Sunday, June 23, 2024
Homeमाय व्हॉईसगायतोंडेंची चित्रे एमआरए...

गायतोंडेंची चित्रे एमआरए मार्ग पोलीसठाण्यात पडून?

मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाच्या विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमालेचे आकर्षण पहिल्यापासूनच होते. पत्रकारितेत आल्यानंतर काही काळ व्याख्यानाला नियमित जातही असे. मात्र गेल्या काही वर्षांत यात बराच खंड पडला होता. मात्र आज आमचा मित्र व चित्रकार सतीश नाईक याचे व्याख्यान ऐकायला जायचेच असा निर्धारच केला होता. त्याप्रमाणे गेलोही होतो. आणि दोन-अडीच तास चित्रकार गायतोंडे यांच्यावरील निरूपणात दंग झालो.

सतीश नाईक हा माझा लोकसत्तातील सहकारी व मित्र. सतीश कला विषयाला वाहिलेल्या ‘चिन्ह’ या मासिकाचा संपादकही आहे. तो लोकप्रभेत पत्रकारिता करत होता. आपला एक सहकारी या प्रतिष्ठित व्याख्यानमालेचा व्याख्याता होतो आहे ही फिलिंगच भारी होती. तसे निवृत्तीनंतर आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात असतोच. सतीश कलाकार असल्याने कला हा त्याचा जीव की प्राण आहे. त्यावर कोणी अन्याय करत असेल तर तो कशाचीही पर्वा न करता रेशनपाणी घेऊन तुटून पडतो. तो कसा तुटून पडतो हे संपूर्ण महाराष्ट्राने ‘जे जे कला महाविद्यालय’ आंदोलनात पाहिलेले आहेच!

असाच सतीश चित्रकार गायतोंडे या विषयाने जणू काही झापटलाच होता असे वाटावे इतपत त्याने या विषयाला वाहून घेतलेले पाहिले आहे. आपल्या अतिशय कडक व काहीश्या भडकू पित्याच्या विरोधाला न जुमानता चित्रकला शिकणे व त्यात अव्वल दर्जा प्राप्त करणे किती कठीण असते हे ज्याचे वडील कठोर असतात त्याला लगेच लक्षात येईल. या चित्रकलेच्या हट्टापायी गिरगावातल्या कुडाळ देशकर वाडीतील चाळीच्या जिन्यांना बांधून कठोर बापाकडून छडीचा तसेच हाताचा मार खाल्ला होता ही आठवण सतीशने सांगताच अंगावर काटाच उभा राहिला व बापाबद्दल मनात अढी निर्माण झाली. तसेच गायतोंडे यांची माहिती देते देते सांगून झुलवत ठेवणाऱ्या शेजारी महिलेबदद्लही मनात कटुता निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.

2001मध्ये गायतोंडे यांचे निधन झाल्यानंतर एका इंग्रजी वर्तमानपत्राने कसा कदरुपणा दाखवून अवघ्या सहा ओळींची बातमी दिली या माहितीने चिडच निर्माण होते. नंतर सतीशने कशी धडपड करून विविध वर्तमानपत्रातील क्लीपिंग व लेख शोधून प्रथम चिन्हचा अंक आणि नंतर पुस्तक कसे सिद्ध केले याचा दृकश्राव्य माध्यमाच्या आधारे मोठा पटच श्रोत्यांपुढे उलगडला. “Painting is a poetry is seen rather than felt, and Poetry is painting that is felt rather than seen” हे वचन या व्याख्यानाच्या वेळी बऱ्याच वेळा मनात येऊन गेले. लवकरच गायतोंडे पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद येईल, असेही नाईक यांनी जाहीर केले.

दरम्यान चित्रकलेसंबंधी या व्याख्यानात मुंबई पोलिसांच्या पोलीसी खाक्याविषयी एक किस्सा समजला. गायतोंडे यांचे सन्मित्र कोणी प्रा. यंदे म्हणून होते. यांच्याकडे गायतोंडे यांची बरीच चित्रे होती. ती  अचानक त्यांच्या हाती लागली. याच्या आसपास दिल्लीच्या एका कलाप्रेमी महिलेला यंदे यांच्याकडे गायतोंडे यांची चित्रे आहेत असे समजले. त्या महिलेने ती चित्रे मिळवली व याचे पुस्तक काढूया असे सांगून त्या निघून गेल्या. काही महिन्यांनी त्या महिलेने फोन करून यंदेना सांगितले की मोठ्या पावसात ती सर्व चित्रे वाहून गेली. यंदे फक्त बरे म्हणाले व आपल्या कामास लागले. मात्र काही दिवसांनी महिलेने खोटे सांगितल्याचे उघड झाले. कारण, यंदेंना गायतोंडे यांचे एक चित्र बाजारात विकले गेले असल्याचे कळले. झाले यंदे यांनी लगेच पोलिसांत तक्रार केली व ती सर्व चित्रे जप्त केली गेली. ही चित्रे एमआरए मार्ग पोलीसठाण्याच्या ताब्यात असल्याचे समजते. मात्र हा अमूल्य ठेवा चित्रप्रेमींच्या हाती अजून लागलेली नाहीत, हेही तितकेच खरे!!

Continue reading

चला.. राजकीय प्रदूषणाचा भिकार खेळ संपला!

गेले पाच-सहा महिने सुरु असलेले राजकीय प्रदूषण अखेर कालच्या निवडणूक निकालाने संपले. राजकीय प्रदूषण अशासाठी म्हटले की, निवडणूक प्रचार व त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी शब्दांची 'होळी' वा 'शिमगा' साजरा केला होता. केवळ शब्दच कानावर पडत होते...

राजकारण की समाजकारण म्हणजे अंडे पहिले की कोंबडी?

खरेतर हा सनातन प्रश्न आहे राजकारण की समाजकारण? महाराष्ट्रात हा प्रश्न घेऊन लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर समोरासमोर उभे ठाकले होते. यापासून तो अगदी आज, आतापर्यंत राजकारणानेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. ''the darkest places in hell are...

टाकेहर्षची कहाणी.. करूण की संतापजनक?

महाराष्ट्रातील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठी असलेल्या त्रंबकेश्वर देवस्थानापासून अवघ्या 20/22 किलोमीटर्स वर असलेल्या टाकेहर्ष गावाची ही म्हटलं तर करूण म्हटलं तर संतापजनक कहाणी! अवघ्या 250 घरांची ही कहाणी. टाकेहर्ष, हे गाव आदिवासी पट्ट्यातील असून तेथे मूलभूत...
error: Content is protected !!