मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्यायायाने गावाकडे परतलेले अन्य राज्यांतील लोक पुन्हा एकदा मुंबईकडे वळू लागलेले आहेत. रेल्वे-रस्तामार्गे रोज ८० हजार नागरिक पुन्हा मुंबईत येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा फोफावण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत आहे. मात्र परप्रांतीयांची गर्दी पुन्हा अशीच मुंबईत वाढत गेली तर कोरोनाची लाट पुन्हा तीव्र होण्याची भीती आहे. शासनाने सध्या १५ मेपर्यंत घातलेले निर्बंध कडक अंमलबजावणीअभावी परिणामकारक ठरत नसून अनेक ठिकाणी व्यवसाय व दैनंदिन व्यवहार अगदी जोमाने सुरू आहेत. रेल्वे, बाजारपेठा, रस्तेवाहतुकीतील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. अशा परिस्थितीत निर्बंधांच्या भीतीपोटी आपापल्या गावी परतलेला अन्य राज्यांतील लोकांचा लोंढा रोजगारासाठी पुन्हा मुंबईत धाव घेऊ लागला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल ही टर्मिनस वगळल्यास अन्य रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारे चाचणी केली जात नाही अथवा त्यांची नोंद ठेवली जात नाही. ही स्थिती कायम राहिल्यास सध्या आटोक्यात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट भविष्यात पुन्हा उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यांतर्गत धावणाऱ्या गाड्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात येत असल्या तरी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, प. बंगालमधून येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत आहे. मध्य रेल्वेवर रोज सरासरी ४० हजार आणि पश्चिम रेल्वेवर सरासरी ३० हजार नागरिक मुंबईत दाखल होत आहेत. परराज्यांतून मध्य रेल्वेवर रोज ६० आणि पश्चिम रेल्वेवर १४५ रेल्वेगाड्या मुंबईत येतात.
मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला नेहरूनगर, परळ, पनवेल या मुंबई विभागात रोज १० हजार प्रवासी एसटीने शहरात येत आहेत. ६० ते ७० खासगी ट्रॅव्हल्समधून रोज सुमारे दोन हजार प्रवासी मुंबईत येतात. बस प्रवासासाठी आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. मात्र या अहवालाची सत्यता तपासणीची कोणतीही यंत्रणा टोलनाके, सीमा तपासणी नाके या ठिकाणी अस्तित्त्वात नाही. त्यामुळे बिनचाचण्यांचा प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. यात बाधित लोक संसर्गाचा फैलाव वेगाने करू शकतात व शहराला पुन्हा कोरोनाच्या गर्द छायेत ढकलू शकतात. त्यामुळे या इनकमिंगवर नियंत्रण आणण्याची खरी गरज आहे.
मुंबईत येणाऱ्या लोकांच्या चाचण्या रेल्वे, बस स्थानकावरच करणे, त्यांची नोंद ठेवणे, त्यांचा कामाची-वास्तव्याची ठिकाणे तपासणे, किमान १० दिवस त्यांना विलगीकरणात ठेवणे ह्या बाबी कटाक्षाने करणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा सध्याची ‘कुणीही यावे आणि कुठेही राहावे’ ही परिस्थिती अन्य राज्यांतून येणाऱ्या लोकांच्या बाबतीत कायम राहिली तर मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचा केंद्रबिंदू ठरेल एव्हढे नक्की!
गरोदर महिलांना सरकारी यंत्रणेचा हात
कोरोना काळात गरोदर महिलांची सुखरूप सुटका करण्याची बाब सर्वात महत्त्वाची व प्राधान्याची आहे. आज कोरोना साथीने घातलेले थैमान सर्वश्रुत आहे. गाव, शहरांतील अनेक खाजगी व शासकीय रुग्णालये आज कोरोना रुग्णांनी व्यापलेली आहेत. इतके असूनही कोरोना रुग्णांना बेड मिळण्यासाठी सर्वांचीच मोठी तारांबळ उडते. अशात एखादी गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह झाली तर अडचणींना पारावारच राहत नाही. मग त्या महिलेचे व तिच्या कुटुंबियांचे हाल यांना सीमाच उरत नाही.
