मराठी अभ्यास केंद्र ही विविध कृतीगटांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. ह्या संस्थेमार्फत मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना प्रोत्साहन म्हणून न्यायालयीन मराठीच्या चळवळीचे अध्वर्यू अधिवक्ता शांताराम दातार, अभ्यास केंद्राचे हितचिंतक व भाषाभ्यासक जयवंत चुनेकर यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी दोन पुरस्कार देण्यात येतात. भाषा पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून यंदापासून दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार ह्या आणखी एका पुरस्काराची घोषणा केंद्राने केली आहे.
अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ सुशान्त देवळेकर यांना जाहीर झाला असून जयवंत चुनेकर ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कारा’साठी ग्राममंगलच्या प्रयोगशील व विद्यार्थिप्रिय शिक्षिका सुषमा पाध्ये यांची निवड झाली आहे. मराठी भाषेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वार्तांकन व निवेदन सातत्याने करणाऱ्या दीपाली जगताप यांना दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध व्यवहारक्षेत्रांत मराठीचा जास्तीतजास्त वापर व्हावा यासाठी मराठी अभ्यास केंद्र विविध कृतीगटांमार्फत काम करते. गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र विविध व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने विशेष कार्यरत आहे. कारण मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृती टिकेल अशी केंद्राची धारणा आहे. मात्र हे कार्य एक संस्था एकाकीपणे तडीस नेऊ शकणार नाही. म्हणून मराठीच्या संवर्धनाचे कार्य जिथे कुठे चालू आहे त्याची नोंद घेऊन ते समाजापुढे आणावे असा केंद्राचा प्रयत्न आहे. मराठी भाषेच्या पडझडीच्या काळात मराठीसाठी अभ्यासाच्या व चळवळीच्या अंगाने आयुष्य झिजवणाऱ्या व्यक्तींबद्दल केंद्राला नेहमीच आदर आणि अभिमान वाटतो.
अधिवक्ता शांताराम दातार आणि जयवंत चुनेकर ही अशीच दोन नावे. न्यायालयांमध्ये लोकभाषा व राजभाषा असलेल्या मराठीचा प्रभावी वापर व्हावा म्हणून शांताराम दातार यांनी अथक परिश्रम घेतले. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेले कार्य सर्वपरिचित आहे. समाज व शासन स्तरावर मराठी भाषेच्या वापराबाबत ते नेहमीच आग्रही राहिले. मराठी अभ्यास केंद्राचे दुसरे एक सुहृद जयवंत चुनेकर हेही मराठीच्या ध्यासाने शैक्षणिक क्षेत्रात आयुष्यभर काम करीत राहिले. कोशनिर्मिती, अमराठी भाषकांसाठी मराठीचे अध्यापन या क्षेत्रांतील चुनेकर यांचे योगदान मोलाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेऊन प्रदीर्घ काळ निस्पृह पत्रकारिता करणारे दिनू रणदिवे मराठी पत्रकारितेतील दीपस्तंभ होते. आज ह्या तिन्ही व्यक्ती हयात नसल्या तरी त्यांनी मराठी भाषेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांची स्मृती जपण्यासाठी तसेच मराठीसाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून मराठी अभ्यास केंद्राने ह्या पुरस्कारांचे गठन केले आहे. दरवर्षी मराठी भाषा दिनाला समारंभपूर्वक हे भाषा पुरस्कार प्रदान केले जातात. परंतु, यंदा कोविडमुळे त्यांचे वितरण पुढे ढकलावे लागत आहे. परिस्थिती सामान्य होताच ते संबंधितांना दिले जातील, अशी माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश परब यांनी दिली आहे.