Homeब्लॅक अँड व्हाईटजाणून घ्या जगप्रसिद्ध...

जाणून घ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन टेनिस स्पर्धेविषयी…

जून महिना उजाडला की साऱ्या टेनिसविश्वाला वेध लागतात ते लंडनमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे. टेनिस जगतात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या चार ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा मानाच्या, प्रतिष्ठेच्या म्हणून समजल्या जातात. पण या चार स्पर्धांत विम्बल्डन स्पर्धेची मज्जा काही औरच. चार स्पर्धांत सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ती ओळखली जाते. तब्बल १४७ वर्षांंचा मोठा इतिहास या स्पर्धेला लाभला आहे. दोन महायुद्धांचा आणि कोविड साथीचा काळ वगळला तर गेली १३८ वर्षं या स्पर्धेचे सातत्याने दिमाखादार, शिस्तबध्द आयोजन केले जात आहे. दरवर्षी स्पर्धेला टेनिसप्रेमींचा, जाहिरातदारांचा आणि पुरस्कर्त्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे स्पर्धेतील बक्षीस रक्कमेतदेखील खुप मोठी वाढ होत असते. हिरवळीच्या कोर्टवर होणारी ही एकमेव ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा आहे. तीसपेक्षा जास्त हिरवळीचे कोर्ट स्पर्धेसाठी वापरली जातात. त्यावर पंधरा दिवसात साडेचारशेपेक्षा जास्त सामने रंगतात. ज्याप्रमाणे क्रिकेट खेळात लंडनमधील लॉर्डस मैदान, या खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाते तसाच काहीसा प्रकार विम्बल्डन स्पर्धेबाबत म्हणता येईल. जगातील प्रत्येक टेनिसपटूचे विम्बल्डन स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न असते. विशेष म्हणजे या स्पर्धेचे आयोजन ऑल इंग्लंड क्लब करतो. इतर तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धांचे आयोजन त्या-त्या देशाच्या राष्ट्रीय टेनिस संघटना करतात. पण विम्बल्डन स्पर्धा मात्र त्याला अपवाद आहे.

विम्बल्डन

१८६८ साली हा क्लब स्थापन झाला तेव्हा त्याचे अवघे सहा सदस्य होते. आज हीच सदस्यसंख्या एक हजारापेक्षा जास्त आहे. प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्याकडे क्लबची मालकी आहे. स्पर्धेतील स्टार खेळाडूंचे सामने सेंटर कोर्टवर होतात. तसेच सर्व गटाच्या अंतिम फेरीचे सामने याच कोर्टवर रंगतात. याच कोर्टसमोरचा राॅयल बॉक्स खूप प्रसिद्ध आहे. या बॉक्समध्ये ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्तिंनाच प्रवेश असतो. खेळाडू सेंटर कोर्टवर येण्यापूर्वी या राजघराण्यातील व्यक्तिंना अभिवादन करुन मग कोर्टचा ताबा घेतात. विजेत्या खेळाडूंना मुख्य चषक दिला जात नाही. त्याची प्रतिकृती भेट म्हणून दिली जाते. मुख्य चषक विम्बल्डनच्या संग्रहालयात आहेत. त्यावर दरवर्षी विजेता खेळाडू, साल याची नोंद केली जाते. पावसाचा व्यत्यय येऊ लागल्यामुळे २००९ साली सेंटर कोर्टवर अच्छादन टाकण्यात आले. पाऊस असला की ते उघडले जाते. एरवी ते बंदिस्त असते. या स्पर्धेत २०१०मध्ये जाॅन इस्नेर, निकोल माहुत यांच्यात सर्वात दीर्घकाळ सामना चालला जो तब्बल तीन दिवस. एकूण ११ तास ५ मिनिटे रंगला. पाच सेटच्या या सामन्यात शेवटचा सेट अखेर जाॅनने ७०-६८ गेममध्ये जिंकून एका जबरदस्त विजयाची नोंद केली. पहिल्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे सामना थांबवला. तेव्हा दोघांची दोन, दोन सेटची बरोबरी होती. दुसऱ्या दिवशी पाचव्या सेटमध्ये दोघांची ५९-५९ गेमची बरोबरी होती तेव्हा परत अंधूक प्रकाशामुळे सामना दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आला. अखेर तिसऱ्या दिवशी सामना पूर्ण झाला. ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील हा सर्वात दीर्घकाळ चालेला सामना आहे. त्यानंतर पाचव्या सेटमध्ये दोघांचीही सामन्यात बरोबरी झाल्यास गेमचा फरक न ठेवता निकाल टाय‌‌‌ब्रेकवर लावण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. त्यामुळे आता भविष्यात एवढा मोठा सामना होणे शक्य नाही.