मात्र तशाही परिस्थितीत काही डॉक्टर देवदूत म्हणून धावून येत असतात. त्यातल्या त्यात सरकारी आरोग्य सेवेमधील डॉक्टरांप्रती असलेली जनमानसांतील उदासीनता आपल्या कृतीतून पुसण्याचा प्रयत्न काही ध्येयवेड्या सरकारी डॉक्टरांचा दिसून येतो. ही संवेदनशीलता बऱ्याचशा सरकारी रुग्णालयांमध्ये सातत्याने दिसून येते. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोविड महामारीच्या काळात अविरतपणे सेवा बजावण्याचे काम सरकारी यंत्रणा करत आहेत. दिवसरात्र रुग्णसेवेत व्यस्त असणारे अनेक डॉक्टर समाजाप्रती संवेदशीलता जपण्याचा प्रयत्न कसोशीने करताना दिसतात.
नुकतीच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली एक घटना ह्याच संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी आहे. विक्रमगडच्या शांता नामक आदिवासी महिलेचं हिमोग्लोबिन अवघे तीन झाले होते. तशातच ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बाळंतपण कसं पार पडणार ही चिंता सर्वांना होती. ठाणे जिल्ह्यातील मोखाड्याच्या डॉक्टरांनी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दूरध्वनी करून ही माहिती देताच त्यांनी तत्काळ शांताला ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यास सांगितले. शांता जिल्हा सामान्य रुग्णालयात येताच डॉक्टरांनी पटापट उपचार सुरू करत रक्त चढवून प्रथम हिमोग्लोबिन वाढवले. कोरोनाचे उपचार सुरू ठेवत तिचे बाळंतपणही सुखरुप पार पाडले.
वास्तविक रुग्णसेवेत व्यग्र असणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाला बरे करणे हे एक प्रकारचे कर्तव्यच मानले जाते. मात्र कर्तव्यभावनेपेक्षा त्या रुग्णाप्रती आपुलकीवजा आस्था दाखवण्याचे काम डॉक्टर करत असतील त्यांचे कौतुक व्हायलाच पाहिजे. गेल्या वर्षभरात जवळपास १०१ कोरोनाबाधित महिलांची बाळंतपणं सुखरूपपणे ठाणे जिल्हा रुग्णालयात पार पडली आहेत. शांतासारख्या अनेक महिलांची सुखरूप सुटका या रुग्णालयाने केली. यात २३ सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १०५ नवजात बालकांची सर्वार्थाने काळजी घेतली गेली. यातील सर्वच आज आपापल्या घरी सुखरूप आहेत.
कोरोनाचा काळ हा तसा सर्वांसाठीच कठीण असला तरी ठाणे जिल्ह्यात याचे आव्हान मोठे होते. जिल्ह्यात नऊ महापालिका असूनही आरोग्य यंत्रणा आज अपुरी पडत आहे. त्यातही कोरोनाबाधित गर्भवती महिलांचे बाळंतपण करण्यास कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील मोठमोठी रुग्णालये धजावत नव्हती तिथे ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची स्थिती काय असेल ती कल्पना आपण करू शकतो. त्यातही दुर्गम आदिवासी तसेच ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे खूपच हाल झाले. अशा महिलांसाठी आशेचा किरण ठरलेल्या आरोग्य विभागाच्या ठाणे जिल्हा रुग्णालयाने आपला रुग्णसेवेचा वसा अगदी चोखपणे जोपासला असेच म्हणावे लागेल.
हेच चित्र आरोग्य विभागाच्या राज्यातील बहुतेक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहावयास मिळाले. ह्या कोरोनाकाळात गरोदर महिलांच्या कुटुंबियांची संभ्रमावस्था दूर करत त्या महिलेची व बाळाची सुखरूप सुटका करणारे डॉक्टर त्या कुटुंबियांच्या लेखी देवदूतच मानले जातील. ‘काही चिंता नको, सर्व ठीक होईल’ हे डॉक्टरांचे धीरोदत्त शब्द तुम्हा, आम्हा व रुग्णाला किती ऊर्जा देतात हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही!