इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक आर्ट पेपरवर छापलेले आहे.
लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. त्यातील काही भाग इथे देत आहोत.
‘चंद्रयान-३’चे यश अतिशय गौरवास्पद होते आहे. याची प्रचीतीच बघायची, तर यूट्यूबच्या लाइव्ह स्ट्रीमिंग माध्यमावर २३ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसारित झालेल्या ‘चंद्रयान-३ मिशन सॉफ्ट-लँडिंग लाइव्ह टेलिकास्ट’ने ८० लाखांहून अधिक सहकालिक (Concurrent) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, त्यामुळे तो जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिला जाणारा ‘लाइव्ह स्ट्रीम’ झाला. वैयक्तिक दृष्टिकोनातूनही जास्तीतजास्त वेळा आणि इंग्लिश, मराठी व हिंदी या तीनही भाषांमधून वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्यांतील चर्चामध्ये आतापर्यंत माझा सहभाग असलेला दिवस म्हणजे २३ ऑगस्टच होय.
माझ्या अवकाश विज्ञान व तंत्रज्ञानावरील प्रबोधनाच्या कार्यामुळे मला शालेय, तसेच अभियांत्रिकी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्याची मोठ्या प्रमाणात संधी मिळत असते. अशावेळी त्यांच्याकडून भरभरून मिळणारी दाद, त्यांचा न संपणारा प्रश्नांचा भडिमार यावरून त्यांच्यामध्ये असलेले या विषयाबद्दलचे प्रचंड कुतूहल, त्याची रोमांचित करणारी चित्तवेधकता याचा मला जवळून अनुभव येतोच; पण त्याचबरोबर त्यांना ‘इस्रो’च्या नेत्रदीपक कर्तृत्त्वाद्वारे मिळत असणारी जबरदस्त प्रेरणा, त्यांचा बळावणारा देशाभिमान व आत्मविश्वास हाही मला तेवढाच मोलाचा वाटतो.

अवकाश तंत्रज्ञान, चांद्रमोहिमा व आंतरग्रहीय मोहिमा (उदा. मंगलयान) याबद्दलचे लिखाण निश्चितच चित्तथरारक व मन थक्क करणारे असल्याने वाचकांना आकर्षक वाटते; परंतु ते जर त्यांना समजू शकेल अशा सोप्या भाषेत आणि त्यांचे स्वारस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवेल अशा शैलीत व्यक्त केलेले असेल तरच! (आणि तरच त्यामागचा शैक्षणिक उद्देशही सफळ होऊ शकतो.) नेमका हाच मुद्दा लेखकासाठी सर्वांत आव्हानात्मक आणि कसोटीचा असतो; कारण अवकाश तंत्रज्ञान हा विषय मुळातच अत्यंत गुंतागुंतीचा आणि जटिल आहे. (‘एखादा विषय समजायला अवघड नाही’ हे पटवून देताना, हे काही रॉकेट सायन्स नाही असे म्हटले जाते ते उगाच नाही!) मी माझ्या प्रबोधन-प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच जास्तीतजास्त प्रयत्न कशासाठी केले असतील, तर ते ‘हा अवघड विषय सोपा व रोचक कसा बनवायचा’ याकरिता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) जागतिक अंतराळ समुदायातील एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आली आहे, जिने अवकाश संशोधन, अवकाश तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनात उल्लेखनीय प्रगती केली आहे. १९६९मध्ये स्थापन झालेल्या ‘इस्रो’ने केवळ अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारताची क्षमता दाखवली नाही, तर अवकाश विज्ञानाच्या विविध पैलूंमध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हे पुस्तक ‘इस्रो’चे महत्त्वाचे कर्तृत्त्व, मोहिमा आणि त्यांचा प्रभाव याविषयी माहिती देते.
भारताची अंतराळ संस्था ISROने भारतीयांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शिवाय विश्वाबद्दलची आपली समज वाढविण्यात, तसेच दळणवळण आणि नॅव्हिगेशनसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्र आणि मंगळावर महत्त्वाकांक्षी मोहिमा हाती घेण्यापर्यंत, ‘इस्रो’ने सातत्याने शक्यतेची क्षितिजे विस्तारली आहेत.

या पुस्तकाच्या उत्तरार्धात भविष्यातील मोहिमांबद्दलही संक्षिप्त रूपात चर्चा केली आहे. त्यावरून वाचकांच्या लक्षात येईल की, ‘इस्रो’च्या एकामागोमाग एक, जगामध्ये भारताचा गौरव वाढवत जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी मोहिमा कशा प्रत्यक्षात येऊ घातलेल्या आहेत. अशा प्रसंगोचित समयी महाराष्ट्राची ‘विवेक’सारखी मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था माझे हे पुस्तक वाचकांच्या हाती सुपूर्द करीत आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. ‘इस्रो’च्या कर्तृत्त्वाला ही एकप्रकारे मानवंदनाही आहे.
आपण मोठी स्वप्ने पाहात राहूया, ताऱ्यांपर्यंत पोहोचूया, ही स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करूया आणि भविष्यातील पिढ्यांना ज्ञान आणि नावीन्यपूर्ण शोध घेण्यासाठी प्रेरित करूया.
पुस्तकाचे नाव- इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा
लेखक: सुरेश नाईक
प्रकाशक: विवेक प्रकाशन
मूल्य: १६० ₹. / पृष्ठे- १०३
पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथ संवाद वितरण (8383888148)