भारतीय नौदलाची चीता, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौका 12 जानेवारी 2024 रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून कार्यमुक्त करण्यात आल्या. पोर्ट ब्लेअर येथे पारंपरिक पद्धतीने कार्यमुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सूर्यास्ताच्या वेळी या तीनही जहाजांवरील राष्ट्रीय ध्वज, नौदल चिन्ह आणि तीन जहाजांचे डिकमिशनिंग प्रतिक शेवटच्या वेळी खाली उतरवण्यात आले.
चीता, गुलदार आणि कुंभीर ही जहाजे पोलंडच्या ग्डिनिया शिपयार्ड येथे पोलनोक्नी वर्ग जहाजे म्हणून बांधली गेली होती आणि ही जहाजे अनुक्रमे 1984, 1985 आणि 1986मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती. चित्ता हे जहाज आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अल्पा काळासाठी कोची आणि चेन्नई येथे तर कुंभीर आणि गुलदार हे विशाखापट्टणम येथे तैनात होते. या जहाजांनी नौदलात सूमारे 40 वर्षे सक्रिय सेवा बजावली. या जहाजांनी 12,300 दिवस समुद्र वास्तव्यात एकत्रितपणे सुमारे 17 लाख समुद्री मैलांचा प्रवास केला आहे. अंदमान आणि निकोबार कमांडचे उभयचर प्लॅटफॉर्म म्हणून, या जहाजांनी सैन्याच्या तुकड्या किनाऱ्यावर उतरवण्यासाठी 1300 पेक्षा अधिक समुद्रकिनारी मोहीमा केल्या आहेत.
आपल्या गौरवशाली सेवा काळात या जहाजांनी अनेक सागरी सुरक्षा मोहिमा आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण कार्यात भाग घेतला आहे. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी तसेच भारत आणि श्रीलंकेच्या सीमेवरील अवैध स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मे 1990मध्ये ऑपरेशन ताशा दरम्यान भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या आयपीकेएफ मोहीमेचा भाग म्हणून ऑपरेशन अमन तसेच 1997 मध्ये श्रीलंकेवर चक्रीवादळामुळे कोसळलेले संकट आणि 2004मध्ये हिंदी महासागरातील त्सुनामी नंतरच्या मदत कार्यात या जहाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
चित्ता, गुलदार आणि कुंभीर या भारतीय नौदलाच्या जहाजांनी सागरी सेवा क्षेत्रात एक अमिट छाप उमटवली आहे आणि त्यांची कार्यमुक्ती झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपला आहे.
एअर मार्शल साजू बालकृष्णन, एव्हीएसएम, व्हीएम, अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN)चे कमांडर-इन-चीफ आणि व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम, व्हीएसएम यांच्यासह नौदल उपप्रमुख, ध्वज अधिकारी, माजी कमांडिंग अधिकारी आणि या तीनही जहाजांचा सेवादल ताफा पोर्ट ब्लेअर येथे संपन्न झालेल्या कार्यमुक्ती समारंभात सहभागी झाला होता. एकाच वर्गाच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी कार्यमुक्त करण्यात आल्याने हा कार्यक्रम खूप अनोखा बनला होता.