Saturday, July 27, 2024
Homeमाय व्हॉईसमी साक्षीदार आहे,...

मी साक्षीदार आहे, गुन्हेगार नाही!

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या चौकशीत आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची त्यांनी काढलेल्या व्हिपवर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे भंडावून गेलेले प्रभू यांनी आपण साक्षीदार असून गुन्हेगार नाही, असे स्पष्ट केले तर एकूणच प्रक्रियेची गती पाहता दोन्ही बाजूंच्या वकिलांपुढे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे कळते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावार आज दुसऱ्या दिवशी शिंदे गटाचे वकील जेठलमानी यांनी सुनील प्रभू यांची फेरसाक्ष घेतली. चौकशीची वेळ संपत आली पण साक्ष नोंदवण्याचे काम अपूर्णच राहिले. जेठमलानी यांनी प्रभू यांना व्हिपशी संबंधित घडामोडींवर अनेक प्रश्न विचारले. काही उत्तरांवर जेठमलानी यांनी आक्षेपही घेतला. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि जेठमलानी यांच्यात खडाजंगी झाली. जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांवरुन प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अशा प्रश्नांपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केल्याचे समजते.

सुनावणीत साक्षीसाठी काय रेकॉर्डवर घेतले जात आहे हे दिसण्यासाठी नवीन स्क्रीन लावण्यात आला आहे. काल इंग्रजी भाषेतील याचिकेवरून उपस्थित झालेल्या मुद्द्यानंतर आजपासून तेथे एका भाषांतरकाराचीही नेमणूक करण्यात आली.

व्हिपच्या मुद्द्यावरून जेठमलानी आणि प्रभू यांच्यात झालेला संवाद थोडक्यात अशा स्वरूपाचा होता, असे समजते…

जेठमलानी: 21 जून 2022चे पत्र कोणाच्या अधिकारात देण्यात आले?

प्रभू: विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवायची होती. विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाला होता. काही आमदारांचा थांगपत्ता लागत नव्हता. ते संपर्कात नव्हते म्हणून हे पत्र देण्यात आले. प्रतोद म्हणून मी या बैठकीचा व्हिप दिला होता.

जेठमलानी: आपण हा व्हिप स्वतःच्या अधिकारात काढला का?

प्रभू: विधान परिषद निवडणुकीत झालेल्या मतविभाजनानंतर शिवसेनेचे काही आमदार मिसिंग होते. त्यामुळे ही बैठक पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार बोलावली होती आणि त्यामुळे प्रतोद म्हणून मी व्हिप बजावला.

जेठमलानी: पक्षप्रमुखांनी आपल्याला लिखित स्वरूपात सूचना केली होती का?

प्रभू: ते रेकॉर्डवर आहे. मला आठवत नाही लिखित सूचना दिली होती की नाही.

जेठमलानी: आपण गोल गोल फिरवू नका. लिखित सूचना केल्या की नाही?

प्रभू: मी काही गुन्हेगार नाही, साक्षीदार आहे. अशा बैठका जेव्हा तातडीने बोलवल्या जातात, तेव्हा टेलीफोनिक आदेश दिले जातात.

जेठमलानी: जेव्हा ही सूचना तुम्हाला मिळाली तेव्हा तुम्ही कुठे होता?

प्रभू: तेव्हा मी विधानभवनात होतो. पक्ष कार्यालयात आमदार मिसिंगच्या बातम्या येत होत्या. तेव्हा तातडीची बैठक बोलवा असा पक्षाप्रमुखांचा फोन होता.

जेठमलानी: विधानपरिषद मतमोजणीची तारीख काय होती?

प्रभू: मला ही तारीख आठवत नाही, ती रेकॉर्डवर आहे. माझ्या माहितीनुसार 20 तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजता पुन्हा मतमोजणी झाली होती. त्यामुळे उशिर झाला असे मला वाटते.

जेठमलानी: आपण कोणत्या वेळी व्हिप बजावला हे आठवते का?

प्रभू: मतमोजणीनंतर मतविभाजन कुठे झाले हे कागदावर मांडत चर्चा करत होतो. यामध्ये एक-दीड तास गेला. माझ्या माहितीप्रमाणे रात्री साडेदहा किंवा साडे 11 वाजण्याच्या दरम्यान  मी व्हिप बजावला.

साक्षीदार

जेठमलानी: तुमच्यासोबत आमदार कोण होते जेव्हा तुम्ही व्हिप जारी केला?

प्रभू: हे रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी: सगळ्यावर हेच उत्तर हे देत आहेत..

अध्यक्ष: तुम्ही प्रतिज्ञापत्र जरी दिले असले आणि हे रेकॉर्डवर जरी असले तरी या प्रतिज्ञापत्राची शहानिशा करण्यासाठी साक्ष, उलटसाक्ष नोंद करत आहोत.

प्रभू: व्हिप बजावला त्यावेळी कोण आमदार सोबत होते हे आठवत नाही.

देवदत्त कामत (ठाकरे गटाचे वकील): यावर आम्ही आक्षेप घेतो. प्रतिज्ञापत्रात लिहिलेले  तुम्हाला जर आठवत नसेल तर तुमची स्मरणशक्ती तपासली जात आहे का?

जेठमलानीः प्रभू स्वतः आधीच म्हणाले आहेत की प्रतिज्ञापत्रात जे लिहिले तेच मी येथे बोलणार आहे. आपण आपले प्रतिज्ञापत्र दाखवा आणि त्यातून सोबत आमदार कोण होते ते सांगा.