१८७७ साली झालेल्या पहिल्या स्पर्धेत यजमान ब्रिटनच्या स्पेन्सर गोरने विजेतेपदाचा मान मिळवला होता. १८८४ साली महिलांना या स्पर्धेत प्रथमच प्रवेश देण्यात आला. माॅड वाटसन पहिली महिला विजेती ठरली. त्याचबरोबर स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या दुहेरी सामन्यांना सुरुवात झाली. १९१३मध्ये मिश्र दुहेरीचादेखील स्पर्धेत समावेश झाला. १९२२पर्यंत स्पर्धेतील विजेत्याला पुढील वर्षी‌ थेट अंतिम सामन्यात प्रवेश देण्यात येत असे. म्हणजे त्याला अवघा जेतेपदाचा एकच सामना खेळावा लागत असे. १९२३पासून मात्र ती पद्धत बंद करण्यात आली. १९६७पर्यंत केवळ हौशी खेळाडूंना स्पर्धेत प्रवेश दिला जात होता. मात्र १९६८पासून व्यवसायिक खेळाडूंसाठी स्पर्धेची दारं उघडण्यात आली. त्यावर्षी मग पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियाचा महान टेनिसपटू राॅड लेवर‌ आणि महिला एकेरीत अमेरिकेची नामवंत खेळाडू बिली जीन किंगने जेतेपदे मिळवली. स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू‌ राॅजर फेडडरने पुरुष एकेरीत सर्वाधिक आठ आणि अमेरिकेची‌ स्टार खेळाडू मार्टिना नवरातिलोवाने नऊ वेळा ही स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला आहे. पुरुष दुहेरीत वुडब्रिज बंधुंनी सर्वात जास्त नऊ जेतेपदे पटकावली आहेत. भविष्यात यांचे‌ विक्रम मोडणे कठिण आहे.

