सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या भव्यदिव्य मालिकेत भगवान श्रीराम (सुजय रेऊ) आणि लंकाधिपती रावण (निकितीन धीर) यांच्यातील युद्ध एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. कारण लक्ष्मणाने (बसंत भट्ट) इंद्रजीत (ऋषिराज पवार)चा वध केला आहे. आपल्या पुत्राचा अचेतन देह पाहून रावण उद्ध्वस्त झाला आहे आणि श्रीरामाविरुद्ध अंतिम युद्ध करण्यास तो सज्ज झाला आहे. युद्धावर जाण्यापूर्वी आपल्या मुलाच्या मृत्यूने पिसाटलेला रावण, श्रीरामावर विजय मिळवण्याच्या लालसेने आणखी शक्ती प्राप्त करण्यासाठी शिव पूजा आरंभतो.
दरम्यान, श्रीरामदेखील शक्ती उपासना करतात आणि महागौरीला आवाहन करतात. रावणाच्या ताकदीवर विजय मिळवण्यासाठी तिच्याकडून मार्गदर्शन आणि शक्तीचे वरदान मागतात. अशाप्रकारे सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील महासंग्रामाचे रणशिंग फुंकले आहे आणि दोन्ही पक्ष सुसज्ज आहेत.
सध्याच्या कथानकाबाबत श्रीरामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणतो की, “कथानकाने तीव्रतेची परिसीमा गाठली आहे. एकीकडे आपल्या पुत्राला गमावून शोकाकूल झालेला, बलशाली रावण श्रीरामाविरुद्ध लढण्यासाठी तयारी करत आहे. तर दुसरीकडे, सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी आतुर झालेले श्रीराम शक्ती पूजा करून नवीन सामर्थ्य मिळवत आहेत. या शेवटच्या अध्यायात राम आणि रावण दोघेही अंतिम लढाईसाठी सज्ज होत आहेत, दैवी पाठबळ मिळवत आहेत, तेव्हा प्रेक्षकांना विश्वास आणि सामर्थ्य यांची अंतिम कसोटी बघता येईल.