अध्यक्ष: तुम्ही एवढा उत्तर देताना बॅकग्राउंड सांगू नका. स्पेसिफिक उत्तर द्या.

प्रभू: मला उशिर का लागला हे सांगायचे आहे. जे आमदार संपर्कात येत होते त्यांना व्हिप देण्यास सुरुवात केली होती. त्यात रात्री जवळपास 12 वाजले.

जेठमलानी: तुम्ही म्हणत आहात की व्हिप 20 तारखेला दिला म्हणजे 20 तारखेला रात्री बजावला. पण त्यावर 21 जून तारीख नोंदवली आहे. हे खरे का?

प्रभू: व्हिप जारी केला तेव्हा रात्री साडेअकरा-बारा वाजले होते. त्यामुळे मी व्हिपवर 21 जूनची तारीख टाकली.

जेठमलानी: तुम्ही व्हिप कशाप्रकारे बजावला?

प्रभू: माझ्यासोबत जे आमदार उपस्थित होते त्यांना तत्काळ दिला. जे आमदारनिवासला होते त्यांना व्हिप पाठवून सुपूर्द केला. परंतु जे ट्रेस होत नव्हते त्यांना व्हाटसअॅपवर पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता.

अध्यक्ष: जास्त वेळ जाऊ नये म्हणून तुम्ही स्पेसिफिक उत्तर द्या आणि तसे प्रश्न विचारा.

जेठमलानी: 20 तारखेला तुम्ही ज्या आमदारांना व्हिप दिला त्यांच्याकडून लिखित पोहोच घेतली का?

प्रभू: ज्यांना प्रत्यक्ष व्हिप दिला त्यांची लेखी पोहोच माझ्याकडे आहे.

जेठमलानी: 20 जूनला आपण व्हिप दिला आणि लिखित पोहोच घेतली असे म्हणता पण त्याचे पुरावे नाहीत. पक्षप्रमुखांनी त्यावेळी सर्व आमदारांना नोटीस पाठवा सांगितले की व्हिप पाठवा?

प्रभू: पक्षप्रमुखांनी मला सांगितले की आमदारांची तातडीची बैठक लावा आणि त्यासाठी व्हिप जारी करा.

दुपारच्या सत्रात पुन्हा सुनील प्रभूंची उलटतपासणी सुरू करण्यात आली.

जेठमलानीः 21 जूनला जारी केलेल्या व्हिपवर आपली स्वाक्षरी आहे का? 21 जूनला जारी केलेल्या व्हिपवर केलेली स्वाक्षरी आणि प्रतिज्ञापत्रावर केलेली स्वाक्षरी वेगळी दिसते. आपल्या दोन स्वाक्षरी आहेत का?

प्रभूः हो, माझ्या दोन सह्या आहेत.

जेठमलानीः  21 जून 2022 आधी आपण किती लिखित व्हीप जारी केले आहेत?

प्रभूः मला जे स्मरणात आहे त्यानुसार या कार्यकाळात दोन निवडणुका लागल्या एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची. दोन्ही निवडणुकीचे व्हिप मी जारी केले आहेत.

जेठमलानीः 20 जूनला झालेल्या सर्व शिवसेना आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले होते का?

प्रभूः सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते.

जेठमलानीः जर 20 जूनला सर्व शिवसेना विधानसभा आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान केले तर कोणते आमदार मिसिंग होते?

प्रभूः सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या की शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर बऱ्याच आमदारांचे फोन बंद होते.

जेठमलानीः कुठले आमदार मिसिंग होते?

अध्यक्षः तुम्ही मिसिंग झालेले आमदार कोण होते ते सांगा असा प्रश्न त्यांनी विचारला.. तुम्ही म्हणत आहात की आमदार मिसिंगच्या बातम्या कानावर येत होत्या.

प्रभूः मी ज्यांना हातोहात व्हिप द्यायला लावले ते मुंबईत उपस्थित होते. ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते. रात्रीपासून बैठकीपर्यंत मी व्हिप देण्याचा प्रयत्न करत होतो.

जेठमलानीः मला मिसिंग आमदारांची नावे सांगा.

प्रभूः जे 21 तारखेच्या बैठकीला गैरहजर होते ते आमदार मिसिंग होते. बैठकीनंतरसुद्धा आम्ही दोन-अडीच तास वाट पाहिली. तरी ते आले नाहीत.

अध्यक्षः ज्या गतीने सुनावणी सुरू आहे ती फार संथ आहे. फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणीसाठी आहेत. त्यात सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे. जेठमलानी यांनी विचारल्याप्रमाणे तुम्ही मिसिंग आमदारांची नावे सांगा.

जेठमलानीः मी तुम्हाला सांगतो की कथित जारी करण्यात आलेला 20 जूनचा मूळ व्हिप आपल्याकडून तयार करण्यात आला नव्हता. यावर आपले काय म्हणणे आहे?

प्रभूः हे पूर्णपणे चुकीचे आहे.

जेठमलानीः जेव्हा तुम्ही मूळ व्हिप पाठवता तेव्हा त्याच्यावर पाठवणाऱ्या सदस्याचे नाव नसते का?

प्रभूः पाठविणाऱ्याचे नाव नसते, पक्षादेश असतो…

उद्या पुन्हा पुढची सुनावणी होणार आहे.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!