Tuesday, September 17, 2024
Homeमाय व्हॉईसऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी...

ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक!

पॅरिसमध्ये संपन्न झालेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले. गेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची आजवरची आपली सर्वोत्तम कमाई केली होती. पॅरिसमध्ये हे चित्र बदलून भारताची पदक संख्या दोन आकड्यांमध्ये होईल, असा अंदाज जाणकार ऑलिंपिक सुरु होण्यापूर्वी करत होते. परंतु टोकियोएवढी पदकेही भारताला पॅरिसमध्ये मिळू शकली नाहीत. गेल्या वेळच्या तुलनेत १ पदक यावेळी कमी झाले. तसेच सुवर्ण पदकदेखील भारताच्या नावावर यंदा लागू शकले नाही. यंदा भारताने १ रौप्य आणि ५ कांस्य पदके जिंकली.

जमेची बाजू म्हणजे गोल्डन बॉय नीरज चोप्राने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना रौप्य पदकाची कमाई केली. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने आपले गेल्या वेळचे कांस्य पदक यंदादेखील कायम राखण्यात यश मिळविले. भारताला सर्वाधिक तीन पदके नेमबाजीत मिळाली तर दोन पदके युवा नेमबाज मनू भाकरने भारताला मिळवून देण्यात मोठा पराक्रम गाजवला. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिचे तिसरे पदक मात्र थोड्यात हुकले. २५ मीटर एयर पिस्तुल या तिच्या आवडत्या प्रकारात मनूचे पदक अवघ्या एका गुणाने हुकले. शुटऑऊटमध्ये ती पराभूत झाली. अन्यथा मनू या ऑलिंपिकमध्ये पद‌कांची हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय ठरली असती. १० मीटर एयर पिस्तुल प्रकारात मनूने कांस्य पदक जिंकून भारताचे पदकाचे खाते उघडले. त्यानंतर १० मीटर एयर पिस्तुल मिश्र विभागात सरबज्योत सिंगच्या साथीत मनूने कांस्य पदकावर कब्जा केला.

५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळकरने कांस्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला. तब्बल ७२ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा ऑलिंपिक पदक जिंकून देण्यात स्वप्निल यशस्वी ठरला. याअगोदर १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पहिले वैयक्तिक पदक जिंकून भारताचा ऑलिंपिकमधील वैयक्तिक पदकाचा श्रीगणेशा केला होता.

हरमनप्रित सिंगच्या भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनला नमवून पुन्हा एकदा भारतीय हॉकीप्रेमींना आनंद मिळवून दिला. भारताने ऑलिंपिकमध्ये ५२ वर्षानंतर पुन्हा सलग दोन कांस्य पदके जिंकली. कर्णधार हरमनप्रित सिंह आणि गोलरक्षक श्रीजेश हे भारतीय संघाच्या विजयाचे खरे शिल्पकार होते असे म्हटले तर वावगे ठरु नये. बहुतेक सर्वच सामन्यांत या दोघांनी आपल्या जबरदस्त खेळाची चमक दाखवून भारतीय विजयात मोलाची कामगिरी बजावली. हरमनप्रित सिंहने स्पर्धेत सर्वाधिक १० गोल केले तर गोलरक्षक श्रीजेश चिनी भिंतीप्रमाणे मैदानात उभे राहून प्रतिस्पर्धी संघाची अनेक आक्रमणे थोपवून घरण्यात यशस्वी ठरला. त्याची ही शेवटची स्पर्धा होती. त्याने आपल्या २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम देण्याचा निर्णय घेतला. भारतीय हॉकी संघाने या आपल्या सहकाऱ्याला निवृत्त होताना कांस्य पदकाची छान भेट दिली. उपांत्य फेरीच्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताला बलाढ्य जर्मनीकडून २-१ अशी हार खावी लागली. दैवाची थोडी साथ भारताला मिळाली असती तर भारत अंतिम फेरीत पोहोचला असता. परंतु शेवटच्या काही मिनिटात २ सोपे गोल करायची संधी भारताने वाया घालवली. तिथेच जर्मनीचा विजय पक्का झाला.