स्पर्धेतील‌ ६७५ सामन्यांसाठी ५५ हजारपेक्षा जास्त चेंडूचा वापर केला जातो. अडीशेपेक्षा जास्त बाॅलबाॅय स्पर्धेत कार्यरत असतात. त्यांना स्पर्धेअगोदर एक महिना खास प्रशिक्षण‌ दिले ‌जाते. हे काम करायला हजारोंच्या संख्येने युवा मुला-मुलींची तयारी असते. पण त्याचीदेखील रितसर प्रवेशअर्ज मागवून निवड केली जाते. १८७७ ते १९२१दरम्यान स्पर्धेतील सामने कारकेट क्लब, वोरपेल रोड येथे होत असत. त्यानंतर १९२२‌पासून हे सामने चर्च रोड‌‌ येथे घेण्यास सुरुवात झाली. या स्पर्धेने आपल्या स्वतःच्या जुन्या रुढी, परंपरा कायम राखल्या आहेत. इतर सर्व स्पर्धांत खेळाडू रंगीत कपडे घालून खेळतात. इथे मात्र पांढरे कपडे घालून खेळणे खेळाडूंसाठी बंधनकारक आहे. त्यात कुठल्याही खेळाडूला सवलत‌ दिली जात नाही. ब्रिटीश राजघराण्यातील‌‌ व्यक्तिंचा कायम आदर राखला जातो. या स्पर्धेसाठी ऑल इंग्लंड क्लब स्वतःची मानांकन खेळाडूंना देतो. आं. रा. टेनिस महासंघाची मानांकन क्लब विचारात घेत नाही. या स्पर्धेच्या काळात स्ट्रॉबेरी, आईस्क्रीम, वाईनला खुप मोठी मागणी असते. त्याचा विक्रमी खप होतो. स्पर्धेच्या तिकिटांनादेखील खूप मोठी मागणी असते. ती सहजासहजी मिळत नाहीत. सुरूवातीच्या काळात यजमान ब्रिटनच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. पण १९३५नंतर त्यांचे वर्चस्व कमी झाले. पुरुष एकेरीत त्यांच्या एण्डी मरेने २०१६ साली आणि महिला एकेरीत व्हर्जिनिया वेडने १९७७ साली शेवटची स्पर्धा जिंकली. त्यानंतर एकेरीत ब्रिटनला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. नामवंत रोलेक्स या घड्याळ कंपनीशी गेली अनेक वर्षं स्पर्धेचे टाय‌‌अप आहे. त्यामुळे कुठल्याही टेनिस कोर्टच्या बाजूला याच घड्याळ‌ कंपनीची जाहिरात आपल्याला दिसते. यंदा स्पर्धेतील दोन्ही विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी तीन मिलीयन पौंड बक्षीस रक्कम म्हणून मिळणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात अकरा टक्के वाढ ‌करण्यात आली आहे. यंदा स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराज आपली जेतेपदाची‌‌ हॅटट्रिक या स्पर्धेत पूर्ण करतो का, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. महिला गटात अमेरिकेची युवा खेळाडू कोको गोफ काय कामगिरी करते याकडे‌ टेनिसप्रेमींचे लक्ष्य असेल. या दोघांनी नुकतीच फ्रेंच स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या खेळाकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे.

2 COMMENTS

  1. लेखात अत्यंत सुंदर रितीने विंबल्डन स्पर्धेचा इतिहास सांगितला गेला आहे. कोको स्पर्धेच्या बाहेर गेली. धन्यवाद!

Comments are closed.

Continue reading

पुन्हा आपटला वेस्टइंडीज क्रिकेट संघ!

एका जमान्यात क्रिकेटविश्वावर एखाद्या‌ सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या, बलाढ्य वेस्टइंडीज क्रिकेट संघाची सध्या चांगलीच दाणादाण उडाली आहे. या संघाची कामगिरी दिवसेंदिवस‌ अधिकच खालावत चालली आहे. त्यामुळे‌ या संघाचे चाहते चिंताग्रस्त आहेत. एका जमान्यात वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा सुवर्णकाळ होता. याच संघाने...

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत यानिक व इगाने रचला इतिहास!

यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेवर आपल्या जेतेपदाच्या विजयाची मोहोर उमटवत इटलीच्या २३ वर्षीय यानिक सिनर‌ आणि पोलंडच्या २४ वर्षीय इगा स्वियातेकने इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारे हे दोघे त्या-त्या देशाचे पहिले टेनिसपटू ठरले आहेत. या दोघांच्या विजयामुळे यंदा या स्पर्धेत...

भारतीय हॉकी संघाचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’!

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय हॉकीसाठी पुन्हा अच्छे दिन आणले. त्यामुळे सहाजिकच भारतीय हाॅकीला एक नवी झळाळी मिळाली. भारतीय हाॅकीप्रेमींच्या भारतीय हाॅकी संघाकडून पुन्हा मोठ्या अपेक्षा बाळगल्या जाऊ लागल्या. पण नुकत्याच झालेल्या मानाच्या एफ.आय.ई.एच....
Skip to content