“हे मुंबई
तूं हरवून बसलीयेस स्वतःची सिम्फनी
किती लपवून ठेवशील अंतर्वाद्य
कंच्या ठिकाणी आणून ठेवलंस मला तूं
सर्वत्र भूक आणि तृषणेचा डोह
हा विभ्रम चौकटीच्या साखळीतला” (नामदेव ढसाळ)
स्वतःची लय विसरून गेलेल्या या महानगरीविषयी हल्ली कुणीही उठते आणि लांब लांब पल्ल्याची वाक्ये फेकून आपणच जणू या मुंबापुरीचे तारणहार आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई महापालिकेची यंत्रणा आपल्या परीने समस्यांचा गुंता सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. नाही असे नाही, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध घोषणा आणि निवेदनांनी यंत्रणेच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले जात आहे. याचा अर्थ असा नव्हे की अधिकाऱ्यांनी आपली मते मांडूच नयेत. त्यांना त्यांची मते मांडून त्यावर चर्चा करण्यासाठी तर अधिकाऱ्यांच्या बैठका असतात ना!!
काही दिवसांपूर्वी येथेच आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या विविध विधानांवर चर्चा केली होती. आता त्यांचे सहाय्यक असलेले अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात शहर स्वच्छतेविषयी बोलले. शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न येतो तेव्हा पालिका यंत्रणा आणि नागरिक यांच्यासंबंधात चर्चा होणे स्वाभाविकच आहे. मात्र यंत्रणेचे कामकाज दाखवताना आकडेवारी फेकली की आपले काम संपले अशी काहीशी समजूत वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते, असे म्हटले तर गैर काहीही नाही. पण आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकत असताना जमिनी हकीकत काय असते वा आहे याचा ही विचार अधिकाऱ्यांनी करायला नको का?
घाण करू नका याविषयी समाजाचे आणखी प्रबोधन होणे गरजेचेच आहे. परंतु शिंदेसाहेब ज्या पश्चिम उपनगराकडे पाहतात त्या वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या विभागातील सफाई कामगार, विभाग अधिकारी आदी सर्व लहान-थोर मंडळी आपली कामे चोख करतात, असा दावा शपथेवर शिंदेसाहेब करू शकतील का? दहिसरच्या चेक नाक्यापासूनच घाण आणि धूळ सुरू होते दहिसरचे दोन्ही भाग, बोरिवलीचे दोन्ही असे करत करत आपण वांद्र्यापर्यंत अनेक मोठे रस्ते, लहान रस्ते आतील बाजूस असलेल्या छोट्या गल्ल्या याची दुपारी आणि संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाहणी केल्यास सर्वत्र कचरा/घाण दिसून येईल. वांद्र्याच्या दोन्ही भागातील काही विशिष्ट भाग वगळता इतर भागात घाण पाचवीला पूजलेलीच असते. ते दोन विशिष्ट भाग म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार ज्या परिसरात राहतात तो परिसर मात्र चकाचक असतो.
त्याबद्दल मुळीच दुःख नाही. पण त्याच्या तुलनेत पश्चिम उपनगरात अन्य भागातही स्वच्छता हवी असे जर नागरिक म्हणाले तर तो त्यांचा दोष आहे का? प्रचंड वाढलेल्या धूळ प्रदूषणामुळे शहरस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तोही केंद्राने कान टोचल्यावरच! खरेतर मुंबई आणि आसपासच्या कोणत्याच महापालिकेकडे धूळप्रदूषण यंत्रणाच नाही. (ठाणे महापालिकेकडे धूळप्रदूषण प्रतिबंधक यंत्रणा असल्याचे सांगतात. परंतु ती मृतावस्थेत असल्याचे समजते.) शहरात दररोज सुमारे आठ हजार टन कचरा गोळा केला जातो. गोळा केला जात नाही त्याचा हिशेबच नाही. गोळा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. इतकेच नव्हे तर डम्पिंग ग्राउंडवर ही रासायनिक फवारणी केली जात नाही. शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकदा रात्री पूर्व उपनगरातील मुलुंड येथे गाडीच्या काचा उघड्या ठेवून किमान दोन तास फेरफटका मारावा, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. अशीच मागणी देवनार – गोवंडी – मानखुर्दवासियांनीही केली आहे. इतकेच काय ज्या कचरा गाड्या / घंटा गाड्या कचरा घेऊन जातात त्या कचऱ्यावरही फवारणी वा पावडर टाकावी, असे नियमात आहे. परंतु हे कधीच कोणी करत नाही आणि वरिष्ठही पाहत नाहीत.
कोरा या सेवाभावी संस्थेबाबत मला काही बोलायचे नाही. कारण, स्वच्छतेतील सामान्यांच्या सहभागाबाबत त्या साशंक आहेत. त्यांचा रोख स्वछतागृहातील पाणीपुरवठ्यावर आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय आहे तसेच ज्या परिसरात स्वछतागृह आहे त्याच्या आसपास पाणीटंचाई असेल तर येथे पाण्यासाठी रांगा लागतात. विशेषतः झोपडपट्टी परिसरात असे होते. आता या संस्थेने स्वच्छतागृहाचा प्रश्न उपस्थित केला आहे म्हणून विचारतो की, अनेक स्वच्छतागृहे लोकप्रतिनिधी चालवतात. तेथेही अनेकवेळा पाणी नसते. घाण तर असतेच असते. दरवाजे अत्यंत कळकट आणि ‘दुबळे’, तकलादू झालेले असतात. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात प्रवेशच चिंचोळा असतो. रंग तर केव्हाच उडून विटका झालेला असतो. ही बाब स्वच्छतेत येते.. नाही का? याबाबत मात्र मौन पाळले गेल्याचे दिसते.
प्रबोधनाची निकड नेहमीच राहणार म्हणून काही दररोज प्रवचनेच ऐकायची का? कचरा करणाऱ्यांविरुद्ध जशी कारवाई केली जाते तशीच कारवाई कचरा उचलण्यात दिरंगाई करणाऱ्या कामगारांविरुद्धही होणे आवश्यक आहे. परिसराच्या स्वच्छतेबाबत स्थानिकांनी पुढाकार घेणे जसे गरजेचे आहे तसेच या प्रयत्नांना पालिका प्रशासनाने सहाय्य करणेही कर्तव्यच मानले पाहिजे. शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचे आहे. या चर्चेत पालिका किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी सहभागी होण्यात काही गैर नाही. पण आकडेवारीबरोबरच जमिनी हकीकत काय आहे तेही सांगणे आवश्यक आहे.
“Politicians and bureaucrats are new rich upper class in India. It is an upper class that is growing by an increasing numbers of top paid politicians in municipality and country. They let the people suffer, but let themselves go free” ही वृत्ती सर्वत्र वाढीस लागलेली आहे. तीच शहराच्या विनशास कारणीभूत आहे. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि नोकरशहांनी आपापल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही तर आपण सर्वचजण रसातळाला जाऊ इतके मात्र खरे…