शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल, रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या.
प्रकृती आस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. मात्र, रविवारी सायंकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे अशी 3 मुले, वर्षा अविनाश शेवाळे, माजी नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे या 3 सुना आणि एकूण 6 नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत शिवतीर्थ, 10-B/12, बीएआरसी गेट नंबर 6 समोर, मंडाळा कॉलनी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, 88, या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा निघेल. आणि दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जातील.