Wednesday, February 5, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटबिलियर्ड-स्नूकरमधला भारतीय जादूगार...

बिलियर्ड-स्नूकरमधला भारतीय जादूगार पंकज अडवाणी!

भारताच्या ३९ वर्षीय पंकज अडवाणीने नुकत्याच झालेल्या दोहा, कतार येथील जागतिक बिलियर्ड स्पर्धेत २०वे जेतेपद पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा ४-२ असा आरामात पराभव करुन आणखी एक जागतिक विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला. या लढतीत पंकजने आपल्या एकाग्रतेची आणि आक्रमकतेची सुरेख झलक पेश करताना रॉबर्टविरुद्ध गुणांचे मोठे ब्रेक नोंदविले. संपूर्ण स्पर्धेत पंकजने विजेत्याला साजेसा खेळ करून आपणच या स्पर्धेचे खरेखुरे विजेते आहोत हे दाखवून दिले. त्याने आपले सर्व सामने सहज जिंकले. मोठे आव्हान पंकजसमोर कोणीच उभे करू शकले नाही. हीच त्याच्यातील दिग्गज खेळाडूची पोचपावती होती असे म्हणावे लागेल.

स्नूकरमध्ये त्याने विश्वविजेतेपद याअगोदरच मिळवले आहे. भारतातर्फे या दोन्ही खेळात अशी कामगिरी करणारा पंकज हा एकमेव खेळाडू ठरला आहे. छोट्या बिलियर्ड-स्नूकर टेबलवरील या खेळातील त्याची थक्क करणारी कामगिरी पाहिल्यावर तो सद्याच्या घडीला ह्या खेळातील अनभिषिक्त सम्राट आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. जागतिक स्पर्धेप्रमाणेच त्याने आशियाई स्पर्धेतदेखील या खेळात नव्या नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे. एकूण आशियाई स्पर्धेत पंकजच्या नावावर १३ विजेतेपदांची नोंद आहे. गेल्याच वर्षी जागतिक बिलियर्ड स्पर्धेत विश्वविजेतेपदाला गवसणी घालून त्याने आपल्या कारकीर्दीतील २५वे बिलियर्ड-स्नूकरमधील जेतेपद पटकावून जगज्जेतेपदाचा रौप्य महोत्सव साजरा केला. त्याची या खेळातील ही कामगिरी थक्क करून सोडणारी आहे. त्यामुळे या खेळातील जादुगाराची उपमा पंकजला दिली तर वावगे ठरणार नाही. आपले २५वे अजिंक्यपद मिळवताना पंकजने आपलाच सहकारी सौरव कोठारीला आरामात पराभूत केले होते.

विश्व बिलियर्ड स्पर्धेत आतापर्यंत गुणांच्या प्रकारात त्याने ९ आणि वेळेच्या प्रकारात १० जेतेपद मिळवली आहेत. तसेच २०१४च्या सांघिक जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत तो विजेत्या भारतीय संघात होता. स्नूकर जागतिक स्पर्धेत त्याने १५ रेड आणि ६ रेड या दोन्ही प्रकारात प्रत्येकी ३-३ विजेतेपद मिळवली आहेत. तसेच २०१८च्या विश्व सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेत्या भारतीय संघात पंकज होता. सलग ५ वेळा त्याने एकाच वर्षात राष्ट्रीय, आशियाई, जागतिक बिलियर्ड स्पर्धा जिंकण्याचा आगळा पराक्रम केला आहे. १९९९मध्ये त्याने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केले. अवघ्या ४ वर्षानंतर २००३मध्ये स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद पंकजने पटकावले. त्यानंतर तेथून सुरू झालेली त्याची विजयी दौड अद्याप कायमच आहे. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी ३ जागतिक स्पर्धा जिंकून पंकजने साऱ्या बिलियर्ड-स्नूकर विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या खेळाच्या दोन्ही विभागात पंकजने आता आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्याने भारतीय बिलियर्ड स्नूकर खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे असेच म्हणावे लागेल. बिलियर्ड आणि स्नूकर या खेळात पंकजने गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळ सम्राटाप्रमाणे राज्य केले आहे. बिलियर्ड-स्नूकरमधे भारताने एकूण ५७ जागतिक विजेतेपदं मिळविली. त्यामध्ये तब्बल २९ जेतेपदं पंकजच्या नावावर आहेत. त्यामुळे पंकजच्या जबरदस्त खेळाची प्रचिती भारतीय क्रीडाप्रेमींना मिळू शकते.

पंकजचे बालपण आखाती देशामध्ये गेले. परंतु तो लहान असताना आखाती युद्धामध्ये अडवाणी कुटूंब भारतात परतले. मग अडवाणी कुटूंब बेंगळुरूमध्ये स्थायिक झाले. तेथे स्थायिक झाल्यानंतर काही वर्षांतच पंकजच्या वडिलांचे निधन झाले. पंकजला लहानपणापासूनच खेळाची खूप आवड होती. बॅडमिंटन, क्रिकेट, टेबलटेनिस, बास्केटबॉल या खेळात पंकजला रस होता. परंतु त्याचा मोठा भाऊ श्री, हा चांगला बिलियर्ड खेळायचा. मग त्याचेच बघून पंकजने या खेळाचा श्रीगणेशा लहान वयात केला. सुरुवातीलाच त्याचे चेंडू भराभर पॉकेटमध्ये जाऊ लागल्यामुळे पंकज या खेळाकडे पूर्णपणे आकर्षित झाला. मग उंचीला लहान असलेल्या पंकजसाठी सुरुवातीच्या काळात घरच्यांनी या खेळाचे विशेष टेबलदेखील बनवून घेतले होते. भारताचे महान बिलियर्डपटू अरविंद सेवूर यांनी या हिऱ्याला हेरले. मग त्याला घडविण्याचे मोठे काम सेवूर यांनी केले.

