छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त यंदा प्रथमच आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईच्या जांबोरी मैदान येथे संपन्न झाले. सुरुवातीला लेझीमच्या गजरात राज्यपालांनी मशाल पेटवून महाकुंभाचे उदघाटन केले. राज्यपालांसमोर तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या महाकुंभाचे आयोजन महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत येथे पारंपरिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
या महाकुंभाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई व उपनगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, क्रीडा भारतीचे गणेश देवरुखकर तसेच मोठ्या संख्येने पारंपरिक क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
पंजाबमध्ये होत असलेल्या ‘किला रायपूर खेल महोत्सव’ अर्थात रूरल ऑलिम्पिकप्रमाणे महाराष्ट्रातील कबड्डी, खोखो, दांडपट्टा आदी पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेला क्रीडा महाकुंभ दरवर्षी भरवला जावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राला पारंपरिक खेळांची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तलवार युद्ध, घोडेस्वारी, भालाफेक व इतर क्रीडा प्रकारांमध्ये निपुण होते. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला चालना दिली. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले असे सांगून पारंपरिक क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र महोत्सव सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी राज्य शासन, महानगर पालिका व क्रीडा भारतीचे अभिनंदन केले.
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करताना मातृभाषा व मातृभूमी यांसह स्वदेशी खेळांना प्रोत्साहन द्यावे लागेल असे सांगून, कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांना पारंपरिक खेळांना चालना देण्याची आपण सूचना करू, असे ते म्हणाले. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक मोबाईल फोनचा अति वापर करताना दिसतात. समाजात मादक पदार्थांचा विळखा वाढत आहे. अशावेळी युवकांना पारंपरिक तसेच आधुनिक खेळांकडे प्रयत्नपूर्वक वळवले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
मराठमोळ्या खेळांचा समावेश असलेला पारंपरिक क्रीडा महाकुंभ आयोजित केल्याबद्दल मंगल प्रभात लोढा व क्रीडा भारती यांचे अभिनंदन करून लगोरी, फुगडी, कबड्डी, दोरीच्या उड्या हे पारंपरिक खेळ पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन केले जाईल व त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या स्पर्धांमधील विजेत्यांना चांगली बक्षिसे दिली जातील तसेच या स्पर्धांसोबत गडकिल्ल्यांचे प्रदर्शनदेखील भरवले जाईल असे त्यांनी सांगितले.