‘मृत्युंजय भारत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला. हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य ‘भैयाजी’ जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे.
व्याख्यानांचे विषय–
१) राष्ट्रीय प्रबोधनातून नवनिर्माण, २) भारत वैश्विक चिंतनाचा आधार, ३) राष्ट्रीयता हीच भारताची ओळख (यामध्ये काही प्रश्नोत्तरेही दिली आहेत.), ४) राष्ट्रधर्म आणि राजधर्म, ५) सांस्कृतिक राष्ट्रवाद, ६) एकता हीच भारताची महानता, ७) सामाजिक जीवनाचे आधारस्तंभ- सहकार्य आणि सहजीवन, ८) वैभवशाली भारत, ९) संस्कार आणि समरसता- आजच्या काळाची गरज, १०) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा संदेश, ११) ग्रामविकासातून सर्वांचा विकास.
या पुस्तकाला स्वामी गोविंददेव गिरी यांचे आशीर्वचन लाभले आहे. त्यातील हा भाग-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्येष्ठ मार्गदर्शक भैयाजी जोशी यांच्या या ‘मृत्युंजय भारत’ नामक लेखसंग्रहातून या राष्ट्राचे उपरोक्त प्राणतत्त्व आणि त्यासोबत अन्य विचारप्रवाहांपेक्षा असलेले वेगळेपण, विज्ञान युगातही संस्कृतीची आवश्यकता, देशावरील वर्तमान संकटे, त्यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय आणि ग्रामविकासाच्या दिशेने मुद्देसूद विवेचन केलेले दिसते. संघाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या विचारसरणीला पं. दीनदयालजींच्या प्रगल्भ विचारांचाही सुगंध लाभलेला असल्याने संपूर्ण ग्रंथ अत्यंत वाचनीय, चिंतनीय व संग्राह्य झाला आहे. इतिहास घडविणाऱ्या संघकार्यातून लाभलेल्या उसंतीत पार पडलेले हे लेखन केवळ शब्दविलास नाही, तर अनुभवसिद्ध विचार-नवनीत आहे. देशातील युवकांसाठी ही पौष्टिक शिदोरी प्रदान केली आहे.
लेखक भैयाजी जोशी आपल्या ‘मनोगत’मध्ये लिहितात-
अनेकवेळा विविध प्रसंगी विषय प्रस्तुती करण्याची संधी व आवश्यकता पडली. माझ्या भाग्याने अनेक चिंतकांचे विचार ऐकायला मिळाले व त्यामुळे मला आवश्यकतेनुसार थोड्या तयारीने विषय मांडणे सुलभ होत गेले. अशा काही विषयांचे संकलन रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘मृत्युंजय भारत’ हे पुस्तक स्वरुपात उपलब्ध झाले आहे. ह्यात आलेले विचार माझे नाहीत तर पूर्वचिंतकांनी दिलेले विचारधन आहे. मूळ चिंतन आहे तसेच ठेवून वर्तमानकाळातील संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक जीवनात कार्य करताना येणारे अनुभव, होत असलेले प्रयोग, ज्येष्ठ मंडळींबरोबर घडलेल्या चर्चा, संवाद ह्याचा मला व्यक्तीशः खूप उपयोग झाला व अनेक गोष्टी समजण्याची शिकण्याची संधी मिळाली. माझ्या चिंतनक्षमतेच्या मर्यादेची मला जाणीव आहे. अन्यांचे समजलेले विचार माझ्या शब्दांत प्रस्तूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तो किती योग्य, परिपूर्ण झाला आहे, मला सांगता येणार नाही.

सर्व जगाला खऱ्या अर्थाने योग्य दिशा दाखवणारा, कधीही नष्ट होणार नाही, असा जर कोणता देश असेल, तर तो म्हणजे भारत. याचे कारण आहे भारताचे तत्त्वज्ञान. मनुष्य म्हणून जेव्हा आपण विकास, यश, प्रगती, सुख-समृद्धी, आनंद, समाधान यांचा विचार करतो, तेव्हा या विचाराच्या केंद्रस्थानी व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह असतो. आपल्या परंपरा आणि संस्कृतीला अनुसरून असणाऱ्या संकल्पनेप्रमाणे कोणतीही व्यक्ती किंवा समूह स्वयंविकास करण्याकरीता आणि स्वतःबरोबर इतरांचा उत्कर्ष साधण्याकरिता परिपूर्ण आहे. आत्मनिर्भर आहे. त्याकरिता आवश्यक असणारे ज्ञान आणि ऊर्जा त्याला या विश्वाकडूनच प्राप्त होते. हा विचार व्यक्तिसापेक्ष नसून चिरंतन असा वाहणारा प्रवाह आहे आणि म्हणूनच हे तत्त्वज्ञान आणि आपले राष्ट्र ‘भारत’ मृत्युंजय आहे.
या पुस्तकाची प्रस्तावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सह-सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी लिहिली आहे. ते म्हणतात-
भैयाजी जोशी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रसंगी आपले विचार मांडले असले, तरी या सर्व भाषणांमधून व्यक्त होणारा भाव हा एक आहे. हा भाव भारताच्या महान सांस्कृतिक संकल्पनेची पुष्टी करतो. त्यांच्या प्रत्येक बौद्धिकातून समोर येणाऱ्या चिंतनाचे तपशील व्यावहारिक दृष्टिकोनातून भारताच्या विशाल आणि प्रगल्भ संस्कृतीच्या विविध छटा स्पष्ट करून सांगतात. भैयाजी संघाचे स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. त्यांची भाषाशैली अतिशय साधी, सोपी आहे. शिवाय, अनेक सुयोग्य उदाहरणे देऊन त्यांनी हा विषय मांडला आहे. त्यामुळे वरवर अवघड वाटणारे विषयही वाचकाला सहज समजतील.
प्रस्तुत पुस्तकात भैयाजींनी आपल्या व्याख्यानांमधून भारतीय संस्कृतीच्या या वैविध्यपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला आहे. महान संस्कृतीचे वाहक असलेल्या हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, हे त्यांनी केलेले आवाहनही महत्त्वाचे आहे. आपण आपल्या जीवनात संघटित स्वरूपात या संस्कृतीची स्थापना केली पाहिजे आणि तसा संदेश जगाला दिला पाहिजे. आज संपूर्ण जगाला हिंदू समाजाच्या या उत्कृष्ट गुणांची जाणीव झाली आहे आणि त्याचे पालन करण्यासही सगळे तयार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही तेच ध्येय आहे. स्वयंसेवक आणि समाजबांधवांनी या पुस्तकाचा अभ्यास करून त्यातील मजकूर समाजासमोर मांडला, तर या पुस्तकाच्या प्रकाशनाचा हेतू साध्य होईल.
मृत्युंजय भारत
लेखक: सुरेश (भैय्याजी) जोशी
मराठी अनुवाद: आरती देवगांवकर
प्रकाशक: मोरया प्रकाशन
मूल्य- २५० ₹. / पृष्ठे- २१५
सवलतमूल्य- २२५ ₹.
टपालखर्च- ५० ₹.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)