लहान वयातच आपल्या शानदार खेळाने पंकजने या खेळातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत चमकदार कामगिरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतदेखील त्याने भारताचा तिरंगा सतत फडकवत ठेवला. ज्युनियर गटात असताना त्याने वरिष्ठ गटाची राष्ट्रीय स्पर्धा जिंकून सगळ्यांनाच चकित केले होते. अथक मेहनत आणि रोजचा प्रचंड सराव या जोरावरच पंकजने या खेळात मोठी झेप घेतली. त्याच्या खेळाचा आलेख सतत उंचावत गेला. अनेक नवनवे विक्रम त्याने या खेळात साजरे केले. विल्सन जोन्स, मायकल फरेरा, गीत सेठी या दिग्गज भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करून भारताचा दबदबा निर्माण केला. आता पंकज त्यांचाच वसा पुढे चालवत आहे.

सहजासहजी तो हार मानणाऱ्यातला नाही. लढाऊ बाण्याची त्याची खासीयत आहे. जेतेपदाची त्याची भूक कधीच संपत नाही. त्यामुळे पंकज नेहमी विजेतेपदाचाच विचार करत असतो. मोठमोठे ब्रेक करण्यात त्याची खासियत आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो चांगलाच सक्षम आहे. कठीण समयी आपला खेळ उंचावण्यात तो माहिर आहे. त्यामुळेच पंकज आणि जेतेपद असं जणूकाही समीकरणच या खेळात झाले आहे. वयाच्या १७व्या वर्षी पंकजने पहिल्यांदा राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत वरिष्ठ गटात सर्वात लहान वयात ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. तर २००३मध्ये वयाच्या १९व्या वर्षी त्याने जागतिक स्नूकरचे पहिले जेतेपद पटकावले. त्यानंतर पंकजने एकामागून एक शिखरे सर करून आपल्या जबरदस्त खेळाचा ठसा बिलियर्ड, स्नूकरवर उमटवला. सुरुवातीला स्नूकरमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला बिलियर्ड खेळातदेखील तशीच कामगिरी करुन दाखवायची होती. त्याबाबत त्याने प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंनादेखील तसे सांगितले होते. परंतु तेव्हा त्याच्या बोलण्याकडे प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंनी फारसे लक्ष दिले नव्हते, कारण दोन्ही खेळाचे तंत्र आणि ते अवगत करण्यासाठी लागणारी मेहनत वेगवेगळी होती. मग त्याने जोमाने बिलियर्डमध्येदेखील अथक मेहनत करुन आपली कामगिरी उंचावण्यात यश मिळवले.

राज्य, राष्ट्रीय, अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा विचार केला तर १०पेक्षा जास्त जेतेपद पंकजच्या नावावर आहेत. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत २ वेळा सुवर्णपदके जिंकली आहेत. ३५पेक्षा जास्त वेळा त्याने राष्ट्रीय स्पर्धेवर आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. त्याची प्रचंड एकाग्रता आणि टेबलावरील चेंडू घेण्याची हुकूमत वाखाणण्याजोगी आहे. २०१२-१३मध्ये पंकज व्यवसायिक खेळाडू बनला. एवढे मोठे यश मिळवूनदेखील त्याचे पाय अजून जमिनीवरच आहेत. या खेळातील युवा खेळाडूंसाठी नक्कीच पंकज एक आयडॉल आहे. केंद्र सरकारनेदेखील त्याच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला अर्जुन, खेलरत्न, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. जागतिक बिलियर्ड स्नूकर महासंघानेदेखील त्याच्या कामगिरीची दखल घेऊन “हॉल ऑफ फेम”मध्ये त्याचा समावेश केला आहे. चीनमधील शांगराव येथे असलेल्या विश्व बिलियर्ड संग्रहालयात पंकजचे अनेक फोटो आणि माहिती ठेवण्यात आली आहे. आता त्याचे वय ३९ असल्यामुळे येणाऱ्या भावी काळात पंकजच्या नावावर जागतिक विजेतेपदाची संख्या ५०पेक्षा जास्त झाल्यास आश्चर्य वाटू नये. त्याची सध्याची कामगिरी हेच दर्शवत आहे. दुर्दैवाने या जगज्जेत्याचा अद्याप म्हणावा तसा मानसन्मान भारतभूमीत झालेला नाही. पंकजची ही विजयी दौड अशीच कायम राहिल, अशी अपेक्षा त्याचे तमाम चाहते करत असतील. भविष्यात पंकज या खेळात न भूतो न भविष्यती अशीच अफाट कामगिरी करणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

ही तर मुंबईला पत्करावी लागलेली नामुष्कीच!

विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील ६व्या फेरीतील लढतीत दुबळ्या जम्मू काश्मिर संघाविरुद्ध आपल्याच वांद्रे संकुलातील स्टेडियममध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे...

अखेर जागतिक खो-खो स्पर्धेचे बिगुल वाजले!

गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यावहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करुन आता या खेळाला जागतिक...

कांबळे कुटुंबियांनी उचलले मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे शिवधनुष्य

पारंपरिक शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य गेली अनेक वर्षे रत्नागिरी येथील कांबळे कुटुंबीय करत आहेत. दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी, रत्नागिरीच्या माध्यमातून हे कार्य गेली अनेक वर्षे सुरु आहे. सध्या या कार्याचा वारसा वस्ताद सुधीर कांबळे यांनी...
Skip to content