Thursday, November 21, 2024
Homeमाय व्हॉईसश्रीलंका क्रिकेट संघासाठी...

श्रीलंका क्रिकेट संघासाठी पुन्हा “अच्छे दिन”!

एका जमान्यात क्रिकेट विश्वात धोकादायक संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघासाठी पुन्हा एकदा “अच्छे दिन” सुरु झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या तीन-चार महिन्यांच्या अवधीत श्रीलंकेच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. इंग्लंड क्रिकेट दौऱ्यात पहिल्या दोन कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतरदेखील तिसरी कसोटी जिंकून श्रीलंकेने आपला लढाऊ बाणा दाखवून दिला आहे. तब्बल १० वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर इंग्लंडमध्ये इंग्लंडला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का देण्यात श्रीलंकन संघाला यश आले. या दौऱ्यानंतर मायदेशी झालेल्या भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत माजी विश्वविजेत्यांना पराभूत करण्याचा पराक्रम श्रीलंकन संघाने करुन दाखविला. या विजयामुळे श्रीलंकन खेळाडूंचे मनोधैर्य निश्चितच उंचावले.

वन डे मालिकेनंतर नुकत्याच झालेल्या न्युझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने पाहुण्यांना पराभूत करण्याची किमया करुन दाखवली. तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर श्रीलंकेने पुन्हा एकदा न्युझीलंडविरुद्ध मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या अगोदर २००९मध्ये श्रीलंकेने न्युझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती. न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेने ६३ धावांनी विजय मिळविला. शतकी खेळी करणारा कामांडू मेंडीस आणि अर्धशतकी खेळी करणारे कुशल मेंडीस, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडीमल, अँजेलो मॅथ्युज यांनी फलंदाजीत सुरेख चमक दाखवली. प्रभात जयसुर्याच्या शानदार फिरकी माऱ्यासमोर न्युझीलंडच्या फलंदाजीला वेसण घातली. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेऊन न्युझीलंडची दाणादाण उडवली. पहिल्या डावात लैथम, विल्यमसन, मिचेल यांनी अर्थशतके फटकावून न्युझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डावात त्याचा युवा फलंदाज रचिन रवींद्रने १२ धावांची झुंजार खेळी केली. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. १ बळी घेणाऱ्या प्रभात जयसुर्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने १ डाव १५४ धावांनी आरामात जिंकून मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या कसोटीत बऱ्यापैकी झुंज देणाऱ्या न्युझीलंडकडून दुसऱ्या कसोटीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु फिरकी गोलंदाज निशान पेईरिस, प्रभात जयसुर्या यांच्या सुरेख फिरकी माऱ्यासमोर न्युझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. श्रीलंकेने पहिल्या डावात ६०२ धावांचा डोंगर रचला. कामांडू मेंडीस, दिनेश चंडीमल, कुशल मेंडीरा यांनी दमदार शतके फटकवल्यामुळेच श्रीलंकेला ६०० धावांचा टप्पा पार करता आला. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील या मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना न्युझीलंडचा पहिला डाव अवघ्या ८८ धावांतच आटोपला. येथेच दुसऱ्या सामन्यात त्यांचा पराजय निश्चित झाला. दुसऱ्या डावात न्युझीलंडने चांगली फलंदाजी केली. परंतु तोपर्यंत सामन्यावरील त्यांची पकड ढिली पडली होती. निशांनने पदार्पणातच ९ बळी घेण्याचा पराक्रम केला. श्रीलंकेतर्फे पदार्पणात निशांनने ही तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली. या अगोदर प्रवीण जयविक्रमाने बांगलादेश विरुद्ध ११ आणि प्रभात जयसुर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२ बळी आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात घेतले होते. त्याला जयसुर्याने तब्बल ११ बळी घेऊन जबरदस्त साथ दिली.

जयसुर्याने अवघ्या दोन कसोटीत १८ बळी घेऊन न्युझीलंड फलंदाजी मोडीत काढली. आता या विजयामुळे टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिकेत श्रीलंकेने भारत, ऑस्ट्रेलियापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली तर माजी जग्गजेता न्युझीलंड संघाची ७व्या क्रमांकावर घसरण झाली. यंदाच्या वर्षात श्रीलंकेने ६ कसोटी सामन्यांत आतापर्यंत विजय मिळविला. केवळ तिसऱ्यांदा असा पराक्रम श्रीलंकेला करता आला. या अगोदर २००१ आणि २००६मध्ये श्रीलकेने ६ कसोटी सामने जिंकले होते. कामांडू मेंडीस हा त्यांचा युवा फलंदाज सध्या चांगलात फॉर्मात आहे. त्याने ८ कसोटीत ५ शतके फटकावली. तसेच त्याने झटपट एक हजार धावा पूर्ण करणारा म्हणून तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा मान मिळवला. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर कसोटीत सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आजदेखील कायम आहे. १८ बळी घेणारा जयसुर्या मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भावी काळात मेंडीस आणि जयसूर्या या दोन युवा खेळाडूंकडून श्रीलंकन संघ मोठ्या अपेक्षा बाळगून असेल.

जुलै महिन्यात महेला जयवर्धने याच्याकडून श्रीलंकेचे माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सनथ जयसुर्या यांनी अंतरिम प्रशिक्षक म्हणून संघाची सूत्रे हाती घेतली. जयवर्धने प्रशिक्षक असताना वन डे आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी सुमार झाली. त्यामुळेच शेवटी जयवर्धने यांना श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने नारळ दिला. जयसुर्या यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर त्यांनी श्रीलंकन संघात पुन्हा एकदा जान फुंकली. खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे काही महिन्यांतच श्रीलंकेच्या कामगिरीत सुधारणा दिसू लागली. जयसुर्या यांचा मोठा अनुभव कामी आला. त्यामुळे आता त्यांची मुदत वर्षभरासाठी वाढविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. जयसुर्या पुन्हा एकदा श्रीलंकेन क्रिकेट संघाला नवी झळाळी प्राप्त करून देतील, अशीच आशा क्रिकेटप्रेमी करत असतील. आता येणाऱ्या मालिकांमध्ये श्रीलंकन संघ अशीच सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखून आपली विजयी दौड चालूच ठेवेल, अशी आशा करायला हरकत नाही.

Continue reading

श्री गणेश आखाड्यात तयार होत आहेत उद्याचे पहेलवान!

भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात उद्याचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मीरा-भाईंदर परिसर आता खूपच गजबजलेला आहे. तेथे आता इतर भाषिकांची मोठी संख्या...

क्ले कोर्ट किंग, स्पेनचा डावखुरा टेनिसपटू नादाल!

स्पेनचा महान डावखुरा ३८ वर्षीय टेनिसपटू राफेल नादालने दोन दशके टेनिस कोर्टवर अनभिक्षित सम्राटाप्रमाणे राज्य केल्यानंतर वाढते वय आणि दुखापतीमुळे अखेर आपली टेनिस रॅकेट म्यान केली. आपल्या जबरदस्त आक्रमक खेळाची मोहोर नादालने टेनिस कोर्टवर उमटवून साऱ्या टेनिसविश्वाला आपल्या खेळाची...

न्युझीलंडची कमाल! भारताची वाट खडतर!!

दुबईत झालेल्या महिल्यांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडने प्रथमच विजेतेपद पटकावून महिलांच्या क्रिकेट विश्वात धमाका उडवून दिला. आता भारतभूमित आलेल्या त्यांच्या पुरुष संघाने तब्बल ६९ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर यजमान भारतीय संघाला पराभूत करुन मोठीच खळबळ माजवली. १९५५पासून न्युझीलंड संघ...
Skip to content