मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या, रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता नुपूर गाडगीळ यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना तबल्याची साथ करतील कौस्तुभ दिवेकर आणि संवादिनीची साथ अनिरुद्ध गोसावी करणार आहेत. हा कार्यक्रम कै. य. वि. आणि कै. सुधाताई भातखंडे यांच्या सहाय्याने आयोजित केला असून केंद्रातर्फे सर्व रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नुपूर गाडगीळ ग्वाल्हेर-आग्रा-जयपूर घराण्याच्या गायिका असून त्या गेली २० वर्षे पं. मधुकर गजाननराव जोशी यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेत आहेत. त्या हिंदुस्थानी कंठ संगीतात एसएनडीटी विद्यापीठातून पदव्युत्तर स्नातक असून अ. भा. गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी संगीत अलंकार ही पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यांनी नाट्यसंगीताचे मार्गदर्शन शुभदा आणि श्रीकांत दादरकर तसेच रामदास कामत, अरविंद पिळगावकर, रजनी जोशी यांच्याकडून घेतलं आहे. त्यांना ठाणे भूषण पं. राम मराठे पुरस्कार, पं. रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, युवा चैतन्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.