पोलीस खात्यातील विशेषतः गुन्हा अन्व्हेषण भागातील पोलीस हवालदारांची गुन्हेगारांविषयीची माहिती शब्दबद्ध करणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी नुकतेच केले. पोलीस खात्यातील हवालदारांकडे असलेल्या गुन्हा उकलीच्या माहितीचे संकलन करणे गरजेचे असल्याचे सांगून संबंधित गुन्ह्यातील गुन्हेगारांबाबत तसेच त्यांच्या कार्यपद्धतीविषयी हवालदारांचा अभ्यास दांडगा असतो असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
नवी मुंबईच्या वाशी येथील क्रीडासंकुलात ‘पोलीस मन’ या अजित देशमुख लिखित पुस्तकाचे प्रकाशन करताना शिवानंदन बोलत होते. सुटीचा दिवस असूनही व प्रकाशनस्थळ काहीसे आडवाटेचे होते तरीही क्रीडा संकुलाचा हॉल गच्च भरलेला होता. ‘पोलीस मन’चे लेखक अजित देशमुख अप्पर पोलीस उपायुक्तपदावरून निवृत्त झालेले अधिकारी असल्याने अनेक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच हवालदार या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते.
देशमुख यांनी आपल्या 35 वर्षे सेवेतील सर्वात जास्त काळ मुंबई गुन्हा अन्व्हेषण खात्यात कार्यरत केल्याने अनेक जुने अधिकारी यावेळी उपस्थित होते. राजन काटदरे, राजू जोशी, विलास मराठे, एन ए चौगुले, वसंत ताजणे, अंगद देवकाते, सतीश शिंगटे, अरुण वाबळे, संजू जॉन आदी अनेक अधिकाऱ्यांना यावेळी अनेक वर्षांनी पाहिले. आश्चर्य म्हणजे अनेक अधिकारी अजूनही फिट होते. अजित देशमुख माजी पोलीस आयुक्त रामदेव त्यागी यांच्याकडे सहाय्यक असल्यापासून त्यांच्याशी अनेकांचा दोस्ताना आहे.
पोलीस खात्यात प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी नियमावली असते असे स्पष्ट करून देशमुख म्हणाले की, पोलिसांना जो समाज दिसतो तो जनसामान्यांना दिसत नाही. म्हणूनच गुन्ह्यांची उकल करताना दमछाक होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आपल्याला सहकारी उत्तम मिळाले. ड्युटी ऑफिसर म्हणून पोलीस अधिकाऱ्याच्या वाटेला काय येते याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. मानवी मनाचे विविध कंगोरे समोर दिसत असूनही तपासावर यांचा काहीही परिणाम होऊ द्यायचा नसतो हे या पुस्तकात बिंबवले गेले आहे.
सुंदर पुस्तक – शिवानंदन
पोलीस मन, हे देशमुख यांनी लिहिलेले पुस्तक सुंदरच असल्याचे सांगून शिवानंदन यांनी आपले बहुतांश भाषण मराठीतूनच केले. या पुस्तकात मला कुठेही ‘अहं’पणा दिसून आला नाही हे विशेष आहे. नाहीतर पोलीस अधिकाऱ्यांच्या हल्लीच्या पुस्तकात ‘मी हे केले’चा घोष सतत जाणवत असतो, असा टोलाही त्यांनी हाणला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्या कार्यकाळातील अनुभव शब्दबद्ध करायला हवेत असा आग्रह ही त्यांनी केला
याप्रसंगी कवी प्रमोद जोशी, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे व धनश्री लेले यांची ही भाषणे झाली.