‘एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन’ अशी एकेरी भाषा करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर मुक्कामी भेटले. शिवसेना फोडल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रचंड तिरस्कार करणारे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अचानक परिवर्तन कसे झाले? अशी चर्चा आता संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांतून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक तर तू राहशील किंवा मी राहीन असे आव्हान दिले होते. परंतु निवडणूक निकालावरून देवेंद्र फडणवीस हे राहिले आहेत. पुढे आपल्या शिवसेनेचे काय होणार याची चिंता आता उद्धव ठाकरेंना लागली आहे. त्यातूनच आता त्यांनी पुन्हा प्रखर हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंच्या कुणीतरी सल्लागाराने हिंदू मते तुमच्यापासून दूर जात आहेत असा सल्ला दिला आहे. मात्र मुस्लिम मतांमुळे लोकसभेत तुम्ही नऊ जागापर्यंत बाजी मारू शकलात हे मात्र या सल्लागाराने सांगितलेले नाही. त्याचप्रमाणे विधानसभेत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भांडून घेतलेल्या जागा का पडल्या याचे विश्लेषणही या सल्लागाराने उद्धव ठाकरे यांना करून दिलेले नाही. परंतु वारंवार भूमिका बदलल्याने असलेला मतदारही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दूर जाईल आणि भाजपवाले ज्याप्रमाणे शिल्लक सेना असा शिवसेनेचा उल्लेख करतात तो खरा ठरेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचे आमंत्रण ठोकारुन देणारे उद्धव ठाकरे अचानक त्यांना का भेटले? याची अनेक कारणे आहेत. या भेटीसाठी पुढाकार उद्धव ठाकरे यांचे अतिमहत्त्वाकांक्षी पीए आमदार मिलिंद नार्वेकर कारणीभूत आहेत. पायउतार झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांचे संबंध अतिशय चांगले होते. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील त्यांची कोणतीही कामे अडत नसत. परंतु आता फडणवीस यांनी आपल्याला सहकार्य करावे यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ही भेट घडवून आणली. मिलिंद नार्वेकर हे विधान परिषद सदस्य असल्याने त्यांची मुख्यमंत्री कार्यालयातील काही ‘समाजोपयोगी’ तशीच आर्थिक हितसंबंधाची कामे अडू नयेत यासाठीच त्यांनी ही भेट घडवून आणली. सामान्य शिवसैनिक लालबाग-परळमधून बदलापूर-अंबरनाथला गेले. मात्र मिलिंद नार्वेकर मालाडमधून पाली हिल येथे राहण्यास कसे गेले हे समस्त शिवसैनिकांना, नेत्यांना माहित आहे.
या भेटीनंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ‘एकला चलो’च्या घोषणाही सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला शरण जाणे हे हिंदू मतदारांना त्याचबरोबर सामान्य शिवसैनिकांना पटलेले नाही. परंतु लोकसभेच्या निकालामुळे आता आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार या स्वप्नात उद्धव ठाकरे होते. मात्र त्यांचा आता स्वप्नभंग झाला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपशिवाय उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढल्यास त्यांचा कार्यक्रम 25 जागांमध्येच आटोपेल. भाजपचा शिवसेना फोडून पुन्हा सत्तेत येण्याचा उद्देश साध्य झाला आहे. त्यामुळे पुन्हा ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेतील असे सध्यातरी चित्र नाही. मात्र उद्धव ठाकरे यांची ही धरसोड वृत्ती त्यांचा घात करणार आहे.
डीसीएम ते हार्डबार्गेनर
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन खाती मिळाल्यानंतर त्यांचे वर्णन आता हार्डबार्गेनर असे केले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी पेरलेल्या बातम्यांचा हा एक भाग आहे. यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी हा प्रयोग केला. परंतु तो त्यांच्या अंगाशी आला. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ नये यासाठी भाजप नेत्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळेच खातेवाटप अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या रात्री झाले. अखेर एकनाथ शिंदे यांना नगरविकास खाते देण्याचा निरोप दिल्लीहून आला. त्याचबरोबर गृहनिर्माण हे महत्त्वाचे खाते शिंदे यांनी आपल्या कोणत्या सहकाऱ्यांना न देता स्वतःकडेच ठेवले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप करताना आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना धक्का दिला आहेच, मात्र याचबरोबर गिरीश महाजन यांच्यासारख्या मित्रालाही धक्का बसला आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खातं काढून घेत चंद्रशेखर बावनकुळे या आपल्या विश्वासू सहकाऱ्याला दिले आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यांचे खाते विदर्भातील आदिवासी आमदार अशोक उईके यांना देण्यात आले आहे. गिरीश महाजन यांच्याकडील ग्रामविकास आणि पर्यटन ही दोन खाती काढून घेण्यात आली आहेत. मात्र त्यांच्याकडे जलसंपदा (विदर्भ तापी व कोकण खोरे) हे निम्मे खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निम्मे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे) खाते देण्यात आले आहे. ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते जयकुमार गोरे या नवख्या मंत्र्याकडे देण्यात आले आहे. शिवसेनेचे एक्साईज हे महत्त्वाचे खाते काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडेच ठेवले आहे.
शिवसेनेच्या वाट्याला फक्त नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती आली आहेत. ही दोन्ही क्रीम खाती शिंदे यांनी कोणत्याही सहकाऱ्याला न देता स्वतःकडेच ठेवली आहेत. भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्री केले असले तरी त्यांच्याकडे रोहयो, फलोत्पादन आणि खारभूमी ही खाती देण्यात आली आहेत. दुसरे वाचाळ सहकारी संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. या खात्यावर ते वेगळा ठसा उमटवतात का? की, फक्त वाचाळपणा करतात हे काळच ठरवेल.
मुंबईतील दोन्ही मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य, रोजगार ही खाती देण्यात आली आहेत तर आशिष शेलार यांना माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य ही खाती देण्यात आली आहेत. आशिष शेलार मंत्री होऊ नयेत यासाठी राज्यातून खूप प्रयत्न झाले. परंतु दिल्लीच्या आशीर्वादाने त्यांचे नाव यादीत आले. राज्यमंत्र्यांमध्ये रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास, औषध प्रशासन आदी महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. महिलांपैकी माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास या खात्यासारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. हे खातेवाटप फडणवीस सरकारच्या कामगिरीचा आलेख कितपत उंचावते हे पाहयला हवे..