भारताच्या हातमाग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, विविध राज्यांच्या महिलांना आमंत्रित करून त्यांची साडी परिधान करण्याची पद्धत प्रदर्शित करून त्या माध्यमातून भारताची “विविधतेमध्ये एकता” असलेला देश म्हणून ओळख अधोरेखित करण्यासाठी, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी काल नवी दिल्ली येथे ‘साडी वॉकथॉनच्या’ ई-नोंदणी पोर्टलचा शुभारंभ केला. मुंबईत 10 डिसेंबर 2023 रोजी एमएमआरडीए मैदानावर साडी वॉकथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.
साडी वॉकथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी या समर्पित वेबसाईटवर ओटीपी च्या मदतीने नोंदणी करता येईल. पोर्टलवर जरदोश यांनी सर्वप्रथम आपले नाव नोंदवले.
सूरत इथे पहिल्या साडी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपारिक वस्त्र वापराला चालना देण्यासाठी आणि व्होकल फॉर लोकल च्या संकल्पनेला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने विविध पद्धतीने साड्या नेसलेल्या 15,000 पेक्षा जास्त महिलांनी या आरोग्यदायक वॉकथॉन मध्ये सहभाग नोंदवला होता.
सूरत इथे साडी वॉकाथॉनला मिळालेल्या यशानंतर, भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर, देशातील सर्वात मोठी साडी वॉकथॉन आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला असून, महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट आहे. देशभरातली महिला आपल्या पारंपारिक पद्धतीने साडी परिधान करून या वॉकथॉन मध्ये सहभागी होणार आहेत.
सांस्कृतिक विविधता आणि सक्षमीकरणाचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात देशभरातल्या अंदाजे 10,000 महिला त्यांच्या विशिष्ट पारंपारिक साड्यांमध्ये सजून सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या दिमाखदार सोहळ्यात केवळ उत्साही महिलाच नव्हे, तर सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्ती, फॅशन डिझायनर आणि अंगणवाडी सेविका, यासारख्या विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय व्यक्ती देखील सहभागी होतील.
साडी वॉकथॉनच्या निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
- 29 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2023:
- प्रदर्शन आणि विक्री – “गांधी शिल्प बाजार – राष्ट्रीय” हस्तकला आणि हातमाग उत्पादनांच्या 250 स्टॉलसह विविध प्रकारच्या साड्यांचे 75 स्टॉल्स.
- देशभरातील सहभागी
- हातमाग आणि हस्तकला प्रात्यक्षिक कार्यक्रम
- साडी वॉकथॉन (10 डिसेंबर 2023):
- अंतर – अंदाजे. 2 कि.मी
- वेळ- सकाळी 8:00
- कार्यशाळा (10 आणि 11 डिसेंबर 2023):
- साडी नेसण्याची पद्धत, प्रसार आणि शाश्वतता, नैसर्गिक रंग ई.