पुरुषांच्या कुस्ती स्पर्धेत युवा पेहेलवान अमन सेहेरावतने भारताला कांस्य पदक जिंकून दिले. यामुळे २००८च्या बिजिंग ऑलिंपिकपासून कुस्तीत पदक मिळविण्याची परंपरा पॅरिसमध्येदेखील भारताने कायम राखली. त्यांनी कांस्य पदकाच्या लढतीत क्रूझचा आरामात पराभव केला. २१ वर्षे ४ महिन्यांचा असलेला अमन आता भारतातर्फे ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारा सर्वात युवा खेळाडू उरला. याअगोदर हा विक्रम पी. व्ही. सिंधूच्या नावावर होता. भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू विनेश फोगटचे वजन अंतिम फेरीच्या सामन्यापूर्वी १०० ग्रॅमने वाढल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. त्यामुळे तमाम भारतीय कुस्तीप्रेमींना मोठाच धक्का बसला. कारण अगोदरच्या फेऱ्यांमध्ये विश्वविजेत्या खेळाडूंना पराभूत करण्याचा पराक्रम विनेशने केला होता. त्यामुळे तिच्याकडून सुवर्ण पदकाची आशा सर्व भारतीयांना होती. विनेश ही अनुभवी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. विनेशच्या क्षुल्लक चुकीमुळे तिचे सोनरी पदकाचे स्वप्न भंग पावले. या निर्णयाविरोधात विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली. पण तिथे तिचे अपिल फेटाळण्यात आले.

भारतांच्या पदकांची संख्या नक्कीच दुहेरी झाली असती. परंतु किमान ५ ते ६ पदके थोड्या फरकाने हुकली. नेमबाजीत मनू भाकर, अर्जुन बबुता, स्कीट प्रकारात महेश्वरी अनंतजीत, तिरंदाजीत धीरज- अंकिता, बुजूर्ग महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू, युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन यांची पदके हुकल्यामुळे भारताची पदकसंख्या दुहेरी आकडा गाठू शकली नाही. जागतिक बॅडमिंटन दुहेरीतील अब्बल जोडी शेट्टी-रेड्डी आणि पी. व्ही. सिंधू यांच्याकडून हमखास पदकाची आशा होती. परंतु शेट्टी-रेड्डी आणि सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. युवा कुस्तीपटू निशा दहियाला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शेवटच्या फेरीत जबर दुखापत झाल्यामुळे शेवटच्या क्षणी जिंकलेली कुस्ती तिने गमावली. नाहीतर उपांत्य फेरीत तिचा प्रवेश निश्चित होता. गेल्या वेळची महिला कांस्य पदक विजेती बॉक्सर लवलिनाला पहिल्या फेरीतच चीनच्या विश्वविजेत्या लीकडून हार खावी लागली. तर दोनवेळच्या विश्वविजेत्या निकत झर्शनचे आव्हानदेखील दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. तिलादेखील दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या बुद्धयीसमोर हार खावी लागली.

६ पदके जिंकणाऱ्या भारताचा पदक तालिकेत ७१वा क्रमांक लागला. गेल्या टोकियो स्पर्धेत भारत ४८व्या क्रमांकावर होता. आपला शेजारचा पाकिस्तान या क्रमवारीत तीन स्थानांनी पुढे आहे. कारण त्यांच्या नदिमने भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले. ऑलिंपिकसाठी भारताचा गोल्डनबॉय नीरज चोप्रा पूर्ण तंदुरुस्त नव्हता. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे त्याने स्वप्न धुळीस मिळाले. परंतु त्याच्या कामगिरीत मात्र सातत्य आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. लवकरच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त आहे. या स्पर्धेत ८४ देशांनी कुठले न कुठले पदक पटकावले. अमेरिकेने ४० सुवर्ण, ४४ रौप्य, ४२ कांस्य पटके जिंकन आपले वर्चस्व पदकतालिकेत राखले. ४० सुवर्ण, २२ रौप्य, २४ कांस्य पटके जिंकणारा चिनी संघ पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

