Thursday, October 10, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजसागरी पर्यटन म्हणजे...

सागरी पर्यटन म्हणजे आपलं कोकणच!

‘नितांत सुंदर’ अशा भारत देशाला भला मोठा मनोहरी समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याचा विचार केला तर महाराष्ट्र आणि खास करून कोकणची किनारपट्टी चटकन डोळ्यासमोर येते. तसे पहिले तर आपल्या देशात जवळपास १३००च्यावर द्विप आहेत. सर्वाधिक द्विप अंदमान निकोबारमध्ये असून त्याखाली लक्षद्विपचा क्रमांक लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवसारख्या इतर देशांना जाण्याऐवजी पर्यटकांनी लक्षद्विपला भेट देऊन आपल्या येथील सागरी किनारी जरूर भेट द्यावी आणि अस्सल निसर्ग अनुभवावा, असे आवाहन केल्यावर लक्षद्विप बेटाला भेट देण्यासाठी एकच रांग लागली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर या शिखर संघटनेचा अध्यक्ष म्हणून जेव्हा मी ही बातमी वाचली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपला महाराष्ट्र आणि खासकरून कोकणामधील नितांत रम्य असे समुद्र किनारे तरळून गेले. मनात विचार आला, या कोकणच्या समुद्र किनाऱ्यांची गाज आपण सर्व ऐकतो का? दोन, तीन समुद्र किनारे सोडले तर पर्यटक कोकणातील किती अस्पर्श समुद्रकिनारी जातो? पर्यटनाच्या व्यवसायामध्ये काम करणारे आपले उद्योजक याकडे कसे पाहतात? काही नियोजनबद्ध, केवळ कोकण समुद्र किनारे दर्शन यावर भर देणाऱ्या खास सहलींचे नियोजन, आयोजन करतात का? तसे असेल तर त्याचे प्रमाण किती असते? कुठेतरी माझ्या मनाला ”घर की मुर्गी दाल बराबर” ही म्हण स्पर्श करुन गेली.

कोकण

आपल्या कोकणामध्ये शंभरच्या आसपास असे रमणीय सागर किनारे व गावे आहेत. त्याची संपूर्ण यादी देण्याची येथे आवश्यकता नाही. पण तारकर्ली, गणपतीपुळे, मुरुड, जंजिरा, दिवेआगार, अलिबाग असे काही मोजके सागरकिनारे प्रसिद्ध आहेत. या पलिकडेदेखील कोकणामध्ये अनेक विलक्षण मनोहारी असे समुद्रकिनारे आहेत. किती नावे घ्यावीत, असे होऊन जाते. भांडारपुळे असो की भोगवे, निवती! निळाईत हरवून जावे, मनाने निववावे असे होते! वेणनेश्वर, अंजर्ली, दाभोळी, देवगड, कोंडूरा, केळशी, जयगड, रेवदंडा, रेडी, मालगुंड अशी अनेक नावे पुढे येतात. कोकणातील निळा सागरही माणसाला खिळवून ठेवणारी अनुभूती आणि हुरहूर लावणारे सागरी सूर्यास्त हा अनुभव शब्दातून व्यक्त करण्यापलिकडचा आहे.

अलिकडच्या काळात आंजर्लेसारख्या समुद्रकिनारी होणारे कासवांचे संवर्धन आणि कासव महोत्सव, मालवणसारख्या किनारी होणारे नारळी पौर्णिमा महोत्सव, होळीच्या निमित्ताने होणारे उत्सव अशा उत्सव माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न स्तुत्य आहेत. परंतु हे प्रयत्न पुरेसे नाहीत. कोकणातील अनेक अस्पर्श आणि नितांत रमणीय असे असलेले बुधल, कुणबीवाडी, अंबुवाडी (जयगडजवळ) रीळ, गणेशगुळे, वेत्ये, वेळास (कासवांचे गाव), केळशी, गोडीवने, माडबन, मिठमुंबरी, मुणगे असे कितीतरी सागरकिनारे पर्यटकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र चेंबरच्यावतीने कोकणतील चेंबरचे सदस्य, पर्यटन क्षेत्रातील तज्ञ, स्थानिक मंडळी यांच्यासमवेत विचारविनिमय करून काही ठोस प्रयत्न करण्याचे योजिले आहे.

कोकण

पर्यटनव्यवसाय हा प्रचंड मोठा असा आवाका आहे. एका अंदाजानुसार जवळपास ७० अब्ज डॉलर्स आपण भारतीय प्रतिवर्षी परदेशी पर्यटनासाठी खर्च करत असतो. प्रवासी भारत या संकल्पनेनुसार काही प्रयत्न जरूर केले जातात. परंतु त्याहीपुढे जाऊन निदान आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणातील सागरी पर्यटनाला जर विशेष महत्त्व दिले, सर्व ताकदीने उचलून धरले तर एका पर्यटनाच्या जोरावर संपूर्ण कोकणाचा खूप मोठा विकास घडून येईल यात तिळमात्र शंका नाही. यादृष्टीने पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांनीही आपला अधिक भर दिला पाहिजे. मुख्य म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीय पर्यटकाने खास वेळ काढून कोकणातील अस्पर्श, दुर्लक्षित अशा सागरकिनाऱ्यांकडे धाव घेतली पाहिजे ,तरच हे शक्य होईल. यासंदर्भात आपण आपली मते व सूचना मोकळेपणाने महाराष्ट्र चेंबरला जरूर कळवाव्यात, असे यानिमित्ताने आवाहन करू इच्छितो. असे होऊ नये, ‘तुझे आहे तुझंपाशी – ते तू विसरलाशी’…

Continue reading

Skip to content