एकीकडे मोबाईल फोनने क्रांती करायला सुरुवात केली आणि शहरात तर उंच इमारतींवर मोबाईल संवाद चांगला पोहोचावा यासाठी आवश्यक असे मोबाईल टॉवर दिसायला सुरुवात झाली. मोबाईल आले तेव्हाच लोकांच्या मनात त्यामुळे होणारे उत्सर्जन आणि त्याचे दुष्परिणाम यावर चर्चा घडू लागल्या होत्या. उत्सर्जन ही एक प्रकारची बाधा अथवा संसर्ग. वास्तविक बघता मोबाईलमधून होणारे उत्सर्जन काही परिस्थितीतच त्रासदायक ठरू शकते. यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपल्याकडील मोबाईलमध्ये संवादलहरी मिळवण्यासाठी एक अँटेना असतोच आणि तो आपण उपयोगात आणत नसलो तरीही आपण कायम सर्वात जवळच्या मोबाईल टॉवरशी संपर्कात असतो. मोबाईलच्या जवळ असलेले शरीराचे भाग हे उत्सर्जन प्राप्त करतात आणि उर्जा शोषून घेत असतात.

संशोधन संस्था असे सांगतात की, मोबाईलचे उत्सर्जन कोणतीही जोखीम वाढवत नाही. ही उर्जा कमी स्तरावरील विद्युतचुंबकीय लहरींच्या स्वरूपात असली तरीही आपण मोठ्या फाईल पाठवत असू तेव्हा शक्यतो मोबाईल फोन डोके आणि शरीर यापासून दूर ठेवणे चांगले. मोबाईल फोन पाठीवरील बॅकपॅकमध्ये, ब्रीफकेस अथवा पर्समध्ये ठेवण्याची काळजी घ्यावी. मोबाईल फोन शर्ट अथवा पँटच्या खिशात ठेवू नये, कारण अधिक कंपनसंख्येची उर्जा कायम आपल्या आणि मोबाईलच्या भोवती असते. अलीकडच्या काळात जगातील मोबाईलधारकांची संख्या इतक्या झपाट्याने वाढली की, अगोदरचे मोबाईल तंत्रज्ञान आवश्यक त्या गतीने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्या काळात ३जी तंत्रज्ञान होते. या ‘जी’चा अर्थ पिढी असा असतो. ही या तंत्रज्ञानाची तिसरी पिढी होती. तिचे काम कमी पडू लागल्यावर ४जी हे पूर्वीपेक्षा अधिक गतीचे तंत्रज्ञान आणले गेले. यात अधिक ग्राहक जोडले जाऊ शकत होते. त्यानंतर आलेल्या ५जीमध्ये आणखी एक नाविन्य आणले गेले. पूर्वीचे तंत्रज्ञान एखाद्या मोठ्या दिव्याचा प्रकाश सर्वदूर पसरावा तसे होते. ५जीमध्ये लहरी या सगळीकडे जाण्याऐवजी ग्राहकांवर केंद्रित होतील, अशी व्यवस्था केली गेली आहे. त्यामधूनच संवाद पोहोचण्याची गती आणखी वाढली आहे.

मोबाईल फोनमुळे होणाऱ्या उत्सर्जनाचा विचार केला तर असे दिसते की, शहरांमध्ये मोबाईल फोनच्या टॉवर्सची संख्या भरपूर असते आणि तरीही आपली उत्सर्जनाची बाधा कमी असते. याचे कारण नव्याने आलेले ५जी तंत्रज्ञान आहे. ही प्रक्रिया शहरी आणि ग्रामीण भागामधील विद्युत-चुंबकीय लहरींचे वातावरण बदलण्याचे काम करीत आहे. युरोपमध्ये सर्वात अगोदर ५जी तंत्रज्ञान वापरणारा देश स्वित्झर्लंड होता आणि त्यांनी मानवावर या उत्सर्जनाच्या परिणामाचा अभ्यास केला. अत्याधुनिक अशा अँटेनापद्धती पूर्वीपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे संदेश थेट मोबाईलग्राहकाच्या उपकरणावरच पोहोचतील अशा केंद्रितयंत्रणा यात आहेत. नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी संपूर्ण व्यासपीठ प्रकाशाने उजळून टाकण्याऐवजी नेमक्या कलाकारावर प्रकाशझोत टाकला जावा तसे हे आहे. त्यातून उद्भवलेली एक बाब म्हणजे शहरात ग्राहककेंद्रित संदेश असल्याने उत्सर्जनबाधा कमी असते. परंतु ग्रामीण क्षेत्रात मात्र अजूनही ४जी तंत्रज्ञान असल्यामुळे तेथे संपूर्ण क्षेत्रात उत्सर्जनबाधा होते आणि ती टॉवर कमी असलेतरी शहरापेक्षा अधिक असते. आपले मोबाईल फोनदेखील उत्सर्जन करीत असतातच. त्यांना रेडिओफ्रिक्वेन्सी उर्जा म्हणतात. साध्या अथवा स्मार्ट फोन मोबाईलमधील अँटेना हेच उत्सर्जन करतात. आपल्या शरीराचे डोके अथवा अँटेनाच्या जवळ असलेले भाग ही ऊर्जा शोषून घेतात आणि तिचे परिवर्तन उष्णता किंवा कंपनसंदेशामध्ये करतात. त्यामुळे आपला मोबाईल फोन जरा लांबच ठेवा!