प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला कालच मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तो हसतखेळत, अत्यंत उत्साहित मुद्रेत स्वतःच्या वांद्र्यातल्या घरी जाताना वृत्तवाहिन्यांवर दिसला. त्यामुळे सैफवर गंभीर चाकूहल्ला झाला होता की नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ठाण्याच्या लेबर कॅम्पमधून पकडलेला आरोपी डमी (बोगस) तर नाही ना, असाही सवाल आता केला जात आहे.
कालच सैफ अली खानला रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यावेळी घरी जाताना सैफने आपल्या चाहत्यांना जोरदार अभिवादन केले. कोणाचीही मदत न घेता तो आपल्या घरी गेला. यावर शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय निरूपम यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे. ज्याच्या शरीरावर सहा वार झाले. ज्याच्या पाठीतून चाकूचा अडीच इंचाचा तुकडा काढला गेला. ज्याच्यावर तब्बल सहा तास शस्त्रक्रिया झाली तो माणूस पाच दिवसांत इतका फिट कसा काय राहू शकतो, असा सवाल निरूपम यांनी केला आहे. त्याचवेळी पोलिसांनी पकडलेला आरोपी शहजादचा फोटो आणि सैफ राहत असलेल्या इमारतीतल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फूटेजमध्ये दिसत असलेल्या व्हिडिओतला फोटो यात साधर्म्य आढळून येत नाही. पकडला गेलेला आरोपी व्हिडिओतल्या आरोपीच्या तुलनेत वयस्क वाटतो. त्यामुळे पकडलेला आरोपी खरा आरोपी आहे ना, असा सवाल काँग्रेसचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.
सैफ अली खानवर १८ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर चाकूहल्ला झाला. त्यावेळी त्याच्या घरात नेमके काय झाले हे आजही जनतेसमोर आलेले नाही. सैफची पत्नी करीना कपूर त्यावेळी पार्टीला गेली होती. घरात मोलकरीण व तत्सम काम करणारे कर्मचारी होते. बऱ्यापैकी सुरक्षाव्यवस्था असलेल्या घरात हल्लेखोर गेलाच कसा? हल्ल्यानंतरही तो निसटला कसा? हल्ल्यानंतर सैफला त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा इब्राहीम रिक्षातून लीलावती रूग्णालयात घेऊन गेला. त्यावेळी त्याचा करीनापासून झालेला मुलगा तैमूर सोबत होता. या सर्व घटना घडत असतानाही इमारतीच्या गार्डना काही कसे कळले नाही? पोलीसांनाही कोणी काही कळविले नाही. रात्री रूग्णालयात करीना कपूर किंवा तिच्या कुटुंबियांपैकी इतर कोणीही गेले नाही. रूग्णालयाकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीसयंत्रणा कामाला लागली. रिक्षाचालक भजन सिंह राणा याच्या म्हणण्यानुसार सैफला रक्तबंबाळ अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आले. मग चार दिवसांत तो इतका फिट झाला कसा, असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे.
पोलिसांनी आता पकडलेल्या आरोपीकडून सीन रिक्रिएशनची मोहीम राबवली जात आहे. पोलिसांनी सैफच्या घरातून अनेक ठिकाणचे फिंगरप्रिंट्स घेतले आहे. फॉरेन्सिक चाचणीही होत आहे. गुन्हा घडल्यानंतर इतक्या दिवसांनी हे पुरावे गोळा करण्यामागचे कारण पुन्हा प्रश्नांकीतच राहते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी इमारतीच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरला. तेव्हा इमारतीचा गार्ड झोपला होता. नंतर तो इमर्जंसी पायऱ्यांवरून दहा माळ्यापर्यंत गेला. त्यानंतर तो डक्टच्या पाईपवरून ११व्या माळ्यावरील बाथरूममध्ये घुसला. सैफवरील हल्ल्यानंतर तो त्याच मार्गाने इमारतीबाहेर पडला. त्यानंतर तो इमारतीच्याच आवारात दोन तास लपला होता. सैफच्या घरातल्या लोकांनी लगेचच पोलिसांना कळवले असते तर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत कदाचित आरोपीला पकडलेही असते. पण तसे झाले नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी चोरीसाठी घरात शिरला होता. नंतर भीतीपायी त्याने सैफवर चाकूहल्ला केला. करीना कपूरच्या कथित जबाबानुसार, घरातली कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही. चोर जर चोरीच करत नाही तर मग तो गेला तरी कशाला? करीनाच्या घरातल्या कर्मचारी तक्रारदार महिलेने आरोपीने एक कोटी रूपये मागितल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याचा अर्थ आरोपी तैमूरला पळवून नेऊन, ओलीस ठेवून कोट्यवधीची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात होता का? अशा साऱ्या गोष्टी अजूनही अनुत्तरीत आहेत. त्यातच पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास अधिकारीच बदलला आहे. सुरूवातीला जो अधिकारी होता तो अचानक बदलण्याचे कारण काय?