भारतीय पदक विजेत्यांमध्ये हरियाणाचाच मोठा वाटा आहे. त्यांचेच सर्वाधिक खेळाडू भारतातर्फे ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले होते. भारतामध्ये अजूनही क्रीडा संस्कृती म्हणावी तेवढी रुजली नाही. शाळा, कॉलेजमध्ये खेळांबाबत फारसे चागले चित्र दिसत नाही. ऑलिंपिकमध्ये पदकांची संख्या वाढवायची असेल तर तळागाळातील खेळाडूंना हाताशी धरून त्यांना योग्य सुविधा, प्रशिक्षण दिले गेले तर नवी क्रांती भारतीय खेळामध्ये होऊ शकते. अजूनही भारतातील बऱ्याच खेळांचा संघटनांचा कारभार योग्यरित्या चालत नसल्याचे बघायला मिळते. केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे सर्व खेळांच्या संघटनांसाठी आणल्या आहेत. परंतु बऱ्याच संघटनांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.

अखिल भारतीय कुस्ती महासंघाचा कारभार कशा पद्धतीने सुरु आहे याचा अनुभव तमाम भारतवासियांनी घेतला आहे. हे एक छोटेसे उदाहरण झाले. भारतीय खेळाडू मोक्याच्या क्षणी आणि दबावाखाली आपला खेळ उंचावत नाहीत. त्यासाठी भविष्यात त्यांना शारीरिक क्षमतेबरोबर मानसिकदृष्ट्यादेखील अधिक कणखर करण्याची गरज आहे.

सध्या सरकारी मदत आणि पुरस्कर्त्यांची मदत विविध खेळांच्या संघटनांना बऱ्यापैकी मिळते. पॅरिस ऑलिंपिकच्या खेळाडूंच्या तयारीसाठी तब्बल ५०० कोटी रुपये केंद्र सरकारने खर्च केले होते. त्यामुळे विविध खेळांच्या संघटनांनीच आपल्या खेळाडूंमध्ये तो विजेता कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेव्हा खेळाडू घडत असतो. तेव्हा त्याला योग्य सोयीसुविधा आणि आर्थिक मदत मिळणे गरजेचे असते. नेमकी हीच मदत अनेक खेळाडूंना सुरुवातीच्या काळात मिळाली नसल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. अगदी ताजे उदाहरण म्हणजे ऑलिंपिक कांस्य पदकविजेता महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या आई-वडिलांनी त्याच्या नेमबाजीच्या महागड्या साधनांसाठी आर्थिक मदतीसाठी वणवण केली होती. त्यामुळे ज्या युवा खेळाडूंमध्ये खरोखरच आपल्याला गुणवत्ता दिसते त्यांना त्याचवेळी भक्कम आर्थिक मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात भारताची पदकसंख्या वाढण्यासाठी खेळाडूंची संख्या आणि विविध खेळांची संख्या वाढणे आवश्यक आहे, तरच आपल्याला त्या स्पर्धात जास्त पदकांची आशा बाळगता येईल. यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय चमूने अवघ्या १६ स्पर्धांत भाग घेतला. ऑलिंपिकमध्ये यंदा एकूण ३२ खेळांचा समावेश होता. हुकलेली पदके पाहता भविष्यात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताची कामगिरी अधिक जोमाने होईल अशी आशा करूया.

Continue reading

पॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला सलाम

पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण २९ पदके मिळवून पदकतालिकेत १८वा क्रमांक मिळवला. गेल्या टोकियो स्पर्धेत भारताने १९ पदके...

‘जय’ हो!

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मैदानात आणि मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक शानदार विजय मिळवून स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्येदेखील महत्त्वाच्या पदावर अनेक भारतीयांनी स्थान...

लढवय्या सलामीवीर शिखर धवन!

भारताचा माजी डावखुरा लढवय्या सलामीवीर, ३८ वर्षीय शिखर धवनने अखेर आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघासाठी शिखरला दरवाजे बंद झाले होते. दुखापती, खराब फॉर्म आणि गिल-जयस्वाल या युवा सलामीच्या...
error: Content is protected !!
Skip to content