जहाजबांधणीत स्वदेशी भागांच्या वापराला चालना देण्याचा भाग म्हणून देशी बनावटीचे सागरी वापराच्या दर्जाचे पोलाद घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि जिंदाल स्टील अँड पॉवर यांच्यादरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
देशहितासाठी करारातील दोन्ही भागीदार स्वदेशीचा वापर वाढवण्यासाठी आवश्यक क्षमताबांधणीसाठी वचनबद्ध राहणार आहेत. देशाच्या संरक्षणाशी संबंधित क्लिष्ट आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक–खाजगी भागीदारीचे महत्त्व या सामंजस्य कराराने अधोरेखित केले आहे. सरकारी विभाग आणि खाजगी क्षेत्राने एकत्र येण्याची गरज या कराराच्या निमित्ताने समोर आली आहे. दर्जा, श्रेणी, परिमाणे यांसह जहाजबांधणीसाठी वेळोवेळी आवश्यक ठराविक प्रकारच्या पोलादाचा पुरवठा करण्यासाठी निर्दिष्ट पोलादनिर्मिती प्रकल्पांचा या करारात समावेश केला आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे उपसंचालक (साहित्य व देखभाल), महानिरीक्षक एच. के. शर्मा, जिंदाल स्टील अँड पॉवरचे मुख्य विपणन अधिकारी एस. के. प्रधान यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.