अनेकदा घरगुती वादही अशा काही मोठ्या घटनांमागे कारणीभूत असतात. प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मग पोलिसांच्याच मदतीने सारवासारव केली जाते. काही महिन्यांपूर्वी मध्यरात्रीनंतर अभिनेता गोविंदा स्वतःच्याच पिस्तुलातल्या गोळीने जखमी झाला होता. नंतर एका खाजगी रूग्णालयात दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्याला घरी पाठवण्यात आले. ते प्रकरणही संशयाच्या भोवऱ्यातच होते. त्यानंतर गोविंदाच्या पत्नीनेही काही सूचक विधाने केली होती. गोविंदा तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा. विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकही होता. त्यामुळे गोविंदाचे प्रकरण लीलया दाबले गेले. सैफ अली खान अलीकडेच सहकुटूंब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेला होता. त्यामुळे त्याचे वजनही भारी. परिणामी त्याचे प्रकरणही असेच लीलया दाबले जाईल, अशी शंका व्यक्त होत आहे.
सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर विरोधकांनी मुंबई सुरक्षित नसल्याच्या आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर आरोपीला पकडणे पोलिसांची अपरिहार्यता होती. सैफ राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्हीच्या फूटेजवरून पकडलेल्या दोन संशयितांनंतर आता हा तिसरा आरोपी पकडला गेला आहे. ठाण्याच्या लेबर कॅम्पमधून पकडण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी हाच सैफ अली खानवरील हल्लेखोर असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी पोलिसांनी काही फिंगरप्रिंटचे सॅम्पलही गोळा केलेले आहेत. हे सॅम्पल आरोपीच्या फिंगरप्रिंटशी मिळतात असा पोलिसांचा दावा आहे. परंतु हे सॅम्पल कधी गोळा केले आणि कशा परिस्थितीत गोळा केले याचा कोणता पुरावा पोलिसांकडे आहे, जो ते न्यायालयात सादर करू शकतात? आजकाल आरोपीकडून गुन्ह्याचे रिक्रिएशन करण्याची एक नवीन पद्धत पोलिसांनी तयार केली आहे. म्हणजे आपण ठरवू तो आरोपी.. आपण सांगू त्याप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी तशी भूमिका अदा करेल आणि त्यावेळी निर्माण झालेले वा केले गेलेले पुरावे कोर्टामध्ये सादर करता येतील, असा एक नवीन फंडा पोलिसांनी सुरू केला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातच नाही तर भारतात अशा अनेक वृत्तवाहिन्या बोकाळल्या आहेत की ज्या पोलिसांच्या अशा सर्व कृत्यांना आपल्या माध्यमातून खतपाणी घालत आहेत.
