भारतीय मोबाईल क्रमांक असल्याचे भासवून परदेशातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना चाप लावण्याकरीता भारतीय दूरसंचार विभागाने असे परदेशी कॉल ग्राहकापर्यंत पोहोचू न देण्यासाठी विशिष्ट प्रणाली तयार केली आहे. दूरसंचार प्रदात्यांनी या प्रणालीचा योग्य तो वापर करावा, असे निर्देशही दूरसंचार विभागाने दिले आहेत.
भारतीय मोबाईल क्रमांक दिसेल अशाप्रकारे भ्रष्ट नक्कल केलेले आंतरराष्ट्रीय फोन कॉल भारतीय नागरिकांना करुन काही घोटाळेबाज, सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक घडवून आणत असल्याचे प्रकार सध्या उघड होत आहेत. हे कॉल्स भारतातून आलेले भासतात. मात्र ते कॉलिंग लाईन आयडेंटिटी (CLI) या फोन करणाऱ्याची ओळख पटवणाऱ्या तांत्रिक यंत्रणेमध्ये फेरफार करून परदेशातील सायबर गुन्हेगारांनी केलेले असतात. बनावट डिजिटल अटक (अधिकाऱ्यांच्या बनावट आवाजाद्वारे कायद्याचा धाक), FedEx घोटाळे, कुरिअरमधील औषधे/अंमली पदार्थ, सरकारी आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत केलेली तोतयेगिरी, दूरसंचार विभाग/ट्राय अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनी क्रमांक खंडीत करणे अशा प्रकरणांमध्ये अशा आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉलचा गैरवापर झाल्याचे आढळून आले आहे.
अशा स्वरूपाची फसवणूक टाळण्यासाठी दूरसंचार विभाग आणि दूरसंचार सेवा प्रदाते यांनी, असे येणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉल्स ओळखून ते भारतीय दूरसंचार ग्राहकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून ते रोखण्यासाठी एक प्रणाली तयार केली आहे. आता असे येणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉल्स रोखण्याचे निर्देश, दूरसंचार सेवा प्रदात्यांना जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार सेवा विभागाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, भारतीय लँडलाइन क्रमांक दाखवणारे आंतरराष्ट्रीय स्पूफ्ड कॉल्स, दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे आधीच रोखले (ब्लॉक) जात आहेत.
वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा हा डिजिटल इंडियाच्या दूरदृष्टीचा अविभाज्य भाग असल्याने, दूरसंचार वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी दूरसंचार विभागाने (https://sancharsaathi.gov.in/) या नागरिक केंद्रित संचार साथी पोर्टलसह अनेक पावले उचलली आहेत. फसवणूकीचे असे प्रकार रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करूनही, इतर मार्गांनी फसवणूक करणारे काही घोटाळेबाज अजूनही असूच शकतात. अशा कॉल्सबाबत, तुम्ही संचार साथी पोर्टलवर उपलब्ध चक्षू सुविधेवर अशा संशयित फसवणुकीच्या कॉल्सची तक्रार करून सर्वांना मदत करू शकता, असे आवाहन दूरसंचार विभागाने केले आहे.