या वर्षीच्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धा बघत असताना एक बाब लक्षात आली की जेथे पदके दिली जात होती त्या जागी काही स्पर्धांमध्ये तीन व्यासपीठे निर्माण केली गेली होती. तेथे गर्दी थोडी अधिक होती. सहसा ऑलिम्पिक स्पर्धेत असे होत नाही. येथे मूळ दिल्या जाणाऱ्या तीन पदकांपैकी ज्या दिव्यांग खेळाडूला जे पदक मिळाले असेल त्यासोबतच एक पदक खेळाडूच्या मार्गदर्शकालाही (कोच) दिले जात होते.
या स्पर्धांमध्ये मार्गदर्शकालाही खेळाडूप्रमाणेच पदक का दिले जाते? याचे कारण म्हणजे हे मार्गदर्शक आपल्या खेळाडूसोबत प्रशिक्षणापासून स्पर्धेपर्यंत कायम असतात. या दिव्यांग खेळाडूंचे प्रशिक्षण किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी. कारण एका अंध खेळाडूला धावपटू आणि त्यातही विविध पातळीवर आपले सर्वोच्च यश संपादन करीत ऑलिम्पिकपर्यंत मजल मारणे हे सक्षम अशा मार्गदर्शकाशिवाय अशक्यप्राय अशी गोष्ट असते. त्यातच प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कोणत्याही स्पर्धेत भाग घेत असताना खेळाडूला दुखापतीपासून दूर ठेवणे तसेच एकापेक्षा एका कठीण स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी लागणारे सगळे गुण खेळाडूच्या अंगी बाणवणे हेदेखील काम मार्गदर्शकालाच करायचे असते.
कमी अंतराच्या धाव स्पर्धा किंवा दूर अंतराच्या मॅरॅथॉन या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी खेळाडूला मार्गदर्शन करावे लागते. मॅरॅथॉन ही रस्त्यावर धावण्याची आणि तब्बल २६.२ मैल अंतराची स्पर्धा असते. यात खेळाडूला अखेरच्या काही क्षणांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचा आत्मविश्वास वाढतो. (तो आधीपासून हळूहळू तयार केला जात असतोच). त्यांचे मार्गदर्शक स्पर्धेत सातत्याने त्यांच्यासोबत जोडलेले असतात. हीच गोष्ट कमीअधिक फरकाने फुटबॉलच्या खेळात दिसते. यावेळी चमूला गोलकीपर दिलेला असतो आणि तो मैदानाच्या आपल्या एक तृतीयांश भागात खेळाडूंना सूचना करू शकतो. सायकलस्वार स्पर्धकांच्यासाठी चांगले दिसू शकणारा मार्गदर्शक सोबत असतो. त्याला ‘पायलट’ म्हणतात. तो सायकलच्या समोरच्या भागावर बसून दिशा दाखवतो आणि दिव्यांग खेळाडू आपली ताकद वापरून शक्य तेवढ्या वेगाने सायकल दौडवीत असतो.
खेळाडूकडे असे स्पर्धात्मक कौशल्य घडून येण्यासाठी मार्गदर्शकाचा वेळ, त्याचे स्वत:चे आणि शिकवण्याचे कौशल्य आणि त्याग यांची महती अपार आहे आणि म्हणूनच पदक मिळवणाऱ्या खेळाडूसोबत त्याच्या मार्गदर्शकालाही त्याच तोलामोलाचे पदक प्रदान करणे हा त्याचा मोठा सन्मान असतो. पदकविजेत्या दिव्यांग खेळाडूसोबत मार्गदर्शकालाही पदकाने सन्मानित करण्याची पद्धत २०१२च्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेपासून सुरु झाली. कॅनडाच्या जेसन डंकर्ले यांच्या म्हणण्यानुसार, खरेतर दिव्यांग खेळाडूसाठी मार्गदर्शक मिळणे अतिशय कठीण असते, कारण त्यांचे प्रयत्न प्रचंड असतात आणि त्यामानाने त्यांना कधीच मानधन मिळत नाही. खेळाडूने उत्तम कामगिरी केली आणि त्याचे प्रयत्न सफल झाले तर आणि तरच त्यांना पदकाचा मान लाभतो.