पोलिसांना न्यायालयात पुरावा म्हणून उपयुक्त ठरणारी ‘ओळख परेड’ आजच्या जमान्यात कालबाह्य ठरत आहे. त्याचे मुख्य कारणही वृत्तवाहिन्या आहेत. (या परेडमध्ये साक्षीदार आरोपीला ओळखतो आणि तो गुन्ह्यातला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो. सैफच्या प्रकरणात स्वतः सैफ, त्याचा मुलगा तसेच घरातल्या मेड्स वा तत्सम कर्मचारी.) याच वाहिन्यांवरून संशयित आरोपीचे सीसीटीव्हीवरचे फुटेज आणि फोटो जाहीरपणे दाखवले जातात. पोलीस किंवा न्यायालय कोणीही त्याला आक्षेप घेत नाही. राजकारणी तर आक्षेप घेऊच शकत नाहीत, कारण त्यांनाही याच माध्यमातून प्रसिद्धी मिळते. त्यामुळे खरा आरोपी दोषी ठरण्यातच अडचणी निर्माण होतात. जवळजवळ ९९ टक्के गंभीर गुन्ह्यांचा तपास न्यायप्रविष्टच राहतो. त्यात फिर्यादीही जग सोडून गेलेला असतो आणि आरोपीही या दुनियेत श्वास घेत नसतो. अशा सर्व खटल्यांमध्ये पोलिसांकडून सादर होणारे सर्व पुरावे कधीच आरोपींना सजा देणारे नसतात. फक्त खानापूर्ती होते. तपास करणारा पोलीस निवृत्त होतो. त्याच्यापुढे काम पाहणारा अधिकारी त्याकडे लक्ष देत नाही. पुरावे वेळच्यावेळी सादर होत नाहीत आणि उभा केलेला खोटा आरोपी निर्दोश बाहेर पडतो. खरा आरोपी मोकाटच राहिल्याने गुन्हेगारालाही वचक बसत नाही व त्याची गुन्हेगारी फोफावतच राहते.
आजकाल पोलीस कोणाच्याही कपाळावर कोणाचाही टिळा लावू शकतात ही वस्तुस्थिती आहे. ज्याच्या हातात ससा तो पारधी.. जिसके हाथ लाठी उसकी भेंस.. या ज्या म्हणी केल्या गेल्या आहेत त्या उगाच नाहीत. तसा अनुभव त्यावेळेच्या लोकांना आला. त्यामुळेच अशा म्हणींना लोकमान्यता मिळाली. सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरवर शंका उपस्थित करून न्यायालयाने संबंधित चार ते पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचा इतिहास बघितला तर अलीकडच्या काळात उघडकीस आलेला प्रकार म्हणजे तुरूंगात असलेला बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या बरोबरीने एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक प्रदीप शर्माने केलेली मनसुख हिरेन नावाच्या व्यापाराची हत्त्या. त्याचे शव ठाण्याच्या खाडीच्या किनाऱ्यावर आढळून आले होते. हाच प्रदीप शर्मा नावाच्या एन्काऊंटर स्पेशालिस्टला लखनभैय्याच्या बोगस एन्काऊंटर प्रकरणात शिक्षा झाली होती. अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सध्या तो जामिनावर आहे.
याचाच अर्थ पोलिसांची तपास करण्याची आणि तपास दाखवण्याची जी पद्धत आहे यात तफावत आहे. मला आठवते की महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक एस. राममूर्ती म्हणायचे की, आरोपीकडून मारूनमुटकून गुन्हा कबूल करून घेण्याने गुन्ह्याची उकल होत नाही तर हात न लावता किंवा धाकदपटशा न दाखवता आरोपीकडून माहिती घेणे आणि संबंधित पुरावे सादर करणे यानेच गुन्हा सॉल्व्ह होतो आणि तो कोर्टातही टिकतोही. पण आता काय झालंय पोलीस फक्त सीसीटीव्हीच्याच आधारावर तपास केंद्रीत करत आहेत. कोणत्याही आरोपीला शोधायचे तर त्या परिसरातला सीसीटीव्ही पाहायचा. मग तो चालू आहे की बंद इथपासून ते संबंधित गुन्ह्याचे रेकॉर्डिंग झाले आहे की नाही इथपर्यंत सारा तपशील गोळा करायचा आणि त्यानंतर तपासाची दिशा ठरवायची. पूर्वी असा तपासच नव्हता. पूर्वीच्या काळात पोलिसांकडून प्रोसेस ऑफ एलिमिनेशन वापरली जायची. याचाच अर्थ जे जे संशयित आरोपी आहेत त्यांची जंत्री खुली करून त्यातून वेगवेगळ्या आरोपींना वगळले जायचे.
उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी चोरी झाली तर ती चोरी कधी झाली? दिवसा झाली की रात्री? गज वाकवून झाली की दरवाजा फोडून? छतावरून चोर घुसला की पत्रा वाकवून आत गेला? कोणत्या वस्तू नेल्या? सोने-चांदी, पैसे, भांडी, कपडे की इतर मौल्यवान वस्तू? त्यानंतर कोणत्या परिसरात ही घटना घडली? सकाळी घडली की रात्री? अशा पद्धतीचे गुन्हे करणारे आरोपी कोण कोण आहेत याची यादी पाहिली जायची. त्यातले तुरुंगात कोण आहेत, पोलिसांच्या तावडीत कोण आहेत यांना वगळले जायचे. यादीत समोर असलेल्या आरोपींच्या पुढे प्रश्न केले जायचे तेही कागदावरच. कधी गुन्हा झाला, दिवसा. म्हणजे रात्रीतले गुन्हे करणारे बाहेर. गज वाकवून गेला तर दार फोडून जाणारे बाहेर. कारण दिवसा घर फोडणारा रात्री घर फोडत नाही. गज वाकवणारा दार फोडणार नाही याची पोलिसांना खात्री असायची. सोने-चांदी चोरणारा कापडे उचलत नाही, भांडी नेत नाही, कारण तो सोन्या-चांदीच्याच वस्तूंची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे मग पोलीस पुढे जाऊन असे गुन्हे करणारे कोण कोण आरोपी यादीत आहेत हे पाहायचे. त्यातले तुरुंगात कोण, सत्तरी गाठलेले कोण, मेलेले कोण, आजारी आणि रुग्णालयात कोण यांना वगळून उरलेल्या आरोपींना शोधायचे. याला म्हणतात प्रोसेस ऑफ एलीमिनेशन. यादीतल्या संशयित आरोपींची माहिती खबऱ्यांकडून काढायचे आणि आरोपी गजाआड व्हायचा.
आज पोलिसांच्या दुर्दैवाने ही साधी आणि सोपी पद्धत जवळजवळ कालबाह्य झाली आहे. पोलिसांकडे खबऱ्यांचे जाळे राहिलेले नाही. नवीन तंत्रज्ञान हाती लागले आहे. आर्टिफिशियल इन्टिलीजन्स आहे. त्याचा वापर करत ही प्रोसेस चतुरतेने वापरली तर काही मिनिटांतच आरोपी निश्चित करता येऊ शकते. आज दळणवळण प्रमाणाबाहेर समृद्ध झाले आहे. गुजरातमधला आरोपी मुंबईत येऊन गुन्हा करून परत चार तासात गुजरातमध्ये पोहोचतो. तशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक महानगरांबद्दल आहे. कोण कुठून येईल, कधी गुन्हा करेल आणि कुठे जाईल हे कोणालाच कळणार नाही. पोलिसांची संख्याही अगदीच मामुली आहे. आज ज्याप्रमाणे मुंबईसारख्या मोठ्या महानगरांमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे ते लक्षात घेऊन काही हजारांच्या मागेही एक पोलीस दिसत नाही. पुन्हा पोलीसही माणूसच आहे. त्याचाही जीव आहे आणि त्याचेही कुटूंब आहे. तो तरी किती धडपडणार? म्हणूनच पोलीस आता जास्तीतजास्त सीसीटीव्हीवरच अवलंबून राहू लागले आहेत. प्रत्येकाकडे सीसीटीव्ही बसवून घेण्याचा आग्रह धरला जात आहे. पण या यंत्रणेने गुन्हा रोखण्यात फारशी मदत होत नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाला उपयुक्त ठरणाऱ्या यंत्रणेबरोबरच गुन्हे रोखणाऱ्या यंत्रणेवरही भर दिला पाहिजे. पण, पकड मुंडी आणि कर आरोपी.. ही वृत्ती पोलीस जोपासणार असतील तर तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी पोलीसयंत्रणा मागासलेलीच राहणार हे निश्चित!