बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-४मध्ये, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरात प्रभाग ३४मध्ये चारकोप नाका (अथर्व महाविद्यालयजवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण व इतर संकीर्ण कामांचा लोकार्पण सोहळा उद्या, रविवारी (दिनांक ३ डिसेंबर २०२३) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, योगेश सागर, अमृता फडणवीस, खासदार हेमा मालिनी, अभिनेत्री जुही चावला, उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा सोहळा होत आहे. उद्या नियोजित सोहळ्यात, या उद्यानात २२०० चौरस मीटर जागेवर ८,८०० इतक्या संख्येने आणि विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, शिवण, साग, कडूनिम, जांभूळ, अर्जुन इत्यादी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, पारंपरिक पद्धतीने ६ जातीची १० ते १२ फूट उंचीची १,२०० झाडे संपूर्ण भूखंडाच्या संरक्षक भिंतीलगत लावण्यात येणार आहेत. त्यात करंज, बेहडा, बहावा, कदंब, सुरू, ताम्हण या झाडांचा समावेश असेल.