मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी मेजर जनरल वाय पी खंडुरी यांच्याकडून महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. सैन्यातील साडेतीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीनंतर खंडुरी सेवानिवृत्त झाले.
मेजर जनरल योगेंद्र सिंग यांची 1988 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी निवड झाली आणि डेहराडून येथील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमी मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना ब्रिगेड ऑफ गार्ड्सच्या 5 व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. साडेतीन दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत त्यांनी महत्त्वाच्या कमांड आणि स्टाफच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांनी नियंत्रण रेषेवर, उंच भागात तसेच जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील घुसखोरी विरोधी कारवायांमध्येही काम केले आहे. पश्चिम आघाडीवरील ऑपरेशन विजय (कारगिल) आणि ऑपरेशन पराक्रम या दोन्ही मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला.
जनरल ऑफिसरच्या कमांड नियुक्तींमध्ये त्यांच्या युनिटचे कमांड, पंजाबमधील स्वतंत्र मेकॅनाइज्ड इन्फंट्री ब्रिगेड कमांड आणि पश्चिम क्षेत्रातील राजस्थानमधील प्रतिष्ठित RAPID डिव्हिजनचा समावेश होतो. जनरल ऑफिसरनी इथियोपिया आणि एरिट्रियामधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये आणि दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयातील ऑपरेशनल लॉजिस्टिक संचालनालयात संचालक म्हणूनही काम केले आहे, जिथे त्यांनी सप्टेंबर 2014 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये आलेल्या पुराच्या वेळी ऑपरेशन मेघ राहत अंतर्गत एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर ऑपरेशन मैत्री अंतर्गत नेपाळला मानवतावादी मदत गोळा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट, सिकंदराबादचे माजी विद्यार्थी असलेल्या योगेंद्र सिंग यांची व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची नोंद आहे. जनरल ऑफिसर हे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळलेले एक खेळाडू आहेत. त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या विशिष्ट सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड आणि यूएन फोर्स कमांडरचे कमेंडेशन कार्ड देऊन गौरवण्यात आले आहे.
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय हे देशातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या संचालनालयांपैकी एक आहे आणि राज्यातील तरुण नागरिकांमध्ये चारित्र्य, कॉम्रेडशिप आणि शिस्त विकसित करण्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था म्हणून एनसीसीची भूमिका कायम ठेवण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा जनरल ऑफिसरनी पुनरुच्चार केला. संस्था नागरिकांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम आणि मोहिमांमध्ये राज्य सरकारला नव्या जोमाने पाठिंबा देत राहील यावर त्यांनी भर दिला. राज्याच्या एनसीसी संचालनालयाला त्यांच्या समृद्ध अनुभव आणि ज्ञानाचा लाभ मिळेल आणि राज्यातील तरुणांच्या सहभागाच्या उपक्रमांना नवीन प्रेरणा आणि सकारात्मक विश्वास देईल.