष्टीदोष, आतड्यांचे विकार आणि डिफेक्टस्, स्थौल्य, ल्युकिमिया, रोगप्रतिकारक्षमता कमी असणे इत्यादि अनेक समस्यांशी या मुलांना झगडावे लागू शकते.
डाउन सिंड्रोम पूर्ण बरा होऊ शकत नाही. पण निरनिराळ्या उपचारपद्धतींनी अशा मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासामध्ये हातभार लावता येऊ शकतो. पहिल्या सहा वर्षात या मुलांच्या मोठ्या स्नायूंचा विकास, लहान स्नायूंचा विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, बोलण्याचा विकास, किंवा शब्दग्रहण या सहा पातळीवर योग्य ते खेळ व वातावरणाद्वारे (विशेष प्रशिक्षण केंद्र व शाळा) विकास करता येऊ शकतो.
मुलाचे पालक विशेषतः आई, निरनिराळे उपचारतज्ज्ञ, शिक्षक व समुपदेशक यांच्या एकत्रित सहयोगामुळे डाउन सिंड्रोम असलेली मुलं आपल्या कमतरतेवर मात करून निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेली दिसतात.
२१ मार्च हा वैद्यकीय क्षेत्रात ‘जागतिक डाऊन सिंड्रोम दिन’ म्हणून साजरा केला जातो. हेतू हाच की डाउन सिंड्रोमबद्दलचा अवेअरनेस वाढावा. नवीन तंत्रज्ञानाने निरनिराळ्या तपासण्यामुळे आता डाउन सिंड्रोमचे निदान गर्भावस्थेच्या पहिल्या बारा आठवड्यातच करता येणे शक्य आहे. तसेच आनुवंशिकीय समुपदेशनाद्वारे योग्य ती काळजी घेउन डाउन सिंड्रोम टाळताही येऊ शकतो.
डाउन सिंड्रोमसारखे जेनेटिक सिंड्रोम ज्यामध्ये क्युअर नाहीच अशा अवस्था प्रिव्हेंट करणं फार गरजेचे आहे. आयुर्वेदाने गर्भधारणा व गर्भावस्था या दोन्हीसाठी काही मार्गदर्शक तत्त्व सांगितली आहेत. ज्यांचे उद्दिष्ट सुप्रजा निर्माण आहे. आधुनिक जेनेटिक काउन्सिलिंग व चाचण्यांसोबतच या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले तर डाउन सिंड्रोम व इतर अनेक जेनेटिक डिसॉर्डरस्ना आपण प्रतिबंध करू शकतो.
सुप्रजा म्हणजे उत्तम संतती जी उत्तम शरीर, उत्तम मन, उत्तम सत्व आणि उत्तम ओज यांनी युक्त असते! हे सर्व गुण अपत्यामध्ये आईवडिलांकडून गुणसुत्रांद्वारे आणि संस्काराद्वारे येतात. माता-पिता जर आरोग्यसंपन्न व स्वस्थ असतील तर संततीही उत्तम गुणांनीयुक्त अशी होते.
अयोग्य आहारविहार, अपथ्य, व्यसनाधिनता, षडरिपूंच्या आहारी जाणे, गर्भधारणेचे अयोग्य वय यासारख्या कारणांमुळे जनुकांमध्ये गुणसुत्रीय दोष निर्माण होतात व नंतर अपत्यामध्ये संक्रमित होतात उदा. डाउन सिंड्रोमसारखे जन्मजात व्यंग, काही विशिष्ट आजार जसे thalassaemia, Huntington’s disease इत्यादी, विशिष्ट प्रकारचे कर्करोग, मनोविकार इत्यादी. आणि म्हणूनच सुप्रजननासाठी आणि संततीमध्ये उत्तम गुण यावे यासाठी आयुर्वेदाने काही नियमांचे पालन करायला सांगितले आहे.
भारतीय संस्कृतीत षोडष संस्कारांचे वर्णन आहेत, ज्यांचा प्रमुख उद्देश सुप्रजनन हाच आहे. संस्कार म्हणजे, ज्यामुळे गुणपरिवर्तन घडवून आणले जाते ते संस्कार. संस्कारांमुळे विषवल्लीही अमृतासमान काम करणारी होते. संस्कारांमुळे उत्तम गुणांनी युक्त संतती निर्माण होते व हे उत्तम गुण पुढील पिढीत संक्रमित केले जातात. हे संस्कार गर्भधारणेपूर्वी गर्भावस्थेत आणि गर्भाच्या जन्मानंतर करायला सांगितले आहेत.
योग्य वयात आल्यानंतर विवाह व विवाहानंतर गर्भधारणेची इच्छा होते तेव्हा गर्भाधान संस्कार केला जातो. पण त्यापुर्वी स्त्री व पुरुष दोघांनीही शरीर शुद्ध करणे आवश्यक असते. पंचकर्माने शरीर शुद्ध होते व शरीरातून दोष निघून जातात आणि स्त्री व पुरुष बीजाची कार्मुकता वाढते.
शोधनानंतर शरिरातील सप्तधातूंच्या पोषणासाठी वरसापासून शुक्रापर्यंत उत्तम सारवान धातू निर्माण व्हावे यासाठी रसायन औषधांचा वापर केला जातो. प्रमुख रसायनद्रव्यांमध्ये आवळा, हरितकी, शतावरी, यष्टिमधु यासारख्या द्रव्यांचा समावेश होतो. गर्भधारणा झाल्यानंतर सुरवातीच्या काही दिवसात गर्भ अतिशय नाजूक असतो, म्हणून गर्भस्थापनेसाठी शतावरी, ब्राह्मी, पुत्रजीवक यासारख्या गर्भसंस्थापक औषधांचा युक्तीपूर्वक उपयोग केला जातो.
गर्भाचे चांगले पोषण व्हावे यासाठी गर्भावस्थेमध्ये वैद्यांच्या सल्ल्यानुसार मासानुमासिक गर्भिणी परिचर्येचे पालन करावे. मासानुमासिक गर्भिणी परिचर्येमध्ये मातेने घ्यायचा आहार-विहार याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. गर्भावस्थेचे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी व इच्छित संततीप्राप्तीसाठी पुंसवन संस्कार करण्यास सांगितला आहे. संवन म्हणजे स्पंदन. गर्भाचे पहिले स्पंदन उत्पन्न होण्यापूर्वी जो संस्कार केला जातो तो पुंसंवन.
आधुनिक विज्ञानाप्रमाणे गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात ऑडिटरी व पेरिफेरल सेंसरी रिफ्लेक्सेस विकसित होतात तर पाचव्या महिन्यात मेंदूचा व न्यूरॉन्सचा विकास होतो. या काळात गर्भबाहेरील आवाज गर्भाशयात ऐकू शकतो. आयुर्वेदानुसार गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात मन तर सहाव्या महिन्यात बुद्धीची संपूर्ण अभिव्यक्ती होते. याचदरम्यान सीमंतोन्नयन संस्कार केला जातो. यावेळी मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक अंकुरित धान्य, हिरव्या वनस्पती, फळांचा व फुलांचा वापर गर्भिणिने करावा यासाठीचा हा संस्कार.
गर्भिणीचे मनोबल वाढवले जाते. गर्भिणिला प्रसन्न व मनोनुकुल वातावरणात ठेवले जाते. याच काळात गर्भावर मंत्रोच्चार व संगीत याद्वारे संस्कार करणे शक्य आहे. कारण पाचव्या महिन्यात गर्भ बाहेरचे आवाज गर्भाशयात ऐकू शकतो. सीमंतोन्नयनच्या वेळेसच अभिमन्यूने सुभद्रेच्या पोटात असतानाच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान श्रीकृष्णाकडून मिळवले होते.
या सर्व संस्काराबरोबरच गर्भिणीने आपली परिचर्या योग्य ठेवली पाहिजे. लघु, पथ्यकर व सुपाच्य आहार घेतला पाहिजे. गर्भावस्थेत दूध-तूप आणि विशिष्ट औषधांनी सिद्ध यवागू आणि युषांचे सेवन करणं अत्यावश्यक आहे. इतर खनिजांच्या पूर्तीसाठी कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ऍसिड इत्यादी सप्लीमेंट्स व या घटकांनी परिपूर्ण आहार घेणे आवश्यक असते. याचबरोबर योग्य मार्गदर्शनाखाली नियमित योगाभ्यास व व्यायाम करणे, प्रसन्न राहणे, चांगले संगीत ऐकणे, चांगले साहित्य वाचन यांचाही सकारात्मक परिणाम गर्भाच्या वाढीवर होत असतो व गर्भिणीचे आरोग्यही चांगले राहते.
Very informative article.
Very informative & useful article.. Thank you so much Sandya Mam..